तापोळा विहंगम गॅलरीला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव द्या; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी, रस्त्यांवर रिफ्लेक्टर बसविण्याचीही सूचना
तापोळा विहंगम गॅलरीला ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे’ यांचे नाव द्या; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाची मागणी, रस्त्यांवर रिफ्लेक्टर बसविण्याचीही सूचना
महाबळेश्वर | प्रतिनिधी
तापोळा येथे नव्याने उभारण्यात येत असलेल्या विहंगम गॅलरीला शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या महाबळेश्वर शहर शाखेच्या वतीने करण्यात आली आहे. यासंदर्भात बांधकाम विभागाचे अभियंता अजय देशपांडे यांना निवेदन सादर करण्यात आले.
निवेदनात म्हटले आहे की, तापोळा येथे प्रस्तावित पुलाचे काम पूर्णत्वास आले असून त्या परिसरात पर्यटकांसाठी विहंगम गॅलरी उभारण्यात येणार आहे. महाराष्ट्रासह जगभरातील हिंदुत्व विचारांचे पुरस्कर्ते आणि शिवसेनेचे संस्थापक हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे समाजकारण व नेतृत्व लक्षात घेता या गॅलरीला त्यांचे नाव देऊन ‘हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे विहंगम गॅलरी’ असे नामकरण करण्यात यावे. यामुळे या पर्यटनस्थळाला एक वेगळी ओळख प्राप्त होईल तसेच बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याला अभिवादन होईल, असेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
याशिवाय महाबळेश्वर परिसरातील पावसाळी हंगामात घनदाट धुक्यामुळे वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागतो. अनेकदा दृश्यमानता कमी झाल्याने अपघात होण्याचा धोका निर्माण होतो. या पार्श्वभूमीवर महाबळेश्वर ते केळघर घाट, महाबळेश्वर ते पाचगणी आणि महाबळेश्वर ते प्रतापगड या प्रमुख मार्गांवर रस्त्याच्या दोन्ही बाजूंना रिफ्लेक्टर बसविण्याचे आदेश संबंधित विभागाला देण्यात यावेत, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
पर्यटकांची सुरक्षितता आणि स्थानिक नागरिकांच्या हिताचा विचार करून ही उपाययोजना तातडीने राबविणे आवश्यक असल्याचे शिवसेना पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वी आवश्यक सुरक्षा सुविधा उपलब्ध झाल्यास अपघातांचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल, असा विश्वासही व्यक्त करण्यात आला.
यावेळी शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, उपशहरप्रमुख राजेश साळवी, युवासेना शहरप्रमुख आकाश साळुंखे, शहनवाज खारखंडे, आसिफ माहापुळे, अली वारुणकर, तेजस बोधले, राहुल खरे यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. निवेदनानंतर संबंधित मागण्यांकडे प्रशासनाने सकारात्मक दृष्टीकोनातून पाहून आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षाही व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment