मनीषा गायकवाड आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; १०५ गाव समाज एकवटला, आरोपी पतीच्या अटकेची जोरदार मागणी

मनीषा गायकवाड आत्महत्या प्रकरणाला नवे वळण; १०५ गाव समाज एकवटला, आरोपी पतीच्या अटकेची जोरदार मागणी

✍️संतोष मालुसरे,

तापोळा प्रतिनिधी : 

कोयना वसाहत, गोरेगाव येथील मनीषा गायकवाड या विवाहित महिलेने सासरच्या मंडळींकडून होत असलेल्या कथित त्रासाला कंटाळून १७ मे २०२६ रोजी आत्महत्या केल्याच्या प्रकरणात आता १०५ गाव समाज आक्रमक झाला असून मनीषाला न्याय मिळवून देण्यासाठी समाजातील विविध संघटना, पदाधिकारी, समाजसेवक आणि नागरिक मोठ्या संख्येने एकत्र आले आहेत. आरोपी पतीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करत समाजाच्या प्रतिनिधींनी दिंडोशी पोलीस ठाण्यात निवेदन सादर केले.


मिळालेल्या माहितीनुसार, मनीषा गायकवाड यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या आई-वडील, भाऊ आणि नातेवाईक न्यायासाठी दिंडोशी पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र त्यावेळी त्यांची तक्रार नोंदवून घेतली गेली नसल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे. त्यानंतर मनीषाच्या कुटुंबीयांनी न्यायाच्या अपेक्षेने १०५ गाव समाजाच्या प्रतिनिधींशी संपर्क साधला. या प्रकरणाची गंभीर दखल घेत समाजाच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन मनीषाच्या कुटुंबाच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याचा निर्णय घेतला.


समाजाच्या वतीने मनीषाला न्याय मिळवून देण्यासाठी एकमताने निर्धार व्यक्त करण्यात आला. मनीषा ही समाजाची मुलगी असून तिच्या आत्महत्येला कारणीभूत असलेल्या व्यक्तींवर कठोर कारवाई व्हावी, अशी भूमिका समाजाने घेतली. भविष्यात समाजातील कोणत्याही मुलीला अशा परिस्थितीला सामोरे जावे लागू नये आणि आत्महत्येस प्रवृत्त करणाऱ्या प्रवृत्तींना आळा बसावा, यासाठी ही लढाई लढली जात असल्याचे समाज प्रतिनिधींनी स्पष्ट केले.


या पार्श्वभूमीवर दिंडोशी पोलीस ठाणे, मालाड येथे मोठ्या संख्येने समाजबांधव, महिला कार्यकर्त्या, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधी उपस्थित राहिले. यावेळी मनीषाच्या आत्महत्येस कारणीभूत असल्याचा आरोप असलेल्या तिच्या पतीवर तात्काळ गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी करण्यात आली. निवेदन स्वीकारल्यानंतर दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी प्रकरणाची तातडीने दखल घेत एफआयआर नोंदवून आवश्यक ती कायदेशीर कारवाई करण्यात येईल तसेच आरोपीविरुद्ध अटक प्रक्रिया राबविण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती समाजाच्या प्रतिनिधींनी दिली.


या आंदोलनात माजी अध्यक्ष नारायण संकपाळ, ३२ गाव समाजाचे अध्यक्ष धोंडीबा धनावडे, ह.भ.प. धोंडीराम महाराज सपकाळ, माजी अध्यक्ष संतोष आप्पा जाधव, संभाजी जाधव गुरुजी, ४३ गाव समाजाचे उपाध्यक्ष, शिवसेना उत्तर मुंबई विभाग प्रमुख गणेश शिंदे, तुळशीराम शिंदे, निशांत संकपाळ, शाखाप्रमुख रमेश संकपाळ, संतोष सकपाळ यांच्यासह अनेक समाजसेवक, महिला कार्यकर्त्या आणि मुंबई, ठाणे, नवी मुंबई परिसरातील १०५ गाव समाजाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच मनीषा गायकवाड यांचे वडील, भाऊ, मामा, मामी, बहीण आणि इतर नातेवाईकही उपस्थित होते.


या निमित्ताने समाजातील एकजुटीचे दर्शन घडले असून अन्यायाविरोधात एकत्र येऊन लढण्याची समाजाची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे. मनीषा गायकवाड प्रकरणात पुढील काळात पोलिसांकडून कोणती कारवाई केली जाते याकडे समाजबांधवांसह सर्वांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl