पश्चिम महाराष्ट्र नगर परिषद महासंघाच्या उपाध्यक्षपदी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे; शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
पश्चिम महाराष्ट्र नगर परिषद महासंघाच्या उपाध्यक्षपदी महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे; शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा
महाबळेश्वर | प्रतिनिधी
पर्यटननगरी महाबळेश्वरच्या विकासाला नवी दिशा देत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या क्षेत्रात आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटवणारे लोकप्रिय नगराध्यक्ष सुनील लक्ष्मण शिंदे यांची पश्चिम महाराष्ट्र नगर परिषद महासंघाच्या उपाध्यक्षपदी सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. महासंघाच्या नुकत्याच पार पडलेल्या महत्त्वपूर्ण बैठकीत या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली. त्यांच्या निवडीमुळे महाबळेश्वर शहरासह सातारा जिल्ह्याचे संघटनात्मक आणि प्रशासकीय स्तरावरील महत्त्व आणखी वाढले असून संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या प्रश्नांना प्रभावीपणे वाचा फोडण्यासाठी सक्षम नेतृत्व मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे.
महाबळेश्वर नगरपरिषदेच्या सार्वजनिक निवडणुकीत जनतेतून थेट भरघोस मतांनी निवडून आलेले सुनील शिंदे हे शांत, संयमी, लोकाभिमुख आणि सर्वसमावेशक नेतृत्वासाठी ओळखले जातात. नगराध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी शहरातील स्वच्छता, मूलभूत सुविधा, पर्यटनवृद्धी, पायाभूत विकास तसेच नागरिकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले. जागतिक कीर्तीच्या पर्यटनस्थळाचा दर्जा कायम राखत विकास आणि पर्यावरण यामध्ये समतोल साधण्याचा त्यांनी सातत्याने प्रयत्न केला आहे.
महाबळेश्वर शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या विविध योजनांमुळे त्यांना राज्यभरातील नगर परिषदांमध्ये विशेष ओळख मिळाली आहे. त्यांच्या याच प्रशासकीय अनुभवाचा आणि विकासात्मक दृष्टिकोनाचा लाभ पश्चिम महाराष्ट्रातील नगर परिषदांना व्हावा या उद्देशाने महासंघाने त्यांच्यावर उपाध्यक्षपदाची महत्त्वपूर्ण जबाबदारी सोपवली आहे.
या निवडीमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्यातील नगर परिषदांच्या विविध प्रश्नांना नव्या पातळीवर गती मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. विशेषतः नगर परिषदांचे प्रलंबित निधी, विकास आराखड्यांना मंजुरी, विविध विकासकामांसाठी शासनस्तरावर पाठपुरावा, नगरपालिका कर्मचाऱ्यांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या समस्या तसेच पर्यटनविकास आणि स्थानिक स्वराज्य संस्था अधिक सक्षम करण्यासाठी विशेष उपक्रम राबविण्यावर भर दिला जाणार असल्याचे बोलले जात आहे.
निवडीनंतर प्रतिक्रिया व्यक्त करताना सुनील शिंदे म्हणाले, "पश्चिम महाराष्ट्र नगर परिषद महासंघाने माझ्यावर दाखवलेला विश्वास सार्थ ठरवण्यासाठी मी पूर्ण क्षमतेने काम करेन. महासंघाच्या माध्यमातून पश्चिम महाराष्ट्रातील सर्व नगर परिषदांचे प्रलंबित प्रश्न, विकास आराखडे आणि कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी प्राधान्याने प्रयत्न करणार आहे. महाबळेश्वरच्या जनतेने आणि पक्ष नेतृत्वाने दिलेल्या पाठबळामुळेच मला हा सन्मान प्राप्त झाला असून हा बहुमान संपूर्ण महाबळेश्वरकरांचा आहे."
सुनील शिंदे यांच्या या महत्त्वपूर्ण निवडीचे राजकीय, सामाजिक, प्रशासकीय तसेच व्यापारी क्षेत्रातून स्वागत करण्यात येत आहे. महाबळेश्वर, सातारा जिल्हा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विविध मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन करत पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांच्या नेतृत्वामुळे पश्चिम महाराष्ट्रातील नगर परिषदांच्या विकासाला नवी चालना मिळेल, असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला आहे. सुनील शिंदे यांच्या रूपाने महाबळेश्वरला पुन्हा एकदा राज्यस्तरीय संघटनात्मक व्यासपीठावर मानाचे स्थान मिळाले असून शहराच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
Comments
Post a Comment