कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मनोज जाधव यांना ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार’ जाहीर
कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानाची दखल; मनोज जाधव यांना ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार’ जाहीर
वाई | प्रतिनिधी
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषी सेवारत्न पुरस्कार’ यंदा नामदार भरतशेठ गोगावले यांचे स्वीय सहाय्यक तथा सहायक कृषी अधिकारी मनोज सुमन मोहन जाधव यांना जाहीर झाला आहे. कृषी क्षेत्रातील उल्लेखनीय कार्य, नाविन्यपूर्ण प्रयोग, शेतकरी हितासाठी केलेले योगदान आणि लोकाभिमुख सेवाभावाची दखल घेत शासनाने हा सन्मान जाहीर केला असून येत्या १ जुलै कृषीदिनी त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.
वाई येथील मूळ रहिवासी असलेल्या मनोज जाधव यांनी आपल्या सेवाकाळात कृषी क्षेत्रात अनेक नाविन्यपूर्ण आणि मार्गदर्शक उपक्रम यशस्वीपणे राबविले आहेत. पोलादपूर तालुक्यातील गोळेगणी येथे जलकुंड उपचार आधारित फळबाग लागवडीचा अभिनव प्रयोग यशस्वी करून त्याला शासनमान्यता मिळवून देण्यात त्यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. तसेच देवपूर येथे भात टोकण शेतीचा यशस्वी प्रयोग राबवून शेतकऱ्यांसाठी उत्पादनवाढीचे नवे पर्याय उपलब्ध करून दिले.
जलसंधारण आणि मृदसंवर्धन क्षेत्रातही त्यांनी उल्लेखनीय कार्य केले आहे. देवळे गावाला ‘प्री वॉटर कप स्पर्धे’त जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवून देण्यात त्यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. जलयुक्त शिवार अभियान आणि विविध जलसंधारण उपक्रमांतर्गत सलग चार वर्षे त्यांनी लोकसहभागातून प्रभावी काम करत ग्रामीण भागातील जलस्रोत विकासाला चालना दिली.
यवतमाळ जिल्ह्यातील आत्महत्याग्रस्त आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल शेतकरी कुटुंबांना मार्गदर्शन करण्याचे महत्त्वपूर्ण कार्यही त्यांनी केले आहे. अंजनखेड, शारी आणि राणी धानोरा या गावांमध्ये शाश्वत व आधुनिक शेती तंत्रज्ञानाचा प्रसार करून अनेक शेतकऱ्यांना नव्या पद्धतीची शेती स्वीकारण्यास प्रेरित केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे अनेक शेतकऱ्यांनी आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा अवलंब करून उत्पादन आणि उत्पन्नात लक्षणीय वाढ साध्य केली आहे.
आंबा घन लागवड, स्ट्रॉबेरी उत्पादन, आधुनिक बागायती व्यवस्थापन तसेच कृषी सल्लागार म्हणूनही त्यांनी राज्यभर वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेती शाळा, कृषी विस्तार कार्यक्रम, शेतकरी प्रशिक्षण शिबिरे आणि शासनाच्या विविध कृषी योजनांचा प्रभावी प्रसार करून त्यांनी शेतकरी आणि प्रशासन यांच्यातील दुवा म्हणून काम केले आहे.
सध्या नामदार भरतशेठ गोगावले यांचे स्वीय सहाय्यक म्हणून कार्यरत असताना त्यांनी सर्वसामान्य नागरिक, शेतकरी आणि विविध घटकांच्या प्रश्नांबाबत सातत्याने संवेदनशील भूमिका घेतली आहे. त्यांची कर्तव्यदक्ष, अभ्यासू आणि सेवाभावी कार्यशैली कृषी विभागासह सामाजिक, शैक्षणिक आणि राजकीय क्षेत्रातही विशेष कौतुकास पात्र ठरली आहे.
पुरस्काराची घोषणा होताच कृषी विभागातील अधिकारी व कर्मचारी, लोकप्रतिनिधी, सामाजिक कार्यकर्ते, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवर तसेच शेतकरी वर्गाकडून मनोज जाधव यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या यशामुळे जिल्ह्याच्या कृषी क्षेत्राचा गौरव वाढला असून युवा कृषी अधिकारी आणि कृषी क्षेत्रात कार्यरत असलेल्या तरुणांसाठी ते प्रेरणास्थान ठरले आहेत. त्यांच्या कार्याचा सन्मान म्हणून जाहीर झालेला हा पुरस्कार कृषी विकासासाठी त्यांनी दिलेल्या योगदानाची राज्यस्तरीय पावती मानली जात आहे.
Comments
Post a Comment