५० फूट खोल विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह; सह्याद्री ट्रेकर्सच्या धाडसी बचावकार्याने मृतदेह बाहेर

५० फूट खोल विहिरीत आढळला अनोळखी इसमाचा मृतदेह; सह्याद्री ट्रेकर्सच्या धाडसी बचावकार्याने मृतदेह बाहेर

कोरेगाव | प्रतिनिधी

कोरेगाव तालुक्यातील एका शेतातील सुमारे ५० फूट खोल विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली. या घटनेची माहिती मिळताच कोरेगाव पोलीसांनी सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर यांच्या मदतीची विनंती केली. त्यानुसार सह्याद्री ट्रेकर्सच्या सदस्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत धाडसी बचावकार्य करत मृतदेह विहिरीतून बाहेर काढून पोलिसांच्या ताब्यात दिला.


शनिवारी सकाळी सुमारे नऊ वाजण्याच्या सुमारास सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वर यांना कोरेगाव पोलीस स्टेशनमधून दूरध्वनीद्वारे संपर्क साधण्यात आला. एका व्यक्तीचा मृतदेह विहिरीत आढळून आल्याची माहिती देत तातडीने मदतीची आवश्यकता असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाबळेश्वरहून घटनास्थळी पोहोचण्यासाठी दीड ते दोन तासांचा कालावधी लागणार असल्याची माहिती देत सह्याद्री ट्रेकर्सने तत्काळ तयारी सुरू केली.


घटनेचे स्वरूप लक्षात घेऊन संजय पारठे, सर्जेराव खुटेकर आणि सुहास बेलकर हे तीन सदस्य त्वरित कोरेगावच्या दिशेने रवाना झाले. कोरेगावजवळील एका गावालगत शेत परिसरात असलेल्या विहिरीजवळ पोलीस पथक उपस्थित होते. घटनास्थळी पोहोचल्यानंतर टीमने विहिरीचे निरीक्षण केले असता सुमारे ५० फूट खोल विहिरीतील पाण्यात एका अनोळखी इसमाचा मृतदेह दिसून आला.


पोलिसांकडून प्राथमिक माहिती घेतल्यानंतर बचावकार्याला सुरुवात करण्यात आली. शेतकऱ्यांनी शेतासाठी पाणी सोडत असताना सकाळी विहिरीत मृतदेह दिसून आल्याचे पोलिसांनी सांगितले. त्यानंतर सह्याद्री ट्रेकर्सच्या सदस्यांनी विहिरीच्या कडेला रोप सेटअप तयार केला. पोलिसांच्या परवानगीनंतर एका सदस्याने आवश्यक सुरक्षासाहित्याच्या सहाय्याने विहिरीत उतरून मृतदेहापर्यंत पोहोचत त्यास काळजीपूर्वक कापडी स्ट्रेचरमध्ये सुरक्षितपणे बांधले.


त्यानंतर दोरखंडाच्या साहाय्याने अत्यंत दक्षतेने मृतदेह विहिरीतून बाहेर काढण्यात आला. संपूर्ण प्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर मृतदेह पोलिसांच्या ताब्यात देण्यात आला. मृत व्यक्तीची ओळख वृत्त लिहिपर्यंत पटलेली नव्हती. पुढील तपासासाठी मृतदेह रुग्णवाहिकेद्वारे शासकीय रुग्णालयात पाठविण्यात आला असून कोरेगाव पोलीस अधिक तपास करत आहेत.


या मोहिमेत सह्याद्री ट्रेकर्स, महाबळेश्वरच्या सदस्यांनी दाखविलेल्या तत्परतेचे आणि धाडसाचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl