मधाच्या सुगंधाने गाजलेल्या ‘मांघर’ची राज्यस्तरीय दखल खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांची भेट; ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक

मधाच्या सुगंधाने गाजलेल्या ‘मांघर’ची राज्यस्तरीय दखल

खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत यांची भेट; ग्रामस्थांच्या उपक्रमाचे कौतुक

प्रतापगड प्रतिनिधी :

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी लक्ष्मण राऊत (भा.प्र.से.) यांनी पदभार स्वीकारल्यानंतर प्रथमच सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत महाबळेश्वर तालुक्यातील ‘मधाचे गाव’ म्हणून राज्यभर ओळख निर्माण केलेल्या मांघर गावाला भेट दिली. राज्यस्तरीय आढावा बैठकीसाठी मध संचालनालय, महाबळेश्वर येथे आले असता त्यांनी मांघर येथील मध उत्पादन व प्रक्रिया उपक्रमांची प्रत्यक्ष पाहणी करून ग्रामस्थांच्या कार्याचे कौतुक केले.

मांघर येथे पोहोचल्यानंतर श्री. राऊत यांनी गावातील माहिती व प्रशिक्षण दालन, मध प्रक्रिया युनिट, ग्रामस्थांनी उभारलेले सामूहिक मधुबन तसेच विक्री केंद्राची पाहणी केली. यावेळी त्यांनी ‘मधाचे गाव मांघर’ या ब्रँडची माहिती जाणून घेतली आणि शासनाच्या माध्यमातून राबविण्यात आलेला हा उपक्रम ग्रामस्थांनी अत्यंत प्रभावीपणे पुढे नेल्याबद्दल समाधान व्यक्त केले. मध व्यवसायाच्या माध्यमातून ग्रामीण विकास, रोजगारनिर्मिती आणि पर्यावरण संवर्धनाचा उत्तम आदर्श मांघरने राज्यासमोर ठेवला असल्याचेही त्यांनी नमूद केले.

यावेळी मांघरचे सरपंच गणेश जाधव यांनी गावातील मध प्रकल्पाची माहिती देताना सांगितले की, ‘मधाचे गाव’ म्हणून घोषित झाल्यानंतर दरवर्षी दीड ते दोन लाख पर्यटक गावाला भेट देतात. पर्यटक मध उत्पादन प्रक्रियेची माहिती घेण्याबरोबरच स्थानिक मधाची खरेदीही करतात. गावात दरवर्षी सुमारे दहा हजार किलो मध संकलित होत असून त्यातून अनेक कुटुंबांना रोजगार व उत्पन्नाचा स्रोत उपलब्ध झाला आहे.

मांघर विकास संस्थेचे अध्यक्ष नानासाहेब जाधव यांनी या उपक्रमासाठी महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळ, राज्य शासन तसेच जिल्हा नियोजन समिती, सातारा यांनी दिलेल्या सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून या प्रकल्पाला बळ मिळाले असून त्यामुळे गावाची राज्यस्तरावर स्वतंत्र ओळख निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.

भेटीदरम्यान ग्रामस्थांच्या वतीने लक्ष्मण राऊत यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी मध संचालनालयाचे प्रभारी संचालक निसार तांबोळी, प्रभारी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी दिग्विजय पाटील, माजी सरपंच संजय जाधव, रमेश जाधव, विठ्ठल जाधव, बबन जाधव, विजय जाधव, गणपत पार्टे, महादेव जाधव, अरुण जाधव, जीवाजी कदम, बापू जाधव, आप्पा जाधव, प्रकाशदादा पार्टे यांच्यासह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार विजय जाधव यांनी मानले.

मध उत्पादन, प्रक्रिया, विपणन आणि ग्रामीण पर्यटन यांचा संगम घडवून आणणाऱ्या मांघर गावाने राज्यातील इतर गावांसमोर एक आदर्श उभा केला असून, या भेटीमुळे ‘मधाचे गाव’ उपक्रमाला नवसंजीवनी मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl