हातलोट गावात एसटी बस सेवेचा शुभारंभ; ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण
हातलोट गावात एसटी बस सेवेचा शुभारंभ; ग्रामस्थांची अनेक वर्षांची मागणी अखेर पूर्ण
श्री गणेश उतेकर यांच्या पाठपुराव्याला यश; अजित संकपाळ व संजय मोरे यांचे विशेष सहकार्य
महाबळेश्वर तालुक्यातील दुर्गम समजल्या जाणाऱ्या हातलोट गावासाठी अखेर एसटी बस सेवा सुरू करण्यात आली असून, यामुळे ग्रामस्थांची अनेक वर्षांपासूनची प्रलंबित मागणी पूर्ण झाली आहे. या बस सेवेच्या प्रारंभामुळे विद्यार्थ्यांसह शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि नोकरदार वर्गाला मोठा दिलासा मिळाला आहे.
हातलोट गावात एसटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी शिवसेना महाबळेश्वर तालुकाप्रमुख श्री गणेश उतेकर यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. ग्रामीण भागातील नागरिकांना वाहतुकीच्या सोयीअभावी विविध अडचणींना सामोरे जावे लागत होते. गावातून तालुक्याच्या ठिकाणी तसेच इतर महत्त्वाच्या ठिकाणी जाण्यासाठी खासगी वाहनांवर अवलंबून राहावे लागत असल्याने आर्थिक आणि वेळेचा मोठा भार सहन करावा लागत होता.
ग्रामस्थांच्या या समस्येची दखल घेत श्री गणेश उतेकर यांनी संबंधित विभागांकडे वारंवार पाठपुरावा करून बस सेवा सुरू करण्याची मागणी लावून धरली. या प्रयत्नांना जिल्हा परिषद सदस्य अजित संकपाळ तसेच पंचायत समितीचे उपसभापती संजय मोरे यांचेही मोलाचे सहकार्य लाभले. त्यांच्या संयुक्त प्रयत्नांमुळे अखेर हातलोट गावात एसटी बस सेवा सुरू करण्याचा मार्ग मोकळा झाला.
बस सेवा सुरू झाल्याने गावातील विद्यार्थ्यांना शाळा व महाविद्यालयात जाणे अधिक सोयीचे होणार आहे. तसेच आरोग्य सेवा, शासकीय कार्यालये, बाजारपेठ आणि इतर आवश्यक कामांसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांनाही याचा मोठा लाभ मिळणार आहे. ग्रामीण भागाच्या विकासासाठी दळणवळणाच्या सुविधा अत्यंत महत्त्वाच्या असून, या बस सेवेच्या माध्यमातून हातलोट गावाच्या विकासाला नवी चालना मिळणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
एसटी बस सेवा सुरू झाल्याबद्दल ग्रामस्थांनी आनंद व्यक्त करत श्री गणेश उतेकर, अजित संकपाळ आणि संजय मोरे यांचे आभार मानले. ग्रामीण जनतेच्या हितासाठी केलेल्या या प्रयत्नांचे सर्व स्तरांतून स्वागत होत असून, ‘जनसेवा हीच खरी शिवसेना’ या ब्रीदवाक्याला साजेशी ही कामगिरी असल्याची प्रतिक्रिया नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment