जावळीच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रातील आधारवड हरपला; माजी उपसभापती शंकरराव साळुंखे (अण्णा) यांचे निधन


जावळीच्या सामाजिक-राजकीय क्षेत्रातील आधारवड हरपला; माजी उपसभापती शंकरराव साळुंखे (अण्णा) यांचे निधन

✍️संतोष मालुसरे,

तापोळा | प्रतिनिधी

जावळी तालुक्यातील सामाजिक, सहकार आणि राजकीय क्षेत्रात आपल्या कार्यकर्तृत्वाचा ठसा उमटविणारे, जनसामान्यांच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारे जावळी पंचायत समितीचे माजी उपसभापती तथा डीएमके जावळी सहकारी बँकेचे माजी संचालक शंकरराव सीताराम साळुंखे (अण्णा) यांचे राहत्या घरी केळघर-सोळशी येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे जावळी तालुक्यासह १०५ गाव समाजात शोककळा पसरली असून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रातील एक अभ्यासू, संयमी आणि लोकाभिमुख नेतृत्व काळाच्या पडद्याआड गेल्याची भावना व्यक्त होत आहे.

शंकरराव साळुंखे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून आपली वाटचाल सुरू केली. समाजसेवा हेच ध्येय मानून त्यांनी जनतेच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला. त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात माजी आमदार जी. जी. कदम यांच्या सहवासातून झाली. सन १९८५ मध्ये ते प्रथम ग्रुप ग्रामपंचायतीचे सरपंच म्हणून निवडून आले. त्यानंतर सन १९९६ मध्ये केळघर तर्फे सोळशी ग्रामपंचायतीचे पहिले सरपंच होण्याचा मान त्यांना मिळाला.

ग्रामपातळीवरील नेतृत्वातून त्यांनी पुढे जावळी पंचायत समितीपर्यंत मजल मारली. सन १९९६ मध्ये पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर त्यांची उपसभापतीपदी निवड झाली. त्यानंतर सहकार क्षेत्रातही त्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले. सन २००२ पासून सलग दहा वर्षे डीएमके जावळी सहकारी बँकेचे संचालक म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना आर्थिक बळ मिळावे यासाठी त्यांनी विविध सहकारी संस्थांच्या माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले.

साळुंखे यांनी सोमजाई-काळेश्वरी आपटी विकास सेवा सोसायटी आणि पंचशील विकास सेवा सोसायटी या संस्थांचे पुनरुज्जीवन करण्यासाठी विशेष प्रयत्न केले. तसेच सन २००४ मध्ये जयभवानी केळघर तर्फे सोळशी विकास सेवा सोसायटी आणि भैरवनाथ नऊ गाव विकास सेवा सोसायटी या दोन संस्थांची स्थापना करून ग्रामीण भागातील सहकार चळवळीला नवे बळ दिले.

ग्रामीण भागातील वाहतुकीच्या समस्या सोडविण्यासाठीही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. सन १९९५-९६ मध्ये तत्कालीन आमदार शशिकांत शिंदे यांच्या माध्यमातून सातारा-तेटली-गोगवे एसटी सेवा सुरू करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला. तसेच बामणोली विभागातील ३८ गावांतील नागरिकांना होणाऱ्या अडचणी लक्षात घेऊन अतिरिक्त दोन एसटी बसेस सुरू करण्यासाठी त्यांनी यशस्वी पाठपुरावा केला. जनतेच्या सेवेसाठी वाहतूक सुविधा उपलब्ध करून देणारे ते त्या भागातील पहिले लोकप्रतिनिधी म्हणून ओळखले जात होते.

साळुंखे अण्णा यांचा स्वभाव अत्यंत प्रेमळ, मनमिळावू आणि सर्वांना आपलेसे करणारा होता. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी हे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य होते. कोणताही व्यक्ती त्यांच्या भेटीस गेला की त्याची आत्मीयतेने विचारपूस करणे, त्याला प्रेमाने जवळ घेणे आणि चहा-पाणी दिल्याशिवाय न जाऊ देणे, ही त्यांची खास शैली होती. त्यामुळे ते केवळ राजकीय नेते नव्हते तर सर्वसामान्यांच्या सुख-दुःखातील खरे साथीदार होते.

सामाजिक कार्यासोबतच त्यांची अध्यात्म आणि सांस्कृतिक क्षेत्रातही विशेष आवड होती. भजन-कीर्तनाची परंपरा जपणारे साळुंखे अण्णा पेटीवर बसून गोड आवाजात भजने सादर करत असत. त्यांच्या मंजुळ आवाजाने आणि अभ्यासपूर्ण भाषणांनी अनेकांना प्रेरणा मिळाली. शांत, संयमी आणि सौम्य स्वभावामुळे ते सर्व स्तरातील लोकांमध्ये लोकप्रिय होते.

त्यांच्या निधनामुळे जावळी तालुक्याने एक निस्वार्थी समाजसेवक, सहकार क्षेत्रातील अभ्यासू नेतृत्व आणि जनतेच्या प्रश्नांसाठी आयुष्यभर झटणारा लोकप्रतिनिधी गमावला आहे. विविध राजकीय, सामाजिक, सहकारी आणि धार्मिक क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त करत भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे.

शंकरराव साळुंखे (अण्णा) यांच्या पश्चात कुटुंबीय, नातेवाईक आणि मोठा मित्रपरिवार आहे. त्यांच्या निधनाने निर्माण झालेली पोकळी भरून न निघणारी असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त होत आहे. त्यांच्या पवित्र स्मृतीस भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl