मान्सूनपूर्व तयारीला गती; पंचायत समिती सभापती शकुंतला चोरमले ॲक्शन मोडमध्ये
महाबळेश्वर | प्रतिनिधी
आगामी मान्सूनच्या पार्श्वभूमीवर पंचायत समिती महाबळेश्वर प्रशासनाने स्वच्छता आणि प्रतिबंधात्मक उपाययोजनांना गती देण्यास सुरुवात केली असून पंचायत समितीच्या सभापती शकुंतला चोरमले यांनी स्वतः पुढाकार घेत विविध कामांचा आढावा घेत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या आहेत.
पंचायत समिती कार्यालय परिसरात सभापती शकुंतला चोरमले आणि गटविकास अधिकारी विजय विभुते यांनी संयुक्त पाहणी केली. यावेळी कार्यालय परिसरातील स्वच्छता, विहिरींची स्वच्छता, पाणी टाक्यांची साफसफाई तसेच मान्सूनपूर्व गाळ काढण्याच्या कामांचा आढावा घेण्यात आला. पावसाळ्यात नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये आणि परिसर स्वच्छ व सुरक्षित राहावा यासाठी आवश्यक ती कार्यवाही तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाहणीदरम्यान उपअभियंता चव्हाण यांना गाळ काढण्याच्या प्रक्रियेला गती देण्याचे तसेच प्रलंबित स्वच्छता कामे तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आले. याशिवाय पंचायत समिती परिसर आणि आजूबाजूच्या भागातील स्वच्छता अधिक प्रभावीपणे राबविण्यासाठी महाबळेश्वर नगरपालिकेशी समन्वय साधण्यावर भर देण्यात आला.
सभापती शकुंतला चोरमले यांनी यावेळी नगरपालिकेच्या स्वच्छता निरीक्षकांशी दूरध्वनीवर संपर्क साधून परिसर स्वच्छतेसंदर्भात चर्चा केली. सार्वजनिक ठिकाणे, कार्यालय परिसर आणि पाणी स्रोत स्वच्छ ठेवण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी समन्वयाने काम करण्याचे आवाहन त्यांनी केले.
या पाहणीवेळी बालविकास प्रकल्प अधिकारी नाईक मॅडम याही उपस्थित होत्या. विविध विभागांच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून मान्सूनपूर्व तयारीची सद्यस्थिती जाणून घेण्यात आली तसेच नागरिकांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने आवश्यक उपाययोजना प्रभावीपणे राबविण्याच्या सूचना देण्यात आल्या.
मान्सून काळात उद्भवणाऱ्या संभाव्य अडचणी टाळण्यासाठी प्रशासन सज्ज असून स्वच्छता, पाणीपुरवठा आणि गाळ काढण्याच्या कामांना प्राधान्य दिले जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले. सभापती शकुंतला चोरमले यांच्या पुढाकारामुळे पंचायत समिती प्रशासन मान्सूनपूर्व तयारीसाठी ॲक्शन मोडमध्ये आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
Comments
Post a Comment