कायदा क्षेत्रातील यशाला सलाम! डॉ. अॅड. कुलदीप यादव यांचा आज जाहीर सत्कार; भीमक्रांती युवक संघटनेच्या गुणगौरव सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
कायदा क्षेत्रातील यशाला सलाम! डॉ. अॅड. कुलदीप यादव यांचा आज जाहीर सत्कार; भीमक्रांती युवक संघटनेच्या गुणगौरव सोहळ्यात मान्यवरांची उपस्थिती
महाबळेश्वर | प्रतिनिधी
भारतीय बौद्ध महासभा, महाबळेश्वर यांच्या अधिपत्याखाली तसेच भीमक्रांती युवक संघटना, महाबळेश्वर शाखा (मुंबई) यांच्या संयुक्त विद्यमाने रविवार दि. १४ जून रोजी महाबोधी विहार, दीक्षानगरी, भीमनगर येथे गुणगौरव, मार्गदर्शन, शालेय साहित्य वाटप व सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात इयत्ता पाचवीपासून पदवीधरपर्यंत यश संपादन केलेल्या विद्यार्थी-विद्यार्थिनींचा गुणगौरव करण्यात येणार असून समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या मान्यवरांचाही सन्मान केला जाणार आहे.
यंदाच्या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे भीमक्रांती युवक संघटनेचे माजी अध्यक्ष डॉ. अॅड. कुलदीप शिवराम यादव यांचा होणारा जाहीर सत्कार होय. त्यांनी विधी (कायदा) शाखेमध्ये उल्लेखनीय यश संपादन करून समाजाचे नाव उज्ज्वल केले असल्याने त्यांचा मान्यवरांच्या उपस्थितीत गौरव करण्यात येणार आहे. त्यांच्या या यशाबद्दल समाजबांधवांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले असून तरुणांसाठी ते प्रेरणादायी ठरत आहेत.
कार्यक्रमाला भारतीय बौद्ध महासभेचे सातारा जिल्हाध्यक्ष अशोक भालेराव, संरक्षण विभागाचे सचिव दिलीप यादव, पर्यटन सचिव आशा भालेराव, संघटक रुपाली सपकाळ, महाबळेश्वर अध्यक्ष नितीन गायकवाड, कोषाध्यक्ष एकनाथ भालेराव, महासचिव अनिल सपकाळ, महिला अध्यक्ष नंदा यादव, सचिव दामिनी कांबळे यांच्यासह भारतीय बौद्ध महासभेचे विद्यमान व माजी पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. तसेच विविध शाखांचे अध्यक्ष, कार्यकर्ते, समता सैनिक दलाचे पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवरही कार्यक्रमास उपस्थित राहणार आहेत.
यावेळी विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप करण्यात येणार असून त्यांच्या शैक्षणिक, सामाजिक व करिअरविषयक प्रगतीसाठी मार्गदर्शनही केले जाणार आहे. समाजातील गुणवंतांचा गौरव करून नव्या पिढीला प्रेरणा देण्याचा या उपक्रमाचा उद्देश असल्याचे आयोजकांनी सांगितले.
या कार्यक्रमासाठी संतोष भालेराव, सचिन मोरे, जगन कदम, बबन सपकाळ यांच्यासह भीमक्रांती युवक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते विशेष परिश्रम घेत असून सर्व समाजबांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून कार्यक्रम यशस्वी करावा, असे आवाहन भारतीय बौद्ध महासभा व भीमक्रांती युवक संघटनेच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment