पत्रकारांच्या एकजुटीचा विजय; महाबळेश्वरातील वाहतूक निरीक्षकाच्या निलंबनाचे संकेतअपमानास्पद वक्तव्य प्रकरणी सातारा जिल्हाभर निषेधाची लाट; विभाग नियंत्रकांचे कारवाईचे आश्वासन
पत्रकारांच्या एकजुटीचा विजय; महाबळेश्वरातील वाहतूक निरीक्षकाच्या निलंबनाचे संकेत
अपमानास्पद वक्तव्य प्रकरणी सातारा जिल्हाभर निषेधाची लाट; विभाग नियंत्रकांचे कारवाईचे आश्वासन
सातारा | प्रतिनिधी
महाबळेश्वर एसटी आगारातील एका वाहतूक निरीक्षकाने पत्रकारांविषयी अपशब्द वापरल्याच्या प्रकरणाला आता गंभीर वळण मिळाले असून संबंधित अधिकाऱ्याच्या निलंबनाची प्रक्रिया लवकरच होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पत्रकारांच्या सन्मानावर झालेल्या या कथित आघाताविरोधात सातारा जिल्ह्यातील पत्रकार संघटनांनी एकजूट दाखवत तीव्र निषेध नोंदविल्यानंतर परिवहन प्रशासनालाही या प्रकरणाची दखल घ्यावी लागली आहे.
महाबळेश्वर एसटी डेपोमधील संबंधित अधिकाऱ्याने पत्रकारांबद्दल अवमानकारक आणि अपमानास्पद भाषा वापरल्याचा आरोप समोर आल्यानंतर पत्रकारांमध्ये संतापाची लाट उसळली होती. या घटनेचा निषेध करत सातारा जिल्हा पत्रकार संघ, सातारा पत्रकार संघ तसेच डिजिटल मिडिया परिषद यांच्या वतीने तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करण्यात आली. पत्रकारांबाबत अशा प्रकारची भाषा वापरणे हे लोकशाही व्यवस्थेतील चौथ्या स्तंभाचा अवमान असल्याचे मत पत्रकार संघटनांनी व्यक्त केले.
सातारा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे यांच्या सूचनेनुसार प्रथम महाबळेश्वर येथे आणि त्यानंतर सातारा येथे पत्रकारांनी संघटितपणे निषेध आंदोलन उभारले. संबंधित कर्मचाऱ्याच्या निलंबनाची मागणी करत पत्रकारांनी प्रशासनाकडे निवेदन सादर केले. या आंदोलनाला विविध माध्यमांतील पत्रकारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
सातारा येथील आगारात पत्रकार प्रतिनिधींनी विभाग नियंत्रकांची भेट घेऊन संपूर्ण घटनेची माहिती दिली. यावेळी पत्रकारांच्या भावना लक्षात घेऊन संबंधित उर्मट कर्मचाऱ्याविरोधात योग्य ती कारवाई करण्यात येईल तसेच त्याला निलंबित करण्यात येईल, असे आश्वासन विभाग नियंत्रकांनी दिल्याचे पत्रकार संघटनांच्या वतीने सांगण्यात आले.
विशेष म्हणजे, अत्यंत कमी वेळेत साताऱ्यातील पत्रकार मोठ्या संख्येने एकत्र आले आणि पत्रकारितेच्या सन्मानासाठी एकजूट दाखवली. या एकोप्याबद्दल सर्व पत्रकार बांधवांचे आभार व्यक्त करण्यात आले आहेत. पत्रकारांवरील अन्याय आणि दबावाच्या विरोधात भविष्यातही अशीच एकजूट कायम ठेवण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
दरम्यान, या प्रकरणामुळे शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वर्तणुकीबाबत प्रश्न उपस्थित झाले असून पत्रकारांशी सन्मानाने वागण्याबाबत प्रशासनाने स्पष्ट भूमिका घेण्याची गरज व्यक्त होत आहे. संबंधित अधिकाऱ्यावरील प्रस्तावित कारवाईकडे आता संपूर्ण जिल्ह्यातील पत्रकार आणि नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment