महाबळेश्वर वेण्णा लेक टोलनाक्यावर राडा: पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांत बाचाबाची, मध्यस्थीनंतर वाद निवळला
महाबळेश्वर वेण्णा लेक टोलनाक्यावर राडा: पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांत बाचाबाची, मध्यस्थीनंतर वाद निवळला
महाबळेश्वर प्रतिनिधी:
जागतिक दर्जाचे पर्यटन स्थळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये पर्यटकांची वाढती वर्दळ आणि नियोजनाचा अभाव यामुळे पुन्हा एकदा प्रशासन आमनेसामने आल्याचे चित्र पाहायला मिळाले. महाबळेश्वर वेण्णा लेक टोलनाक्यावर टोल वसुलीदरम्यान ट्रॅफिक पोलीस आणि नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यामध्ये वाद होऊन हाणामारीचा प्रकार घडल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.
नेमके काय घडले?
मिळालेल्या माहितीनुसार, महाबळेश्वर वेण्णा लेक टोलनाक्यावर नगरपरिषदेचे कर्मचारी पर्यटकांकडून टोल वसुली करत होते. याच वेळी ट्रॅफिक पोलिसांनी संबंधित कर्मचाऱ्याला मारहाण केल्याने वादाला तोंड फुटले. पर्यटनाचा हंगाम सुरू होण्यापूर्वी पालिका आणि पोलीस प्रशासनाची एकत्रित समन्वय बैठक न झाल्याचा फटका या घटनेच्या रूपाने समोर आला आहे.
मध्यस्थीनंतर वाद निवळला
घटनेची माहिती मिळताच शहर प्रमुख राजाभाऊ गुजर, युवा सेना आकाश साळुंखे, विभागप्रमुख शंकर ढेरे, शहा नवाज भाई खरखंडे, अखिल भारतीय सफाई मजदुर राष्ट्रीय उपाध्यक्ष संजय जेधे, आयुब वारुणकर आणि विशाल (पप्पू) लालाबेग यांनी तातडीने टोलनाक्यावर धाव घेतली. कर्मचारी मारहाणीचा जाब विचारल्याने काही वेळ वातावरण तंग झाले होते.
प्रकरणाचे गांभीर्य ओळखून नगराध्यक्ष सुनील भाऊ शिंदे, मुख्याधिकारी योगेश पाटील, नगरसेवक अफजल भाई सुतार, संतोष आबा शिंदे, रोहित भाऊ ढेबे, मुख्य लिपिक बबनराव जाधव व अन्य पदाधिकारी यांनी मध्यस्थी केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सामंजस्याची भूमिका घेत माफीनामा दिल्यानंतर वाद मिटवण्यात आला आणि वाहतूक पुन्हा सुरळीत करण्यात आली.
समन्वयाची गरज
महाबळेश्वर हे जागतिक स्तरावरील थंड हवेचे ठिकाण आहे. दरवर्षी येथे लाखो पर्यटक भेट देतात. मात्र, अशा प्रकारच्या घटनांमुळे पर्यटनावर विपरित परिणाम होऊ शकतो. पर्यटन सुलभ आणि आनंददायी होण्यासाठी पालिका प्रशासन आणि पोलीस प्रशासन यांच्यात समन्वय असणे अत्यंत आवश्यक आहे. पर्यटकांना सोयीसुविधा पुरवण्यासोबतच दोन्ही विभागांनी वेळोवेळी आढावा बैठक घेऊन कामकाजात सुसूत्रता आणणे काळाची गरज आहे, अशी भावना स्थानिक नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
Comments
Post a Comment