महाबळेश्वरात प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रीवर कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, २ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त


महाबळेश्वरात प्रतिबंधित गुटखा-पानमसाला विक्रीवर कारवाई; दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल, २ हजार ७७१ रुपयांचा मुद्देमाल जप्त

महाबळेश्वर प्रतिनिधी :

महाबळेश्वर शहरात प्रतिबंधित गुटखा, पानमसाला व सुगंधित तंबाखूजन्य पदार्थांची विक्री व साठा केल्याप्रकरणी अन्न व औषध प्रशासन विभागाच्या तक्रारीवरून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दोन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईत एकूण २ हजार ७७१ रुपयांचा प्रतिबंधित अन्न पदार्थांचा साठा जप्त करण्यात आला असून, सार्वजनिक आरोग्याशी संबंधित नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधितांवर विविध कलमांन्वये कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या अन्न सुरक्षा अधिकारी श्रीमती प्रियंका नामदेव वाईकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिनांक २५ जून २०२६ रोजी दुपारी साडेएक वाजण्याच्या सुमारास महाबळेश्वर येथील एसटी स्थानकाजवळील श्रेयस हॉटेलच्या डाव्या बाजूच्या रस्त्यावर असलेल्या अपंग जनरल स्टोअर्स या दुकानावर तपासणी करण्यात आली होती.

या तपासणीदरम्यान आरोपी प्रविण सुरेश ओंबळे (वय ४८, रा. नगरपालिका सोसायटी, महाबळेश्वर) यांच्याकडून विमल पान मसाला, व्ही-१ टोबॅको आणि स्वीट सुपारी अशा प्रतिबंधित पदार्थांचा साठा आढळून आला. त्यांच्याकडून एकूण ४०३ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच दुसरे आरोपी निलेश नारायण तोडकर (वय ४०, सध्या रा. गणेशनगर हौसिंग सोसायटी, महाबळेश्वर, मूळ रा. कुरळोशी, ता. जावळी) यांच्याकडून विमल पान मसाला आणि व्ही-१ टोबॅकोच्या पुड्यांचा साठा मिळून आला असून त्यांच्याकडून १ हजार ७६८ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

दोन्ही आरोपींकडून मिळालेल्या प्रतिबंधित अन्न पदार्थांसह एकूण जप्त मालाची किंमत २ हजार ७७१ रुपये इतकी असल्याचे पोलिसांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाच्या अधिसूचनेनुसार राज्यात गुटखा, पानमसाला, सुगंधित सुपारी व तंबाखूजन्य पदार्थांचे उत्पादन, साठवणूक, वितरण आणि विक्रीवर बंदी घालण्यात आलेली असतानाही संबंधितांनी या पदार्थांचा विक्रीसाठी साठा करून शासन आदेशाचे उल्लंघन केल्याचा आरोप आहे.

अन्न सुरक्षा व मानदे अधिनियम २००६ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमांन्वये आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने अपायकारक ठरणाऱ्या प्रतिबंधित पदार्थांचा चोरटा व्यापार करून आर्थिक लाभ मिळविण्याच्या उद्देशाने हा साठा करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

या प्रकरणी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दिनांक २५ जून २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजून ४८ मिनिटांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक महारुद्र परजने हे या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत. महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बापुसाहेब सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

प्रतिबंधित तंबाखूजन्य पदार्थांच्या विक्रीविरोधात अन्न व औषध प्रशासन आणि पोलीस प्रशासनाकडून सातत्याने कारवाई सुरू असून अशा प्रकारच्या बेकायदेशीर व्यापारावर कठोर कारवाई केली जाणार असल्याचा इशारा प्रशासनाने दिला आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl