महाबळेश्वर काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा आता राजेंद्र भंडारी यांच्या खांद्यावर; ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती
महाबळेश्वर काँग्रेसच्या नेतृत्वाची धुरा आता राजेंद्र भंडारी यांच्या खांद्यावर; ब्लॉक अध्यक्षपदी नियुक्ती
प्रतापगड प्रतिनिधी -
महाबळेश्वर तालुका काँग्रेस संघटनेला नवे नेतृत्व मिळाले असून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या वतीने महाबळेश्वर ब्लॉक काँग्रेस अध्यक्षपदी राजेंद्र भंडारी यांची नियुक्ती करण्यात आली आहे. संघटन सृजन अभियानांतर्गत राज्यभरातील जिल्ह्यांमध्ये काँग्रेस पक्षाच्या संघटनात्मक बांधणीसाठी सुरू असलेल्या प्रक्रियेचा भाग म्हणून ही नियुक्ती जाहीर करण्यात आली आहे.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या नियुक्त निरीक्षकांनी विविध जिल्ह्यांमध्ये भेटी देत स्थानिक काँग्रेस नेते, पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी चर्चा करून ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्तीसंदर्भातील शिफारशी प्रदेश कार्यालयाकडे सादर केल्या होत्या. त्या शिफारशींचा विचार करून तसेच प्रदेशाध्यक्षांच्या आदेशानुसार सातारा जिल्ह्यातील विविध तालुक्यांसाठी ब्लॉक अध्यक्षांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या.
त्यामध्ये महाबळेश्वर तालुक्यासाठी राजेंद्र भंडारी यांच्यावर पक्ष संघटना मजबूत करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. त्यांच्या नियुक्तीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका आणि संघटनात्मक उपक्रमांच्या पार्श्वभूमीवर पक्षाला बळकटी मिळण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान, सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्या माध्यमातून संबंधित नियुक्तीपत्र देण्याची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार असून नव्याने नियुक्त झालेल्या ब्लॉक अध्यक्षांकडून पक्ष संघटना अधिक सक्षम आणि व्यापक करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.
Comments
Post a Comment