आठवडे बाजारातील चिखलामुळे नागरिकांची गैरसोय; पुढील मंगळवारपासून बाजार छत्रपती संभाजी महाराज वाहनतळावरनगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासनाचा तातडीचा निर्णय; नागरिकांची दिलगिरी व्यक्त
आठवडे बाजारातील चिखलामुळे नागरिकांची गैरसोय; पुढील मंगळवारपासून बाजार छत्रपती संभाजी महाराज वाहनतळावर
नगराध्यक्ष, नगरसेवक आणि प्रशासनाचा तातडीचा निर्णय; नागरिकांची दिलगिरी व्यक्त
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर शहरातील मंगळवारी भरत असलेल्या पारंपरिक आठवडे बाजार परिसरात सुरू असलेल्या रस्त्याच्या कामामुळे मोठ्या प्रमाणात चिखल निर्माण झाल्याने व्यापारी, शेतकरी तसेच नागरिकांची मोठी गैरसोय झाल्याचे चित्र आज पाहायला मिळाले. बाजारासाठी आलेल्या नागरिकांना चिखलातून मार्ग काढावा लागल्याने अनेकांनी नाराजी व्यक्त केली. या परिस्थितीची तातडीने दखल घेत नगराध्यक्ष सुनील शिंदे, सर्व नगरसेवक आणि नगरपरिषद प्रशासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
येत्या मंगळवारपासून भरणारा आठवडे बाजार तात्पुरत्या स्वरूपात छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ येथे भरविण्यात येणार असल्याची माहिती नगरसेवक रोहित ढेबे यांनी दिली. रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत नागरिक व व्यापाऱ्यांची गैरसोय टाळण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
महाबळेश्वर शहरातील आठवडे बाजार हा परिसरातील शेतकरी, व्यापारी आणि ग्राहकांसाठी महत्त्वाचा मानला जातो. दर आठवड्याला मोठ्या संख्येने नागरिक बाजारासाठी येथे येत असतात. मात्र सध्या सुरू असलेल्या रस्त्याच्या विकासकामांमुळे बाजार परिसरात चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले असून नागरिकांना सुरक्षितपणे वावरताना अडचणी येत आहेत. विशेषतः ज्येष्ठ नागरिक, महिला आणि लहान मुलांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत असल्याचे दिसून आले.
या पार्श्वभूमीवर नगरपरिषद प्रशासनाने परिस्थितीचा आढावा घेत पुढील आठवडे बाजारासाठी पर्यायी व्यवस्था करण्याचा निर्णय घेतला. छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ हे प्रशस्त आणि तुलनेने सोयीचे ठिकाण असल्याने तेथे बाजार भरविण्याचे निश्चित करण्यात आले आहे.
याबाबत माहिती देताना नगरसेवक रोहित ढेबे यांनी सांगितले की, नागरिकांना झालेल्या गैरसोयीबद्दल नगराध्यक्ष, सर्व नगरसेवक आणि प्रशासनाच्या वतीने दिलगिरी व्यक्त करण्यात येत आहे. विकासकामे ही शहराच्या भविष्यासाठी आवश्यक असली तरी नागरिकांना कमीत कमी त्रास होईल यासाठी प्रशासन प्रयत्नशील आहे. पुढील मंगळवारी आठवडे बाजार छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ येथे भरविण्यात येणार असून नागरिकांनी याची नोंद घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
या निर्णयामुळे बाजारातील व्यापारी आणि ग्राहकांना दिलासा मिळणार असून बाजार व्यवस्थापन अधिक सुरळीत होण्यास मदत होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. तसेच सुरू असलेली रस्त्याची कामे लवकरात लवकर पूर्ण करून बाजाराची नियमित व्यवस्था पूर्ववत करण्यासाठी प्रशासन प्रयत्न करीत असल्याचेही समजते.
Comments
Post a Comment