कृष्णा, कोयना आणि सावित्री नद्यांच्या उगमभूमीतच पाणीटंचाईची चाहूल; महाबळेश्वर तालुक्यात ४४ गावे टंचाईग्रस्त, प्रशासनाच्या उपाययोजनांना वेग



कृष्णा, कोयना आणि सावित्री नद्यांच्या उगमभूमीतच पाणीटंचाईची चाहूल; महाबळेश्वर तालुक्यात ४४ गावे टंचाईग्रस्त, प्रशासनाच्या उपाययोजनांना वेग

प्रतापगड प्रतिनिधी : 

महाराष्ट्राच्या जलवैभवाचा मानबिंदू असलेल्या महाबळेश्वरच्या डोंगररांगांमधून उगम पावणाऱ्या कृष्णा, कोयना आणि सावित्री या महत्त्वाच्या नद्यांमुळे संपूर्ण राज्याला जलसमृद्धी मिळते. मात्र याच नद्यांच्या उगमभूमीत उन्हाळ्याच्या तीव्रतेमुळे पाणीटंचाईची परिस्थिती निर्माण झाली असून, महाबळेश्वर तालुक्यातील ४४ गावे टंचाईग्रस्त म्हणून घोषित करण्यात आली आहेत. पाण्याची उपलब्धता कायम ठेवण्यासाठी ग्रामीण पाणी पुरवठा उपविभाग महाबळेश्वरकडून विविध उपाययोजना युद्धपातळीवर राबविण्यात येत आहेत.

सह्याद्रीच्या कुशीत वसलेला महाबळेश्वर तालुका हा केवळ पर्यटनासाठी नव्हे तर जलस्रोतांच्या दृष्टीनेही अत्यंत महत्त्वाचा आहे. कृष्णा नदीचा उगम महाबळेश्वर परिसरातील प्राचीन कृष्णाबाई मंदिराजवळ होत असून, कोयना आणि सावित्री नद्यांचाही उगम याच डोंगराळ भागातून होतो. या नद्यांमुळे सातारा, सांगली, कोल्हापूर, रायगड तसेच कोकणातील अनेक भागांना पाणीपुरवठ्याचा आधार मिळतो. मात्र उगमक्षेत्रातील अनेक दुर्गम वाड्या-वस्त्यांनाच उन्हाळ्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे.

सन २०२५-२६ या वर्षात महाबळेश्वर तालुक्यातील पाणीटंचाईची तीव्रता लक्षात घेऊन मा. उपविभागीय अधिकारी, वाई यांच्या आदेशानुसार टप्प्याटप्प्याने ४४ गावे टंचाईग्रस्त घोषित करण्यात आली आहेत. ६ फेब्रुवारी २०२६ रोजी २२ गावे, १६ एप्रिल रोजी २ गावे, १८ एप्रिल रोजी ४ गावे, २४ एप्रिल रोजी १० गावे आणि २० मे रोजी ६ गावांचा समावेश करण्यात आला आहे.

टंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाने दीर्घकालीन आणि तात्पुरत्या स्वरूपाच्या उपाययोजनांचा कृती आराखडा तयार केला आहे. जानेवारी ते मार्च २०२६ या कालावधीतील संभाव्य पाणीटंचाई कृती आराखड्यानुसार १६ नवीन विंधन विहिरी घेण्याचे तसेच क्षेत्र महाबळेश्वर येथे विहिरीमध्ये आडवी बोर घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे.

एप्रिल ते जून २०२६ या कालावधीतील आराखड्यानुसार १५ गावांना टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याचे आणि ३ ठिकाणी खासगी विहिरींचे अधिग्रहण करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. तसेच पुरवणी आराखड्यात ३० गावे आणि २१ वस्त्यांचा समावेश करून ४८ विंधन विहिरी, २ टँकर, २ विहीर खोलीकरण आणि ७ विहीर अधिग्रहणाच्या उपाययोजना प्रस्तावित करण्यात आल्या आहेत.

विंधन विहिरींच्या माध्यमातून कायमस्वरूपी पाणी उपलब्ध करून देण्यावर प्रशासनाचा भर असून, १२ मे २०२६ रोजी जिल्हाधिकारी सातारा यांच्याकडून रेणोशी, चिखली, मालुसर, राजपुरी, क्षेत्र महाबळेश्वर, भिलार, बेंगळे, सोनावट आणि माचुतर या गावांतील विंधन विहिरींना प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यापैकी रेणोशी, क्षेत्र महाबळेश्वर, बेंगळे आणि सोनावट येथील विंधन विहिरींची कामे पूर्ण झाली आहेत.

पाणी उपलब्धतेसाठी खासगी जलस्रोतांचाही वापर करण्यात येत आहे. भीमनगर, कुंभ्रोशी, भिलार आणि माचुतर येथील खासगी विहिरी व विद्युत पंपांचे अधिग्रहण करण्यात आले आहे. कळमगाव आणि पाली तर्फ आटेगाव येथील विहीर अधिग्रहण प्रस्ताव पुढील कार्यवाहीसाठी तहसीलदारांकडे सादर करण्यात आले आहेत.

टँकरद्वारे पाणीपुरवठ्यालाही सुरुवात करण्यात आली आहे. भीमनगर येथे ८ मे २०२६ पासून एक दिवसाआड टँकरने पाणीपुरवठा सुरू आहे, तर वेळापूर येथे १३ जून २०२६ पासून दररोज टँकरद्वारे पाणी दिले जात आहे.

कृष्णा, कोयना आणि सावित्री या जीवनदायिनी नद्यांच्या उगमभूमीचे संवर्धन आणि तेथील नागरिकांना पाणी उपलब्ध करून देणे ही प्रशासनासमोरील महत्त्वाची जबाबदारी बनली आहे. जलस्रोतांचे जतन, पावसाचे पाणी साठवण, विहिरींचे पुनर्भरण आणि कायमस्वरूपी पाणी योजनांवर भर दिल्यास भविष्यातील टंचाई कमी होण्यास मदत होणार आहे.

नद्यांना जन्म देणाऱ्या महाबळेश्वरच्या भूमीतच निर्माण झालेली पाणीटंचाई ही चिंतेची बाब असली तरी, प्रशासनाच्या विविध उपाययोजनांमुळे नागरिकांना दिलासा देण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl