सदस्य आरक्षण जाहीर होताच महाबळेश्वर तालुक्यात राजकीय वातावरण तापले; ४८ ग्रामपंचायतींमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
सदस्य आरक्षण जाहीर होताच महाबळेश्वर तालुक्यात राजकीय वातावरण तापले; ४८ ग्रामपंचायतींमध्ये इच्छुकांची मोर्चेबांधणी सुरू
प्रतापगड | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील ४८ ग्रामपंचायतींच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सदस्य पदांच्या प्रभागनिहाय आरक्षणाची सोडत नुकतीच ग्रामसभांमधून पार पडली असून त्यानंतर संपूर्ण तालुक्यातील राजकीय वातावरण तापले आहे. सरपंच पदाचे आरक्षण यापूर्वीच जाहीर झाले होते. मात्र आता सदस्य पदांच्या आरक्षणामुळे प्रत्येक गावातील राजकीय समीकरणे बदलू लागली असून इच्छुक उमेदवार, विद्यमान सदस्य, माजी पदाधिकारी आणि विविध राजकीय गटांनी आपापल्या रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.
यंदा सरपंचांची निवड थेट जनतेमधून होणार असल्याने निवडणुकीचे महत्त्व अधिक वाढले आहे. हातलोट, कोट्रोशी, माचूतर, जावली, खिंगर, मेटतळे, कुंभरोशी, पाली तर्फ आटेगाव, चतूरबेट, तळदेव, हरचंदी, कासंवड, भेकवली, नांकींदा, एरंडल, वाळणे, कुरोशी, येरणे बुद्रुक, वेळापूर, खरोशी, घावरी, गावढोशी, आमशी, चिखली, दाभेदाभेकर, बिरवाडी, गोरोशी, पांगारी, पारपार, देवसरे, भिमनगर, अहीर, गोडवली, दांडेघर, आकल्पे, उंबरी, आब्रळ, निवळी, राजपूरी, क्षेत्र महाबळेश्वर, शिरवली, सौंदरी, भिलार, सोनाट, भोसे, झांझवड, वलवण आणि बिरमणी या सर्व ग्रामपंचायतींमध्ये आरक्षण जाहीर झाल्यानंतर संभाव्य उमेदवारांच्या हालचालींना वेग आला आहे.
सदस्य पदांच्या आरक्षणामुळे अनेक ठिकाणी नवीन चेहरे पुढे येण्याची शक्यता निर्माण झाली असून काही गावांमध्ये राजकीय गटांची समीकरणे पूर्णपणे बदलली आहेत. अनेक इच्छुकांना आरक्षणाचा फायदा होणार असल्याने त्यांनी प्रचाराची तयारी सुरू केली आहे, तर काही ठिकाणी आरक्षणामुळे अनेक दिग्गजांचे राजकीय गणित बिघडल्याची चर्चा सुरू आहे. त्यामुळे गावागावांमध्ये बैठका, गाठीभेटी, सल्लामसलत आणि संभाव्य पॅनेल उभारणीच्या हालचाली वाढल्या आहेत.
विशेषतः कुंभरोशी, क्षेत्र महाबळेश्वर, भिलार, दांडेघर, बिरवाडी, जावली, भोसे, पाली तर्फ आटेगाव, झांझवड आणि वेळापूर यांसारख्या राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या ग्रामपंचायतींमध्ये निवडणुकीची रंगत अधिक वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काही ठिकाणी स्थानिक आघाड्या आणि पॅनेल तयार करण्याचे प्रयत्न सुरू आहेत, तर काही गावांमध्ये परंपरेप्रमाणे बिनविरोध निवडणूक व्हावी यासाठी ज्येष्ठ मंडळी पुढाकार घेत असल्याचे दिसून येत आहे.
दरम्यान, आरक्षण जाहीर झाल्यानंतर गावागावांतील चौक, बाजारपेठा, चावड्या आणि सोशल मीडिया गटांवर निवडणुकीच्या चर्चांना उधाण आले आहे. कोण उमेदवारी करणार, कोणत्या गटाची ताकद किती आहे, सरपंचपदासाठी कोणता चेहरा पुढे येणार, कोणत्या गावात बिनविरोध निवडणूक होऊ शकते आणि कुठे चुरशीची लढत होणार याबाबत नागरिकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.
महाबळेश्वर तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका अद्याप अधिकृतपणे जाहीर झालेल्या नसल्या तरी सरपंच व सदस्य पदांच्या आरक्षण प्रक्रियेनंतर निवडणुकीचे बिगुल प्रत्यक्षात वाजले असल्याचे चित्र आहे. आगामी काळात उमेदवारांची घोषणा, गटबाजी, आघाड्या, प्रचारयंत्रणा आणि गावागावांतील राजकीय हालचालींना आणखी वेग येणार असल्याने संपूर्ण तालुक्याचे लक्ष आता ग्रामपंचायत निवडणुकांकडे लागले आहे.
Comments
Post a Comment