११ शस्त्रक्रियांच्या वेदनांवर मात करत गीताने जिंकली इंग्लिश चॅनेल; मुळशीच्या जलपरीची जगाला दाद द्यायला लावणारी कामगिरी
११ शस्त्रक्रियांच्या वेदनांवर मात करत गीताने जिंकली इंग्लिश चॅनेल; मुळशीच्या जलपरीची जगाला दाद द्यायला लावणारी कामगिरी
पुणे विशेष प्रतिनिधी
✍️संतोष मालुसरे :
जिद्द, चिकाटी, सातत्य आणि आत्मविश्वास यांच्या बळावर अशक्य वाटणारी स्वप्नेही साकार करता येतात, याचा प्रत्यय पुन्हा एकदा गीता दिपा महेश मालुसरे हिने जगाला करून दिला आहे. जेलीफिशच्या विषारी दंशामुळे हात गमावण्याची वेळ येऊनही हार न मानता तब्बल ११ शस्त्रक्रियांच्या वेदनांवर मात करत गीताने जगातील सर्वात आव्हानात्मक मानल्या जाणाऱ्या इंग्लिश चॅनेल मधील पोहण्याचे आव्हान यशस्वीरीत्या पूर्ण करून इतिहास रचला आहे.
शनिवार, २७ जून २०२६ रोजी गीताने इंग्लिश चॅनेलमधील ३५ किलोमीटरचे अधिकृत अंतर समुद्रातील प्रबळ लाटा आणि प्रवाहांमुळे प्रत्यक्षात तब्बल ५४ किलोमीटर पोहत १४ तास ३१ मिनिटांत पूर्ण केले. जगभरातील जलतरणपटूंसाठी प्रतिष्ठेची मानली जाणारी ही मोहीम English Channel Swimming Association यांच्या देखरेखीखाली पार पडली.
मुळशीची सुवर्णकन्या म्हणून ओळख असलेल्या गीताने लहान वयापासूनच जलतरण क्षेत्रात आपली स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. वयाच्या अवघ्या तिसऱ्या वर्षापासून तिने पोहण्यास सुरुवात केली आणि अल्पावधीतच राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय यश संपादन केले. २०१७ मध्ये आपल्या तेराव्या वाढदिवसानिमित्त तिने मुंबई येथील समुद्रात तब्बल ३२ किलोमीटरचे अंतर अवघ्या ६ तास २६ मिनिटांत पूर्ण करत विक्रम नोंदवला होता.
दरम्यान, २०२० आणि २०२१ मधील कोरोना महामारीमुळे तिच्या सरावात मोठा खंड पडला. दोन वर्षांचा खंड पडूनही गीताने नव्या उमेदीने पुनरागमन केले. मात्र तिच्या संघर्षाची खरी परीक्षा नोव्हेंबर २०२२ मध्ये आली. रत्नागिरी येथे आयोजित सागरी स्पर्धेदरम्यान तिला जेलीफिश या विषारी जलचराचा गंभीर दंश झाला. या घटनेमुळे तिचा हात निकामी होण्याचा धोका निर्माण झाला होता आणि एका वर्षाच्या कालावधीत तिच्यावर तब्बल ११ शस्त्रक्रिया कराव्या लागल्या.
या गंभीर परिस्थितीनंतर गीताचे जलतरण कारकीर्द संपल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र गीताने हार मानली नाही. हातावरील खोल जखमा पूर्णपणे भरलेल्या नसतानाही आणि सरावादरम्यान हातातून रक्त येत असतानाही तिने आपला सराव खंडित होऊ दिला नाही. गेल्या वर्षभरात तिने दररोज आठ ते दहा तास कठोर सराव करत आपल्या स्वप्नासाठी झुंज कायम ठेवली.
इंग्लिश चॅनेल मोहिमेदरम्यानही जुन्या जखमांमुळे तिला तीव्र वेदनांचा सामना करावा लागला. याच काळात इंग्लंडमध्ये सराव करत असताना तिला पुन्हा एकदा जेलीफिशचा दंश झाला होता. सुदैवाने तो विषारी नव्हता, मात्र स्पर्धेदरम्यान जेलीफिशचा धोका कायम होता. तरीही सर्व संकटांवर मात करत तिने इंग्लिश चॅनेल यशस्वीरीत्या पार केली आणि भारतीय जलतरण क्षेत्राच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंद होईल अशी कामगिरी केली.
गीता सध्या आंतरराष्ट्रीय प्रशिक्षक शेखर खासनीस आणि प्रतिक जावडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करत आहे. तिचे अंतिम ध्येय म्हणजे जगातील सात प्रमुख समुद्री खाड्या पोहून पूर्ण करत "क्वीन ऑफ ओशन" हा प्रतिष्ठेचा बहुमान मिळवणे होय.
इंग्लिश चॅनेल जिंकल्यानंतर आता तिची नजर पुढील मोठ्या आव्हानांवर आहे. येत्या ऑगस्ट महिन्यात ती न्यूयॉर्क येथील ४६ किलोमीटरची "ट्वेंटी ब्रिजेस" स्पर्धा तर सप्टेंबर महिन्यात कॅलिफोर्निया येथील ३२ किलोमीटरची "कॅटालिना चॅनेल" पार करण्यासाठी सज्ज होत आहे.
दरम्यान, गीताचे वडील संतोष मालुसरे यांनी मुलीच्या जिद्दीबद्दल अभिमान व्यक्त करताना सांगितले की, "ज्या जलतरणामुळे हात गमावण्याची वेळ आली होती, त्याच क्षेत्रात जगातील सर्वात कठीण आव्हानांपैकी एक असलेल्या सेव्हन ओशन चॅलेंजचे स्वप्न घेऊन गीता अथक परिश्रम घेत आहे. वेदना, जखमा आणि अडथळ्यांना मागे टाकत ती आपल्या ध्येयाचा पाठलाग करत आहे, याचा वडील म्हणून मला अभिमान वाटतो."
गीता मालुसरेची ही विजयी गाथा केवळ क्रीडा क्षेत्रापुरती मर्यादित नसून प्रतिकूल परिस्थितीशी लढण्याची प्रेरणा देणारी आहे. संघर्ष कितीही मोठा असला तरी जिद्द आणि आत्मविश्वास असेल तर यशाचे शिखर गाठता येते, याचे जिवंत उदाहरण म्हणून तिच्याकडे पाहिले जात आहे.
Comments
Post a Comment