चार दशकांची शैक्षणिक सेवा विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाची; मिलन मुळे यांचे कार्य आदर्शवत – शिवेंद्रसिंहराजे भोसले
चार दशकांची शैक्षणिक सेवा विद्यार्थ्यांच्या घडणीत मोलाची; मिलन मुळे यांचे कार्य आदर्शवत – शिवेंद्रसिंहराजे भोसले
मेढा | प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात तब्बल चाळीस वर्षे अखंडपणे कार्यरत राहून हजारो विद्यार्थ्यांच्या जडणघडणीत मोलाचे योगदान देणारे शिक्षण विस्तार अधिकारी मिलन मुळे यांचे शैक्षणिक कार्य खऱ्या अर्थाने आदर्शवत असून त्यांच्या सेवेमुळे अनेक पिढ्या घडल्या आहेत, असे गौरवोद्गार सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी काढले.
मेढा येथे शिक्षण विस्तार अधिकारी मिलन मुळे यांच्या सेवापूर्ती निमित्त आयोजित सत्कार समारंभात ते बोलत होते. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर, शिक्षक, शिक्षण विभागातील अधिकारी तसेच सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रातील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमास माजी आमदार सदाशिवराव सपकाळ, जिल्हा परिषद सदस्य वसंतराव मानकुमरे, सभापती सौरभ शिंदे, शिक्षण संचालक महेश पालकर, शिक्षक संघाचे नेते संभाजीराव थोरात, सिद्धेश्वर पुस्तके, जिल्हाध्यक्ष चंद्रकांत यादव, मच्छिंद्र मुळीक, पोलिस उपअधीक्षक राजेश वाघमारे, तालुकाध्यक्ष तानाजी आगुंडे, गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, शिक्षक बँकेचे संचालक विजय शिर्के, विशाल कणसे, अनिल शिंदे, विस्तार अधिकारी चंद्रकांत कर्णे, उमेश मोरे, संजीवनी मुळे, उस्मान मनेर, केंद्रप्रमुख दत्तात्रय बाचल, वंदना गंगावणे, हंबीरराव जगताप यांच्यासह शिक्षक व शिक्षणप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी बोलताना मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मिलन मुळे यांच्या प्रदीर्घ सेवाकाळाचा गौरव करताना शिक्षण क्षेत्रातील त्यांचे योगदान उल्लेखनीय असल्याचे सांगितले. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी त्यांनी सातत्याने केलेले कार्य आणि शिक्षकांशी ठेवलेला सुसंवाद हा त्यांच्या कार्यशैलीचा विशेष ठेवा असल्याचे त्यांनी नमूद केले.
सत्काराला उत्तर देताना मिलन मुळे यांनी आपल्या चाळीस वर्षांच्या सेवाप्रवासाचा आढावा घेत कृतज्ञता व्यक्त केली. शिक्षक म्हणून सुरुवात करून शिक्षण विस्तार अधिकारी पदापर्यंतचा प्रवास अत्यंत समाधानकारक ठरल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षण क्षेत्रात काम करत असताना विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी आणि शिक्षकांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी संघटनात्मक पातळीवरही सातत्याने प्रयत्न केल्याचा अभिमान असल्याचे त्यांनी नमूद केले. प्रदीर्घ सेवेनंतर मिळालेल्या या सन्मानामुळे आपल्या कार्याला मिळालेली ही मोठी पावती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.
शिक्षण संचालक महेश पालकर, शिक्षक नेते संभाजीराव थोरात, सिद्धेश्वर पुस्तके आदी मान्यवरांनीही मनोगत व्यक्त करत मिलन मुळे यांच्या कार्याचा गौरव केला. शिक्षण क्षेत्रातील त्यांची निष्ठा, कर्तव्यपरायणता आणि विद्यार्थ्यांप्रती असलेली बांधिलकी यामुळे ते अनेकांसाठी प्रेरणास्थान ठरल्याचे वक्त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे आणखी एक विशेष आकर्षण म्हणजे राष्ट्रीय शिष्यवृत्ती प्राप्त विद्यार्थ्यांचा सत्कार. मिलन मुळे यांच्या हस्ते गुणवंत विद्यार्थ्यांना पदके प्रदान करून त्यांचा गौरव करण्यात आला. यामुळे विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात अधिक प्रगती करण्याची प्रेरणा मिळाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शंकर जांभळे यांनी केले. सूत्रसंचालन अशोक लकडे आणि अंजली गोडसे यांनी केले. उपस्थित मान्यवर, शिक्षक आणि शिक्षणप्रेमींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे हा सेवापूर्ती सत्कार समारंभ भावनिक आणि संस्मरणीय ठरला.
Comments
Post a Comment