महिनाभरापासून गटार तुंबले; दुर्गंधीने सुभाष चौक परिसर त्रस्त, नगरपालिकेच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांचा संताप
महिनाभरापासून गटार तुंबले; दुर्गंधीने सुभाष चौक परिसर त्रस्त, नगरपालिकेच्या दुर्लक्षाबाबत नागरिकांचा संताप
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर शहरातील सुभाष चौक येथील नगरपालिकेच्या बोळामधील सांडपाणी वाहून नेणारे चेंबर गेल्या महिनाभरापासून तुंबले असून त्यातून सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली आहे. विशेष म्हणजे या गंभीर समस्येकडे नागरिकांनी वारंवार लक्ष वेधूनही नगरपालिकेकडून अद्याप कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
सुभाष चौक हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असून मुख्य बाजारपेठेतून स्टेट बँक एटीएम, एचडीएफसी बँक एटीएम तसेच अन्य व्यापारी आस्थापनांकडे जाणारा हा महत्त्वाचा मार्ग आहे. दररोज शेकडो नागरिक, व्यापारी, पर्यटक आणि विद्यार्थी या बोळातून ये-जा करत असतात. मात्र चेंबर तुंबल्यामुळे सांडपाणी रस्त्यावर वाहत असून संपूर्ण परिसरात अस्वच्छता आणि दुर्गंधीचे साम्राज्य निर्माण झाले आहे.
पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यटकांनाही मोठा त्रास सहन करावा लागत आहे. अनेक पर्यटकांना या मार्गातून जाताना अक्षरशः नाक दाबून प्रवास करावा लागत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. शहराच्या स्वच्छतेबाबत आणि पर्यटन व्यवस्थेबाबत नकारात्मक संदेश जाण्याची भीतीही नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
सांडपाण्यामुळे रस्त्यावर घाण साचत असून डास व रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला आहे. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे आरोग्यविषयक संकट उद्भवण्यापूर्वीच नगरपालिका प्रशासनाने तातडीने चेंबरची साफसफाई करून सांडपाणी व्यवस्थेची दुरुस्ती करावी, अशी मागणी नागरिकांकडून करण्यात येत आहे.
महिनाभरापासून सुरू असलेल्या या समस्येमुळे स्थानिक व्यापारी आणि नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण असून, पर्यटन हंगामात शहराच्या प्रतिमेला धक्का पोहोचविणाऱ्या या प्रश्नाकडे प्रशासनाने तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी जोरदार मागणी होत आहे.
Comments
Post a Comment