पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; मिनी बस-ट्रकच्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी
पुणे-बेंगलोर महामार्गावर भीषण अपघात; मिनी बस-ट्रकच्या जोरदार धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, पाच जण जखमी
सातारा | प्रतिनिधी
पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर रविवारी पहाटे भीषण अपघात होऊन दोन जणांचा जागीच मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी झाले. कोल्हापूरहून जेजुरीकडे निघालेल्या मिनी बसची समोरून येणाऱ्या ट्रकला जोरदार धडक बसल्याने ही दुर्घटना घडली. अपघाताची तीव्रता इतकी मोठी होती की मिनी बसच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला असून काही प्रवासी वाहनात अडकून पडले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावरील डिमार्टसमोर रविवारी पहाटे हा अपघात घडला. कोल्हापूरहून जेजुरीकडे प्रवासी घेऊन जाणारी मिनी बस आणि ट्रक यांच्यात जोरदार धडक झाली. धडकेनंतर महामार्गावर एकच गोंधळ उडाला. अपघातात स्नेहल उत्तम कांबळे आणि एकनाथ बापू कांबळे यांचा जागीच मृत्यू झाला. तर अन्य पाच जण जखमी झाले असून त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अपघाताची माहिती मिळताच शिवेंद्रसिंहराजे रेस्क्यू टीमचे कार्यकर्ते तातडीने घटनास्थळी दाखल झाले. रोहित बनसोडे, बबलू पवार, अनिकेत भांडे, ऋषी रंकाळे आणि अजय शिंगे यांनी अत्यंत धाडसाने बचावकार्य हाती घेतले. अपघातग्रस्त मिनी बसमध्ये अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यासाठी त्यांनी तत्काळ प्रयत्न केले. जखमींना प्राथमिक मदत देऊन पुढील उपचारांसाठी रुग्णालयात हलविण्यात आले.
दरम्यान, अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्याने वाहतूक कोंडी निर्माण झाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत करण्याचे काम केले. तसेच अपघातग्रस्त वाहने बाजूला करून महामार्गावरील वाहतूक पूर्ववत करण्यात आली.
या भीषण अपघाताचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून वेग, चालकाचा ताबा सुटणे किंवा अन्य तांत्रिक कारण याबाबत पोलिसांकडून तपास सुरू आहे. या दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून मृतांच्या कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे. महामार्गावरील वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर वाहनचालकांनी अधिक दक्षता बाळगण्याची गरज पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Comments
Post a Comment