१०५ गाव समाजाच्या एकजुटीचा प्रभाव; मनीषा गायकवाड प्रकरणातील आरोपी प्रदीपला अटक
१०५ गाव समाजाच्या एकजुटीचा प्रभाव; मनीषा गायकवाड प्रकरणातील आरोपी प्रदीपला अटक
महाबळेश्वर | प्रतिनिधी
मनीषा गायकवाड आत्महत्या प्रकरणात न्याय मिळवून देण्यासाठी १०५ गाव समाजाने उभारलेल्या एकजुटीला यश मिळाले असून प्रकरणातील आरोपी प्रदीप याला पोलिसांनी अटक केल्याची माहिती समाजाच्या प्रतिनिधींनी दिली आहे. समाजाच्या वतीने सातत्याने पाठपुरावा, निवेदने आणि पोलिस प्रशासनाशी केलेल्या संवादाचा हा परिणाम असल्याची भावना समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
मनीषा गायकवाड यांच्या मृत्यूनंतर या प्रकरणाची गंभीर दखल घेत १०५ गाव समाजाच्या सामाजिक न्याय बैठकीत विविध निर्णय घेण्यात आले होते. त्यामधील प्रमुख निर्णय म्हणजे संबंधित आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात यावी आणि कायदेशीर कारवाईला गती मिळावी हा होता. त्यानुसार समाजाच्या प्रतिनिधींनी पुढाकार घेत या प्रकरणाचा सातत्याने पाठपुरावा सुरू ठेवला होता.
या मोहिमेत ३२ गाव समाजाचे अध्यक्ष धोंडीबा धनावडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावत नियुक्त समितीशी सातत्याने संपर्क ठेवला. सोमवार, दि. १५ जून रोजी धोंडीबा धनावडे, धोंडीबा महाराज संकपाळ, संभाजी जाधव गुरुजी, संतोष आप्पा जाधव यांच्यासह गावाकडील प्रतिनिधींनी मुंबईतील समाज बांधवांच्या उपस्थितीत दिंडोशी पोलीस ठाण्याला भेट दिली. यावेळी संबंधित प्रकरणात गुन्ह्याची प्रभावी नोंद घेण्यात यावी, तपास यंत्रणा अधिक सक्रिय करण्यात यावी आणि आरोपीला तातडीने अटक करण्यात यावी, अशी मागणी करणारे निवेदन पोलिसांना देण्यात आले होते.
प्रतिनिधींनी पोलिस अधिकाऱ्यांसमोर समाजाची परंपरा, सामाजिक व्यवस्था आणि या प्रकरणामुळे समाजामध्ये निर्माण झालेली भावना यांचीही माहिती मांडली होती. या भेटीनंतर पोलिस प्रशासनाने प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत तपासाला गती दिली आणि अखेर आरोपी प्रदीप याला अटक करण्यात आली.
समाजाचे कार्यकर्ते संतोष मालुसरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिंडोशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनी समाजाच्या निवेदनाची दखल घेऊन तत्परतेने कारवाई केली. त्यामुळे समाजाच्या वतीने त्यांचे आभार व्यक्त करण्यात येणार असून लवकरच समाजाच्या प्रतिनिधींची त्यांच्याशी भेट आयोजित करण्यात येणार आहे.
दरम्यान, १०५ गाव समाजाच्या एकत्रित प्रयत्नांमुळे आणि न्यायासाठी उभारलेल्या लढ्यामुळे आरोपीला अटक झाली असून ही घटना समाजाच्या संघटित शक्तीची आणि न्यायासाठीच्या बांधिलकीची प्रचिती देणारी असल्याची भावना समाज बांधवांकडून व्यक्त करण्यात येत आहे. मनीषा गायकवाड यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी समाजाचा पाठपुरावा पुढेही सुरू राहील, असा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
Comments
Post a Comment