‘हरित महाबळेश्वर’साठी सामूहिक पुढाकार! हिलदारी अभियानांतर्गत स्वच्छता, वृक्षारोपण आणि जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

‘हरित महाबळेश्वर’साठी सामूहिक पुढाकार! हिलदारी अभियानांतर्गत स्वच्छता, वृक्षारोपण आणि जनजागृती उपक्रमांना उत्स्फूर्त प्रतिसाद

महाबळेश्वर | प्रतिनिधी

जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधत नेस्ले इंडिया प्रणित हिलदारी अभियानांतर्गत महाबळेश्वर परिसरात विविध पर्यावरणपूरक उपक्रमांचे आयोजन उत्साहात करण्यात आले. पर्यावरण संरक्षणाबाबत जनजागृती निर्माण करणे, स्वच्छता व वृक्षसंवर्धनाचा संदेश समाजापर्यंत पोहोचविणे आणि नागरिकांना सामूहिक कृतीसाठी प्रेरित करणे या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमांना नागरिक, विद्यार्थी, शासकीय अधिकारी तसेच सामाजिक संस्थांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.

महाबळेश्वर क्लस्टरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद, वनविभाग महाबळेश्वर, ग्रामपंचायत मेटगुताड, ग्रामपंचायत क्षेत्र महाबळेश्वर तसेच पंचायत समिती महाबळेश्वर यांनी सक्रिय सहभाग घेतला. विविध विभागांच्या समन्वयातून राबविण्यात आलेल्या या मोहिमेमुळे संपूर्ण परिसरात पर्यावरण संवर्धनाचा संदेश प्रभावीपणे पोहोचला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महाबळेश्वर परिसरातील विविध भागांमध्ये चार स्वच्छता अभियान राबविण्यात आली. ग्रामपंचायत मेटगुताड यांच्या सहकार्याने पांचगणी–महाबळेश्वर मुख्य रस्त्यावर, वनविभागाच्या सहकार्याने वेण्णा लेक परिसरात, पंचायत समिती महाबळेश्वर यांच्या सहकार्याने पंचायत समिती कार्यालय व बाहेरील परिसरात तसेच सेठ गंगाधर माखरिया हायस्कूलच्या सहकार्याने शाळा आणि आठवडी बाजार परिसरात व्यापक स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. या मोहिमांमध्ये तब्बल २७० नागरिकांनी सहभाग घेतला. स्वच्छता अभियानादरम्यान सुमारे २१९.५५ किलो सुका कचरा संकलित करण्यात आला. नागरिकांनी स्वच्छतेचा संदेश देत परिसर स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी प्रत्येकाने स्वीकारली पाहिजे, असे मत व्यक्त केले.

पर्यावरण संवर्धनाच्या उद्देशाने तीन वेगवेगळ्या ठिकाणी वृक्षारोपण कार्यक्रमही पार पडला. ग्रामपंचायत मेटगुताड यांच्या सहकार्याने जयश्री फिरोदिया पॉईंट येथे, वनविभागाच्या सहकार्याने हिरडा नाका परिसरात तसेच सेठ गंगाधर माखरिया हायस्कूल परिसरात एकूण ७५ वृक्षांची लागवड करण्यात आली. पर्यावरणपूरक व देशी प्रजातींच्या रोपांची लागवड करून भविष्यातील हरित महाबळेश्वरचा संकल्प यावेळी व्यक्त करण्यात आला.

याशिवाय ग्रामपंचायत क्षेत्र महाबळेश्वर यांच्या सहकार्याने क्षेत्र महाबळेश्वर येथे स्वच्छता फेरीचे आयोजन करण्यात आले. या फेरीत जिल्हा परिषद शाळा, क्षेत्र महाबळेश्वर येथील ६९ विद्यार्थ्यांसह शिक्षकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. विद्यार्थ्यांनी स्वच्छतेचे महत्त्व पटवून देणारे संदेश देत परिसरात जनजागृती केली. पर्यावरण संवर्धनासाठी लहान वयातच विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण होणे आवश्यक असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले.

या उपक्रमांमध्ये सातारा वनविभागाचे उपवनसंरक्षक श्री. अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक श्री. प्रदीप रौधळ, वनपरिक्षेत्र अधिकारी श्री. महादेव मोहिते, महाबळेश्वर पोलीस निरीक्षक श्री. बापूसाहेब सांडभोर, वनपरिमंडळ अधिकारी श्री. सुनील लांडगे, पंचायत समिती महाबळेश्वरच्या सभापती श्रीमती शकुंतला चोरमले, गटविकास अधिकारी श्री. विजय विभुते, ग्रामविकास अधिकारी श्री. प्रशांत रणपिसे, मेटगुताड ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. भिकन बावळेकर, ग्रामविकास अधिकारी श्री. वैभव काळे, महाबळेश्वर हॉटेल असोसिएशनचे अध्यक्ष श्री. प्रल्हाद राठी, उपाध्यक्ष श्री. मनीष तेजानी, सचिव श्री. रमेश कौल, गर्ल्स युथच्या संस्थापक श्रीमती वैशाली चौरसिया, संयुक्त वनव्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विजय भिलारे आदी मान्यवर उपस्थित होते.

तसेच वनविभाग, पंचायत समिती आणि ग्रामपंचायतींच्या विविध विभागांतील अधिकारी व कर्मचारी, महाबळेश्वरमधील सामाजिक संस्था, जिल्हा परिषद केंद्र शाळा मेटगुताड, जिल्हा परिषद शाळा श्री क्षेत्र महाबळेश्वर, शेठ गंगाधर माखारिया हायस्कूल महाबळेश्वर येथील विद्यार्थी व शिक्षक, महाबळेश्वर गिरिस्थान नगरपरिषद व वनविभागातील स्वच्छता कर्मचारी यांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला.

महाबळेश्वरसारख्या पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील आणि पर्यटनप्रधान क्षेत्रात अशा प्रकारचे पर्यावरणपूरक उपक्रम सातत्याने राबविण्याची आवश्यकता असल्याचे मत यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केले. विविध शासकीय विभाग, स्वयंसेवी संस्था आणि स्थानिक संघटनांनी एकत्रितपणे काम केल्यास महाबळेश्वर हे देशातील सर्वात स्वच्छ, सुंदर आणि पर्यावरणपूरक पर्यटनस्थळ म्हणून निश्चितच नावारूपास येईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl