फुले देत पर्यटकांची माफी मागितली; पाचगणी टोलनाक्यावर तरुणांचे अनोखे आंदोलन


फुले देत पर्यटकांची माफी मागितली; पाचगणी टोलनाक्यावर तरुणांचे अनोखे आंदोलन

पाचगणी | प्रतिनिधी

वाई–पाचगणी–महाबळेश्वर मार्गावरील रखडलेल्या रस्ते विकासकामांविरोधात आणि पर्यटकांना होत असलेल्या गैरसोयीबद्दल स्थानिक नागरिकांच्या भावना व्यक्त करण्यासाठी वाईतील काही जागरूक तरुणांनी पाचगणी टोलनाका येथे एक अनोखे आंदोलन छेडले. पर्यटकांना फुले व कॅडबरी देऊन त्यांचे स्वागत करत, स्थानिक नागरिकांच्या वतीने त्यांची क्षमा मागण्यात आली. या आगळ्यावेगळ्या आंदोलनाने परिसरातील नागरिकांचे तसेच पर्यटकांचे लक्ष वेधून घेतले.

गेल्या दीड ते दोन वर्षांपासून वाई–पाचगणी–महाबळेश्वर परिसरात विविध रस्ते विकासकामे सुरू आहेत. मात्र या कामांच्या संथ गतीमुळे स्थानिक नागरिक आणि पर्यटकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. रस्त्यांवरील खड्डे, वारंवार होणारी वाहतूक कोंडी, अपघातांची वाढती शक्यता आणि प्रवासासाठी लागणारा अतिरिक्त वेळ यामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.

महाबळेश्वर आणि पाचगणी ही पर्यटनावर अवलंबून असलेली महत्त्वाची पर्यटनस्थळे आहेत. या भागाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार असलेले पर्यटक अनेक अडचणी सहन करत येथे पोहोचतात. मात्र पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात विविध ठिकाणी असलेल्या टोलनाक्यांवर त्यांच्याकडून कर आकारला जातो. या करातून मिळणाऱ्या निधीचा वापर नेमका कशासाठी होतो आणि पर्यटकांना त्याबदल्यात कितपत सुविधा मिळतात, असा प्रश्न उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी प्रशासनाचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

या आंदोलनामध्ये अँड. अथर्व पाटील, अँड. ऋषिकेश सकुंडे, अँड. गणेश इथापे, अँड. स्वप्नील आवळे, अभय शिंदे, तनय मिठारी, सौरभ सपकाळ आणि श्रवण मावारे यांनी सहभाग घेतला. पर्यटकांना फुले आणि कॅडबरी देऊन स्वागत करताना, “स्थानिक नागरिक म्हणून तुम्हाला होत असलेल्या त्रासाबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो,” असा संदेश देण्यात आला.

विशेष म्हणजे या आंदोलनामागे कोणत्याही राजकीय पक्षाची किंवा सामाजिक संस्थेची पार्श्वभूमी नव्हती. वाईतील काही जागरूक नागरिकांनी एकत्र येत प्रशासनापर्यंत नागरिकांच्या भावना पोहोचविण्यासाठी हा प्रयत्न केला. रखडलेल्या विकासकामांना गती मिळावी, पर्यटकांना चांगल्या सुविधा उपलब्ध व्हाव्यात आणि परिसरातील वाहतूक व पायाभूत सुविधांच्या समस्यांवर तातडीने उपाययोजना व्हाव्यात, हीच या आंदोलनामागील प्रमुख अपेक्षा असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले.

सकारात्मक पद्धतीने प्रशासनाचे लक्ष वेधून घेणाऱ्या या अनोख्या आंदोलनाची परिसरात चांगलीच चर्चा रंगली असून, संबंधित यंत्रणा याची कितपत दखल घेते याकडे आता नागरिकांचे लक्ष लागले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl