महाबळेश्वर क्लबमधील कथित बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात गुन्हा दाखल; अध्यक्ष, सचिवांसह ठेकेदारावर कारवाई

महाबळेश्वर क्लबमधील कथित बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणात गुन्हा दाखल; अध्यक्ष, सचिवांसह ठेकेदारावर कारवाई

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर शहरातील ऐतिहासिक आणि चर्चेचा विषय ठरलेल्या द क्लब महाबळेश्वर परिसरातील कथित बेकायदेशीर वृक्षतोड प्रकरणाला अखेर कायदेशीर वळण मिळाले असून महाबळेश्वर पोलीस ठाण्यात अध्यक्ष, सचिव आणि संबंधित ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संवर्धन अधिनियम, १९७५ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमान्वये ही कारवाई करण्यात आली आहे.


महाबळेश्वर नगरपालिका वसाहतीतील रहिवासी व पालिकेतील कर्मचारी कल्याण बाजीराव हिवरे (वय ५२) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्राप्त माहितीनुसार, मौजे महाबळेश्वर येथील सिटी सर्व्हे क्रमांक ११७ व ११८ मध्ये असलेल्या द क्लब महाबळेश्वरच्या मालमत्तेवर संबंधितांनी आवश्यक परवानगी न घेता वृक्षतोड केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

या प्रकरणात द क्लब महाबळेश्वरच्या अध्यक्षा मनिषा गोखले शहा (वय ६५), सचिव लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी (निवृत्त) (वय ६२) तसेच द्वारकाधीश कन्स्ट्रक्शन वर्क, मेढा येथील सुहास पार्टे (वय अंदाजे ४०) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २० मे २०२५ ते ११ जून २०२६ या कालावधीत विनापरवाना व बेकायदेशीर वृक्षतोड झाल्याचा आरोप फिर्यादीत नमूद करण्यात आला आहे.

तक्रारदाराने १५ जून २०२६ रोजी महाबळेश्वर पोलीस ठाण्यात हजर राहून तक्रार दिल्यानंतर तत्काळ गुन्हा नोंदविण्यात आला. गुन्हा क्रमांक ५३/२०२६ असा असून महाराष्ट्र (नागरी क्षेत्र) झाडांचे जतन व संवर्धन अधिनियम १९७५ च्या कलम २१(१)(२), ११ तसेच भारतीय न्याय संहिता २०२३ च्या कलम ३२४(४) व ३(५) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

महाबळेश्वर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बी. पी. सांडभोर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाची नोंद करण्यात आली असून सहाय्यक पोलीस अधिकारी अवघडे यांच्याकडे तपास सोपविण्यात आला आहे. दरम्यान, महाबळेश्वरमधील पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील भागात वृक्षतोडीच्या आरोपांमुळे हे प्रकरण विशेष चर्चेत आले असून तपासातून नेमकी किती वृक्षतोड झाली, त्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का आणि संबंधितांची जबाबदारी कितपत आहे, याबाबतचे चित्र स्पष्ट होणार आहे.

पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या महाबळेश्वर परिसरात वृक्षतोडीच्या तक्रारींवर प्रशासन आणि पोलीस यंत्रणेने घेतलेल्या या कारवाईकडे नागरिकांचे लक्ष लागले असून पुढील तपासाच्या निष्कर्षांकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl