पोलादपूर तालुक्यात एसटी बस आणि दुचाकीची जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

पोलादपूर तालुक्यात एसटी बस आणि दुचाकीची जोरदार धडक; दुचाकीस्वार गंभीर जखमी

पोलादपूर | प्रतिनिधी

पोलादपूर तालुक्यातील चरई-सोणारवाडी परिसरातील अपघातप्रवण आणि धोकादायक वळणावर रविवारी एसटी बस आणि दुचाकी यांच्यात झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झाल्याची घटना घडली. अपघातानंतर परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले असून घटनास्थळी नागरिकांची मोठी गर्दी जमली होती.

मिळालेल्या माहितीनुसार, बोरावळे-पोलादपूर मार्गावर धावणारी एसटी बस पोलादपूरच्या दिशेने येत होती. त्याचवेळी घागरकोंड गावाकडे जाणारी दुचाकी (एमएच ४७ बीआर ०३३३) समोरून येत होती. चरई-सोणारवाडी येथील अरुंद तसेच अवघड वळणावर दोन्ही वाहनचालकांचा अंदाज चुकल्याने दुचाकी थेट एसटी बसवर जाऊन आदळली. धडक इतकी जोरदार होती की दुचाकीचे मोठे नुकसान झाले.

या अपघातात दुचाकी चालक नारायण खेडेकर हे गंभीर जखमी झाले. अपघात होताच परिसरातील ग्रामस्थांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. जखमींना वाहनातून बाहेर काढून प्राथमिक मदत देण्यात आली आणि पुढील उपचारांसाठी तातडीने महाड येथील रुग्णालयात रवाना करण्यात आले.

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार तुषार सुतार आणि सतीश कदम यांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून परिस्थिती नियंत्रणात आणली. अपघातामुळे काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला होता. पोलिसांनी वाहतूक सुरळीत करण्याबरोबरच पंचनामा व अन्य आवश्यक प्रक्रिया पूर्ण केल्या.

दरम्यान, काळभैरवनाथ रेस्क्यू टीमचे दीपक उत्तेकर, भाजपचे तालुकाध्यक्ष वैभव चांदे तसेच युवा सेनेचे दत्ता मोरे यांनीही घटनास्थळी उपस्थित राहून मदतकार्यात सक्रिय सहभाग घेतला. त्यांच्या सहकार्यामुळे जखमींना वेळेत उपचारासाठी रवाना करणे शक्य झाले.

चरई-सोणारवाडी येथील संबंधित वळण हे अनेक वर्षांपासून अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखले जाते. रस्त्याची अरुंद रचना, तीव्र वळण आणि वेगवान वाहतूक यामुळे येथे वारंवार अपघात घडत असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. त्यामुळे या ठिकाणी संरक्षक कठडे, इशारा फलक, वेगमर्यादा दर्शक सूचना तसेच इतर आवश्यक वाहतूक सुरक्षा उपाययोजना तातडीने करण्यात याव्यात, अशी मागणी ग्रामस्थांनी पुन्हा एकदा प्रशासनाकडे केली आहे.

या अपघाताचा अधिक तपास पोलादपूर पोलीस करत आहेत.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl