वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी इनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम; अंजुमन हायस्कूलला शालेय साहित्य व ग्रंथालयासाठी कपाटाचे वितरण
वाचन संस्कृतीला चालना देण्यासाठी इनरव्हील क्लबचा स्तुत्य उपक्रम; अंजुमन हायस्कूलला शालेय साहित्य व ग्रंथालयासाठी कपाटाचे वितरण
महाबळेश्वर प्रतिनिधी :
सामाजिक बांधिलकी जपत शिक्षण क्षेत्राला हातभार लावण्याच्या उद्देशाने महाबळेश्वर इनरव्हील क्लबच्या वतीने येथील अंजुमन खैरुल इस्लाम उर्दू हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय या शाळेसाठी शालेय साहित्य व ग्रंथालयासाठी आवश्यक साहित्याची मदत करण्यात आली. या उपक्रमांतर्गत शाळेच्या ग्रंथालयासाठी आवश्यक असलेले कपाट तसेच विद्यार्थ्यांसाठी दोनशेहून अधिक वह्यांचे वितरण करण्यात आले.
या साहित्याचे वितरण इनरव्हील क्लबच्या अध्यक्षा वर्षा पार्टे यांच्या हस्ते शाळेच्या मुख्याध्यापिका शबाना असद इम्रान शेख यांच्याकडे करण्यात आले. यावेळी सचिव सपना अरोरा, अदिती भांगडिया, नेहा साळवी, लक्ष्मी येरलागड्डा, ॲड. राधा मुक्कावर यांच्यासह क्लबच्या इतर सदस्याही उपस्थित होत्या.
यावेळी बोलताना अध्यक्षा वर्षा पार्टे यांनी या उपक्रमामागील उद्देश स्पष्ट करताना विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविणे आणि त्यांना अधिकाधिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देणे हा इनरव्हील क्लबचा मुख्य हेतू असल्याचे सांगितले. अशा प्रकारच्या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला चालना मिळण्यास मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. समाजोपयोगी आणि शिक्षणाभिमुख प्रकल्प सातत्याने राबविण्याचा संकल्प महाबळेश्वर इनरव्हील क्लबने केला असून या माध्यमातून तो प्रत्यक्षात उतरविला जात असल्याचेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमाच्या शेवटी मुख्याध्यापिका शबाना शेख यांनी इनरव्हील क्लबच्या या सहकार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले. समाजातील विविध घटकांनी शिक्षण क्षेत्रासाठी अशा प्रकारे पुढाकार घेतल्यास विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला मोठी मदत होईल, असे त्यांनी सांगितले.
महाबळेश्वरमध्ये शिक्षण क्षेत्रासाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे पालक, शिक्षक आणि नागरिकांकडून कौतुक करण्यात येत असून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी अशा सामाजिक उपक्रमांची आवश्यकता असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
Comments
Post a Comment