हेरिटेज गोल्फ कोर्स प्रकरणात प्रशासनाची माघार?; स्थळ पाहणी ऐनवेळी रद्द, पालिकेच्या नोटिसीलाही ‘द क्लब’चा ठेंगा


हेरिटेज गोल्फ कोर्स प्रकरणात प्रशासनाची माघार?; स्थळ पाहणी ऐनवेळी रद्द, पालिकेच्या नोटिसीलाही ‘द क्लब’चा ठेंगा

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर येथील पालिकेच्या दरे परिसरातील हेरिटेज ग्रेड-१ दर्जा प्राप्त ऐतिहासिक ‘द क्लब’ महाबळेश्वरच्या गोल्फ कोर्स मैदानावरील कथित बेकायदेशीर उत्खनन, सपाटीकरण आणि वृक्षतोड प्रकरणातील बहुप्रतिक्षित संयुक्त स्थळ पाहणी मंगळवारी ऐनवेळी पुढे ढकलण्यात आल्याने तक्रारदार, पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. जमीन मोजणीसाठी वापरण्यात येणाऱ्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण देत प्रशासनाने पाहणी स्थगित केल्याने या प्रकरणातील चौकशीच्या गांभीर्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे.

हेरिटेज दर्जा प्राप्त असलेल्या या ऐतिहासिक गोल्फ कोर्स परिसरात मोठ्या प्रमाणावर उत्खनन, जमीन सपाटीकरण तसेच वृक्षतोड झाल्याच्या तक्रारी समोर आल्यानंतर उपविभागीय अधिकारी डॉ. खरमटे यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली होती. त्यानंतर तहसीलदार आणि वन विभागाला संयुक्त पडताळणी करण्याचे तसेच कामांसाठी आवश्यक परवानग्या, मंजुरी आणि नियमांचे पालन झाले आहे की नाही याची सखोल चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले होते. संबंधित कामांसाठी महसूल, नगरपरिषद, वन विभाग, पर्यावरण विभाग, हेरिटेज संरक्षण संस्था आणि इतर संबंधित प्राधिकरणांची मंजुरी घेण्यात आली होती का, तसेच मंजुरीतील अटी व शर्तींचे पालन झाले होते का, याची तपासणी करण्यासाठी संयुक्त स्थळ पाहणी निश्चित करण्यात आली होती.

तहसीलदार सचिन मस्के यांच्या समन्वयातून मंगळवारी विविध विभागांच्या अधिकाऱ्यांसह ही संयुक्त पाहणी होणार होती. यासाठी तक्रारदार व पर्यावरणप्रेमी अनिल पंडित, वृक्षतोड प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या ‘द क्लब’चे चेअरमन आणि सचिव तसेच संबंधित विभागांचे अधिकारी नियोजित वेळेत उपस्थित होते. मात्र, ऐनवेळी जमीन मोजणीच्या मशीनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याचे कारण पुढे करून पाहणी पुढे ढकलण्यात आली. त्यामुळे या प्रकरणातील चौकशीला पुन्हा विलंब होणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.

दरम्यान, या प्रकरणात आणखी एक गंभीर बाब समोर आली आहे. गोल्फ कोर्स परिसरातील हेरिटेज वास्तूमध्ये नगरपालिकेची पूर्वपरवानगी न घेता पत्र्याचे शेड उभारण्यात आल्याचा आरोप असून त्याबाबत महाबळेश्वर नगरपालिकेचे मुख्याधिकारी योगेश पाटील यांनी क्लब व्यवस्थापनाला नोटीस बजावत खुलासा मागविला होता. मात्र, संबंधित नोटिसीला व्यवस्थापनाकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नसल्याचे समोर आले आहे. त्यामुळे पालिकेच्या आदेशांनाही व्यवस्थापनाकडून गांभीर्याने घेतले जात नसल्याची चर्चा रंगू लागली आहे.

या संपूर्ण प्रकरणाची वरिष्ठ पातळीवरून गंभीर दखल घेतली जात असताना स्थानिक प्रशासनाची भूमिका मात्र संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. सामान्य नागरिकांकडून किरकोळ बांधकामे किंवा नियमभंग झाल्यास तत्काळ नोटिसा आणि कारवाईचा बडगा उगारणारे अधिकारी, हेरिटेज दर्जा प्राप्त जागेवरील गंभीर आरोपांच्या बाबतीत मात्र अपेक्षित तत्परता दाखवत नसल्याची भावना नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे. त्यामुळे प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्न उपस्थित होत असून या प्रकरणात निष्पक्ष आणि कठोर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

आता पुढील स्थळ पाहणीची तारीख कधी जाहीर होते, चौकशी अहवालात नेमके काय निष्पन्न होते आणि संबंधितांवर प्रत्यक्षात कोणती कारवाई केली जाते, याकडे महाबळेश्वरसह संपूर्ण सातारा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. हेरिटेज दर्जा, पर्यावरण संरक्षण आणि कायद्याचे पालन या तिन्ही मुद्द्यांशी संबंधित असलेल्या या प्रकरणात प्रशासनाची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl