अभंग फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम; गुणवंतांचा गौरव आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
अभंग फाउंडेशनचा विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी उपक्रम; गुणवंतांचा गौरव आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप
पोलादपूर | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याबरोबरच गरजू आणि अनाथ विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी आधार निर्माण करण्याच्या उद्देशाने अभंग फाउंडेशन महाराष्ट्राच्या वतीने गुरुवार, दि. २५ जून २०२६ रोजी पोलादपूर येथे भव्य गुणगौरव सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. कोंढवी विभागातील इयत्ता दहावी परीक्षेत तसेच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा यावेळी सत्कार करण्यात येणार असून, पोलादपूर तालुक्यातील अनाथ विद्यार्थ्यांचे शैक्षणिक पालकत्व स्वीकारण्याबरोबरच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटपही करण्यात येणार आहे.
हा कार्यक्रम सकाळी ११ वाजता पोलादपूर येथील कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहात आयोजित करण्यात आला असून परिसरातील विद्यार्थी, पालक आणि नागरिकांमध्ये याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हिरवल प्रतिष्ठान महाडचे संस्थापक-अध्यक्ष मा. श्री. किशोर भाई धारिया हे राहणार आहेत. तसेच जेष्ठ उद्योजक व पोलीस पाटील रहिवासी संघ पुणेचे अध्यक्ष मा. श्री. किसनजी भोसले, पोलादपूरचे पोलीस निरीक्षक श्री. शवदे साहेब, गटविकास अधिकारी सौ. दीप्ती घाट, जिल्हा परिषद सदस्य डॉ. निलेश कुंभार, समाजसेवक श्री. मंगेश मोरे, राव मराठा समाज पोलादपूरचे अध्यक्ष श्री. सुहासराव मोरे, सभापती श्री. चंद्रकांतजी कळंबे, तहसीलदार श्री. कपील घोरपडे, सभापती श्री. अविनाश शिंदे, पंचायत समिती सदस्य श्री. अनिल दळवी, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष श्री. प्रसन्न पालांडे तसेच उद्योजक श्री. तुकाराम शेठ शिंदे यांच्यासह अनेक मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
याशिवाय पोलादपूर तालुका ग्रामीण क्रीडा असोसिएशनचे पदाधिकारी, विविध क्षेत्रातील समाजसेवक, लोकप्रतिनिधी आणि शिवसेनेचे पदाधिकारीही विशेष उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या यशाचा गौरव करण्यासोबतच शिक्षणासाठी आर्थिक अडचणींचा सामना करणाऱ्या विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्याचा अभंग फाउंडेशनचा प्रयत्न असल्याचे आयोजकांनी सांगितले.
अभंग फाउंडेशनचे अध्यक्ष मा. श्री. पशंग दादा दरेकर, संस्थापक सल्लागार मा. श्री. ज्ञानेश्वर दादा मोरे, सचिव अँड बाबु शिंदे, सल्लागार श्री. उत्तम दादा जाधव, संस्थापक अध्यक्ष मा. श्री. सोपान अंकुशराव मोरे तसेच सल्लागार मा. श्री. अनिल पांडवराव मोरे यांच्या नेतृत्वाखाली या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
शिक्षण, सामाजिक बांधिलकी आणि समाजातील वंचित घटकांना आधार देण्याचा संदेश देणारा हा उपक्रम निश्चितच अनेक विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणार असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या कार्यक्रमास विद्यार्थी, पालक आणि नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन अभंग फाउंडेशनच्या वतीने करण्यात आले आहे.
Comments
Post a Comment