पाचगणीत महाकाय वृक्ष कोसळून थरारक दुर्घटना; दोन वाहने व चहाची टपरी चक्काचूर, तिघेजण मृत्यूच्या दाढेतून बचावले
पाचगणीत महाकाय वृक्ष कोसळून थरारक दुर्घटना; दोन वाहने व चहाची टपरी चक्काचूर, तिघेजण मृत्यूच्या दाढेतून बचावले
पाचगणी | प्रतिनिधी
गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाचा फटका आता पाचगणी परिसराला बसू लागला असून सोमवारी सकाळी पाचगणी-वाई मुख्य मार्गावर एक भीषण दुर्घटना घडली. पाचगणीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनसमोर उभा असलेला महाकाय पिंप्रण वृक्ष अचानक उन्मळून पडत समोरच्या बाजूला असलेल्या मोठ्या आंब्याच्या झाडावर कोसळला. या प्रचंड धडकेमुळे दोन्ही झाडे मुळासकट उन्मळून मुख्य रस्त्यावर पडली. या दुर्घटनेत दोन वाहने आणि एक चहाची टपरी पूर्णपणे चिरडली गेली. मात्र, सुदैवाने तिघेजण या भीषण प्रसंगातून थोडक्यात बचावल्याने मोठी जीवितहानी टळली.
काटवली (ता. जावळी) येथील नितीन बेलोशे हे आपल्या मालकीच्या मारुती सुझुकी वॅगनआर कारमधून (क्र. एमएच ११ बीव्ही ५९२५) पाचगणीतून वाईच्या दिशेने जात होते. ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनसमोर पोहोचले असता समोरून अचानक एक महाकाय वृक्ष कोसळताना त्यांच्या निदर्शनास आला. प्रसंगावधान राखत त्यांनी तातडीने वाहन थांबवून ते मागे घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, काही क्षणातच दुसऱ्या झाडाची अजस्त्र फांदी त्यांच्या वाहनावर कोसळली. त्याचवेळी विजेच्या ताराही तुटून गाडीवर पडल्याने बेलोशे हे कारमध्येच अडकून पडले. गाडीची काच फुटल्यामुळे त्यांना किरकोळ दुखापत झाली असून सुदैवाने त्यांचा जीव वाचला.
याच कारच्या पाठीमागे धनंजय कासुर्डे हे आपल्या ॲक्सेस दुचाकीवरून (क्र. एमएच ११ सीडी ४०८९) प्रवास करत होते. झाड कोसळत असल्याचे लक्षात येताच त्यांनी प्रसंगावधान दाखवत चालत्या दुचाकीवरून बाजूला उडी मारली. काही क्षणातच झाडाची मोठी फांदी त्यांच्या दुचाकीवर कोसळली आणि वाहनाचे मोठे नुकसान झाले. त्यांच्या या धाडसी निर्णयामुळे तेही सुखरूप बचावले.
घटनास्थळी रस्त्यालगत असलेल्या आंब्याच्या झाडाखाली विनोद गुलाबराव कासुर्डे-पाटील यांची चहाची टपरी होती. बाहेरून मोठा आवाज आल्याने काहीतरी अनर्थ घडल्याची जाणीव होताच त्यांनी तातडीने टपरीबाहेर धाव घेतली. त्यांच्या बाहेर पडताच काही क्षणांतच दोन्ही महाकाय झाडे थेट टपरीवर कोसळली आणि टपरी पूर्णपणे उद्ध्वस्त झाली. या दुर्घटनेत चारचाकी वाहन, दुचाकी आणि चहाची टपरी मिळून लाखो रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.
घटनेची माहिती मिळताच पाचगणी नगरपालिकेचे कर्मचारी, एसओएस पथकाचे सदस्य तसेच महावितरणचे कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पावसात आणि धुक्यातही बचावकार्य सुरू ठेवत कर्मचाऱ्यांनी कारमध्ये अडकलेल्या नितीन बेलोशे यांची सुखरूप सुटका केली. मुख्य रस्त्यावर दोन्ही झाडे पडल्यामुळे वाई-महाबळेश्वर मार्गावरील वाहतूक दोन्ही बाजूंनी सुमारे दोन तास पूर्णपणे ठप्प झाली होती. त्यामुळे वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन पालिकेने महाबळेश्वरकडून येणारी वाहतूक न्यू इरा स्कूलमार्गे वळवून वाहतूक कोंडी कमी करण्याचा प्रयत्न केला. मुसळधार पाऊस, रिमझिम सरी आणि दाट धुक्यामुळे मदत व बचावकार्यात सुरुवातीला अडथळे निर्माण झाले. त्यानंतर कटरच्या साहाय्याने झाडांच्या फांद्या तोडून रस्ता मोकळा करण्यात आला आणि काही तासांनंतर वाहतूक पूर्ववत सुरू करण्यात आली.
दरम्यान, पाचगणी आणि महाबळेश्वर परिसरात पावसाळ्यात अशा प्रकारच्या घटना वारंवार घडत असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत आहे. पावसाळ्यापूर्वी धोकादायक आणि जीर्ण अवस्थेतील झाडांचे सर्वेक्षण करून त्यांची छाटणी अथवा हटविण्याची कारवाई प्रशासनाने करणे आवश्यक असल्याची मागणी जोर धरू लागली आहे. मात्र, याकडे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.
या घटनेनंतर प्रशासनाने तातडीने धोकादायक वृक्षांची यादी तयार करून प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात यापेक्षाही मोठी दुर्घटना घडण्याची भीती स्थानिक नागरिक आणि पर्यटकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. पाचगणीतील ही घटना प्रशासनासाठी धोक्याची घंटा ठरली असून आता तरी संबंधित यंत्रणा जागी होणार का, असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.
Comments
Post a Comment