‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रमाला बळ; कुंभरोशी जिल्हा परिषद शाळेला ८० हजार रुपयांचे विज्ञान प्रयोगशाळा साहित्य प्राप्त
‘माझी शाळा आदर्श शाळा’ उपक्रमाला बळ; कुंभरोशी जिल्हा परिषद शाळेला ८० हजार रुपयांचे विज्ञान प्रयोगशाळा साहित्य प्राप्त
प्रतापगड | प्रतिनिधी
विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन विकसित व्हावा आणि प्रयोगांच्या माध्यमातून शिक्षण अधिक प्रभावी व गुणवत्तापूर्ण व्हावे या उद्देशाने जिल्हा परिषद शाळा कुंभरोशी येथे विज्ञान प्रयोगशाळा विकसित करण्यासाठी करण्यात आलेल्या मागणीला यश मिळाले असून शाळेला तब्बल ८० हजार रुपये किमतीचे विज्ञान प्रयोगशाळा साहित्य उपलब्ध झाले आहे.
‘माझी शाळा आदर्श शाळा’ या संकल्पनेतून शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने प्रयत्न सुरू असून त्याचाच एक भाग म्हणून विज्ञान विषयाचे अध्यापन अधिक प्रात्यक्षिक स्वरूपात करण्यासाठी आधुनिक प्रयोगशाळेची आवश्यकता व्यक्त करण्यात आली होती. या मागणीची दखल घेत शाळेसाठी विविध विज्ञान प्रयोगांसाठी आवश्यक असलेले साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे.
या साहित्यामुळे विद्यार्थ्यांना केवळ पाठ्यपुस्तकापुरते मर्यादित न राहता प्रत्यक्ष प्रयोग करून विज्ञानातील संकल्पना समजून घेता येणार आहेत. यामुळे विद्यार्थ्यांमध्ये संशोधन वृत्ती, निरीक्षण क्षमता आणि वैज्ञानिक विचारसरणी विकसित होण्यास मोठी मदत होणार आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शहरांप्रमाणे आधुनिक शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने हे पाऊल महत्त्वाचे मानले जात आहे.
शाळेच्या प्रगतीसाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थ आणि विविध संस्थांच्या सहकार्याने सातत्याने विकासकामे राबविली जात असून विज्ञान प्रयोगशाळेच्या उभारणीमुळे शाळेच्या गुणवत्तेमध्ये आणखी भर पडणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.
कुंभरोशी जिल्हा परिषद शाळेच्या या उपक्रमाचे परिसरातून स्वागत होत असून ग्रामीण विद्यार्थ्यांसाठी आधुनिक आणि गुणवत्तापूर्ण शिक्षणाच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल असल्याचे मत शिक्षणप्रेमी नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment