आंबेनळी घाटावर दरडीचे संकट कायम; पोलादपूर तालुका हद्दीत मातीचा ओसरा आणि झाड कोसळल्याने वाहतूक अनेक तास ठप्प

आंबेनळी घाटावर दरडीचे संकट कायम; पोलादपूर तालुका हद्दीत मातीचा ओसरा आणि झाड कोसळल्याने वाहतूक अनेक तास ठप्प

प्रतापगड प्रतिनिधी : 

आंबेनळी घाट परिसरात दरड, मातीचा ओसरा आणि झाडे कोसळण्याच्या घटना सातत्याने घडत असून पावसाळ्याच्या सुरुवातीलाच या घाटमार्गावरील प्रवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. मंगळवारी सायंकाळी सुमारे सहाच्या सुमारास पोलादपूर तालुका हद्दीतील कुंभलवणे फाटा परिसरात मातीचा ओसरा खाली आला, तर कापडे ते पायटा दरम्यान मोठे झाड रस्त्यावर कोसळल्याने या महत्त्वाच्या राज्य मार्गावरील वाहतूक काही तासांसाठी दोन्ही बाजूंनी पूर्णपणे ठप्प झाली होती.

घटनेची माहिती मिळताच पोलादपूर आपत्ती निवारण कक्ष, पोलादपूर पोलीस तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली. ठेकेदारांकडील जेसीबी यंत्रांच्या सहाय्याने रस्त्यावर पडलेली दगडमाती आणि झाड हटविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू करण्यात आले. अथक प्रयत्नांनंतर वाहतूक हळूहळू पूर्ववत करण्यात आली.

दरम्यान, हवामान विभागाने पुढील पाच दिवस मुसळधार पावसाचा इशारा दिला असून रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसह घाटमाथ्यावर मोठ्या प्रमाणावर पर्जन्यवृष्टी सुरू आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

पोलादपूर तालुका हद्दीतील पायटा, कुंभलवणे फाटा आणि रानकडसरी परिसरात मातीचा ओसरा व दगड रस्त्यावर आल्याने वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागली. विशेषतः दुचाकी आणि लहान वाहनचालकांना अतिशय सावधगिरीने प्रवास करावा लागला. रानकडसरी परिसरात सायंकाळी सुमारे ६ वाजून ४१ मिनिटांनी दगड कोसळल्याची नोंद करण्यात आली असून त्यापूर्वी कुंभलवणे परिसरातही मातीचा ओसरा खाली आला होता.

गेल्या अनेक वर्षांपासून दरडग्रस्त म्हणून ओळखला जाणारा आंबेनळी घाटमार्ग दरवर्षी पावसाळ्यात अशाच घटनांमुळे चर्चेत येत असतो. मुसळधार पाऊस, डोंगर उतारावरील सैल झालेली माती आणि झाडांच्या मुळांची पकड कमी होणे या कारणांमुळे या मार्गावर दरडी कोसळण्याचा धोका कायम असतो. परिणामी, या मार्गावरून प्रवास करणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

दरड कोसळल्याची माहिती मिळताच पोलादपूरचे तहसीलदार कपिल घोरपडे, पोलादपूर पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी परिस्थितीची पाहणी करून जेसीबीच्या सहाय्याने रस्ता मोकळा करण्याचे काम सुरू केले.

पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय घाटमार्गावर प्रवास टाळण्याचे तसेच प्रवास करताना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि मुसळधार पावसादरम्यान या मार्गावरून प्रवास करताना वाहनचालकांनी सतर्क राहण्याची आवश्यकता असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl