दापवडीच्या भूमीतून घडले देशसेवेचे मानकरी; दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या वर्धापन दिनी गुणवंतांचा भव्य गौरव
दापवडीच्या भूमीतून घडले देशसेवेचे मानकरी; दत्तात्रय कळंबे महाराज पतसंस्थेच्या वर्धापन दिनी गुणवंतांचा भव्य गौरव
पाचगणी | प्रतिनिधी
जावळी तालुक्यातील दापवडी येथील सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कै. दत्तात्रय कळंबे महाराज नागरी सहकारी पतसंस्था मर्यादित (काटवली) या संस्थेचा ३६ वा वर्धापन दिन उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. संस्थेच्या गौरवशाली वाटचालीचे औचित्य साधून विविध स्पर्धा परीक्षा व शासकीय सेवांमध्ये उल्लेखनीय यश संपादन करणाऱ्या गुणवंत युवक-युवतींचा भव्य नागरी सत्कार करण्यात आला. या उपक्रमामुळे संस्थेची सामाजिक बांधिलकी आणि गुणवत्तेला प्रोत्साहन देण्याची परंपरा पुन्हा एकदा अधोरेखित झाली.
दापवडी येथील संस्थेच्या मुख्य कार्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाची सुरुवात कै. दत्तात्रय कळंबे महाराज, स्व. स. म. बेलोशे गुरुजी आणि स्व. तुकाराम घाडगे यांच्या प्रतिमांचे पूजन करून करण्यात आली. यावेळी संस्थेचे चेअरमन रविकांत बेलोशे, व्हाइस चेअरमन हरिश्चंद्र गावडे, बाबुराव रांजणे, प्रकाश रांजणे, विजय रांजणे, राम चिकणे, मधुकर पवार, इंदू शिंदे, भीमराव खरात, भरत रांजणे, शिवराम पवार, रामदास रांजणे, रामचंद्र बेलोशे, वसंत बेलोशे, अशोक बेलोशे, दीपक पार्टे तसेच व्यवस्थापक अनिल रांजणे आदी मान्यवर उपस्थित होते.
सहकार क्षेत्रातील आर्थिक प्रगतीसोबतच समाजातील शैक्षणिक आणि सामाजिक उन्नतीसाठी कार्यरत असलेल्या या संस्थेने स्थानिक गुणवंतांना प्रोत्साहन देण्याची परंपरा जपली आहे. यावर्षी भारतीय वायूसेनेत निवड झाल्याबद्दल सई प्रतापराव पाटील, महाराष्ट्र लोहमार्ग पोलीस दलात निवड झाल्याबद्दल अजय अशोक साळुंखे आणि महावितरणमध्ये विद्युत सहाय्यक पदावर निवड झाल्याबद्दल अक्षदा नथुराम रांजणे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन मान्यवरांच्या हस्ते या तिघांचा गौरव करण्यात आला.
देशसेवा, सुरक्षा आणि सार्वजनिक सेवाक्षेत्रात यश संपादन करणाऱ्या या तरुणांच्या कामगिरीमुळे दापवडीसह संपूर्ण जावळी तालुक्याचा गौरव वाढला असून त्यांच्या यशातून ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आदर्श निर्माण झाला आहे. त्यांच्या यशामागील जिद्द, परिश्रम आणि चिकाटीचे उपस्थित मान्यवरांनी विशेष कौतुक केले.
कार्यक्रमास जावळी बँकेचे संचालक अजित कळंबे, काटवली सोसायटीचे चेअरमन शंकर पवार, दापवडीचे सरपंच महादेव रांजणे, काटवलीच्या सरपंच मीनाक्षी बेलोशे, रुईघरचे सरपंच अंकुश बेलोशे, रांजणीचे माजी सरपंच सुनील सपकाळ, घोटेघरचे माजी सरपंच दत्तात्रय रांजणे, पांडुरंग शिंदे, महादेव बेलोशे, अरविंद कळंबे, गोपाळ बेलोशे, वैभव पाटील, सुरेश बेलोशे, जगन्नाथ बेलोशे, सुरेश गोळे, चंद्रकांत रांजणे, विलास पाटील, बापूराव रांजणे, चंद्रकांत बेलोशे यांच्यासह संस्थेचे सभासद, कर्मचारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
वर्धापन दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या गौरव सोहळ्यामुळे संस्थेच्या सामाजिक कार्याचा नवा पैलू समोर आला. आर्थिक सेवांसोबतच समाजातील होतकरू युवकांना प्रोत्साहन देऊन त्यांचा सन्मान करण्याची संस्था जपत असलेली परंपरा ही इतर सहकारी संस्थांसाठीही प्रेरणादायी ठरत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
Comments
Post a Comment