शिवमुद्रा प्रतिष्ठानचा सामाजिक वसा; चिरेखिंडच्या विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची शिदोरीसलग २५ वर्षे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम; दुर्गम भागातील शिक्षणासाठी संस्थेची अखंड साथ
शिवमुद्रा प्रतिष्ठानचा सामाजिक वसा; चिरेखिंडच्या विद्यार्थ्यांच्या हाती ज्ञानाची शिदोरी
सलग २५ वर्षे शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम; दुर्गम भागातील शिक्षणासाठी संस्थेची अखंड साथ
पोलादपूर | प्रतिनिधी
समाजातील अनेक संस्था विविध सामाजिक उपक्रम राबवत असतात; मात्र एखाद्या दुर्गम गावातील शाळेशी नाळ जोडून तब्बल पंचवीस वर्षे सातत्याने विद्यार्थ्यांच्या पाठीशी उभे राहणे, ही दुर्मिळ सामाजिक बांधिलकी मानली जाते. अशाच सामाजिक जाणिवेचे दर्शन घडवत शिवमुद्रा प्रतिष्ठान, पोलादपूरच्या वतीने प्रतापगडाच्या पायथ्याशी वसलेल्या दुर्गम चिरेखिंड प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. ज्ञानदानाचा हा उपक्रम यंदा सलग २५ व्या वर्षात पदार्पण करत असून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक वाटचालीला बळ देणारा ठरला आहे.
नवीन शैक्षणिक वर्ष सुरू होताच अनेक पालकांसमोर वह्या, पुस्तके आणि इतर शालेय साहित्य खरेदीचे आव्हान उभे राहते. अशा परिस्थितीत शाळेच्या पहिल्याच दिवसांत आवश्यक साहित्य विद्यार्थ्यांच्या हातात मिळाल्याने चिरेखिंडच्या चिमुकल्यांच्या चेहऱ्यावर समाधान आणि आनंद झळकत होता. त्यांच्या डोळ्यांतील चमक आणि शिक्षणाविषयीचा उत्साह हा उपक्रम किती महत्त्वाचा आहे, याची जाणीव करून देणारा होता.
शिवमुद्रा प्रतिष्ठानने सुरू केलेला हा उपक्रम गेल्या पंचवीस वर्षांपासून अखंडपणे सुरू आहे. एका छोट्याशा वस्तीशाळेपासून सुरू झालेला हा प्रवास आज गुणवंत विद्यार्थी घडविणाऱ्या आणि तालुक्यात आदर्श ठरलेल्या प्राथमिक शाळेपर्यंत पोहोचला आहे. यामागे संस्थेची सातत्यपूर्ण साथ, गावकऱ्यांची शिक्षणाप्रती असलेली आस्था आणि शिक्षकांची अथक मेहनत असल्याचे यावेळी अधोरेखित करण्यात आले.
कार्यक्रमाला रायगड जिल्हा परिषद अर्थ व शिक्षण सभापती चंद्रकांत कळंबे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. याशिवाय शिवमुद्राचे मार्गदर्शक आप्पासाहेब उतेकर, पंचायत समिती सदस्य अनिल दळवी, शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम, सल्लागार अनिल मोरे, सामाजिक कार्यकर्ते तानाजी निकम, उपाध्यक्ष सतीश शिंदे, गणेश कदम, केंद्रप्रमुख विजय पवार, सचिव ज्ञानेश्वर बावलेकर, रविंद्र वाईकर सर, संतोष केसरकर, सुगंधा कदम, मुख्याध्यापक सिताराम जाधव, ज्ञानेश्वर उतेकर सर, कासुरडे मॅडम तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना चंद्रकांत कळंबे यांनी शिवमुद्रा प्रतिष्ठानच्या कार्याचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, “शिवमुद्रा प्रतिष्ठान ही केवळ शैक्षणिक साहित्य वाटप करणारी संस्था नसून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सातत्याने कार्य करणारी सामाजिक चळवळ आहे. कोणतेही कार्य दीर्घकाळ सातत्याने चालू ठेवणे हे मोठे आव्हान असते. मात्र शिवमुद्राने गेली २५ वर्षे निस्वार्थ भावनेने हा उपक्रम सुरू ठेवून समाजासमोर एक आदर्श निर्माण केला आहे.”
चिरेखिंड शाळेच्या शैक्षणिक प्रगतीचा उल्लेख करताना त्यांनी सांगितले की, दुर्गम भागात असूनही ही शाळा गेली अनेक वर्षे गुणवंत विद्यार्थी घडवत आहे. दर्जेदार शिक्षण, शिक्षकांची निष्ठा आणि ग्रामस्थांचा सक्रिय सहभाग यामुळे नवोदयसारख्या स्पर्धात्मक परीक्षांमध्येही येथील विद्यार्थी यश संपादन करत आहेत. शाळेच्या विकासासाठी आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाहीही त्यांनी यावेळी दिली.
आजच्या भौतिकवादी आणि स्पर्धात्मक युगात अनेकजण समाजापासून दूर जात असताना शिवमुद्रा प्रतिष्ठानने मात्र “समाजाने दिलेले समाजालाच परत द्यावे” ही भूमिका कृतीतून जपली आहे. दुर्गम भागातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी केलेली ही मदत केवळ साहित्य वाटपापुरती मर्यादित नसून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रज्वलित केलेला ज्ञानदीप असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
यावेळी संस्थेच्या वतीने कुमार रोहित ढवळे या विद्यार्थ्याचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच यंदाचा संपूर्ण उपक्रम कै. कु. सिद्धी शेडगे या विद्यार्थिनीच्या स्मृतीस समर्पित करण्यात आल्याने कार्यक्रमाला सामाजिकतेबरोबरच भावनिकतेचीही किनार लाभली. त्यामुळे उपस्थितांमध्ये एक वेगळाच भावनिक स्नेहबंध निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले.
सातत्य, सामाजिक बांधिलकी, शिक्षणाविषयीची निस्वार्थ तळमळ आणि दुर्गम भागातील विद्यार्थ्यांप्रती असलेली आपुलकी यांचा सुंदर संगम म्हणजे शिवमुद्रा प्रतिष्ठान होय. गेली पंचवीस वर्षे अखंड सुरू असलेला हा उपक्रम केवळ विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत करणारा नसून समाजपरिवर्तनाची प्रेरणादायी चळवळ ठरत असून इतर सामाजिक संस्थांसाठीही अनुकरणीय आदर्श निर्माण करत आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर उतेकर सर यांनी केले.
Comments
Post a Comment