उद्योजकांच्या प्रश्नांना मिळणार नवी दिशा; रोहन जंगम यांची रिपाई (आ) महाबळेश्वर तालुका उद्योजक आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
उद्योजकांच्या प्रश्नांना मिळणार नवी दिशा; रोहन जंगम यांची रिपाई (आ) महाबळेश्वर तालुका उद्योजक आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती
महाबळेश्वर | प्रतिनिधी
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) यांच्या वतीने महाबळेश्वर तालुक्यातील युवा उद्योजक श्री. रोहन जंगम यांची महाबळेश्वर तालुका उद्योजक आघाडी अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. उद्योजकांच्या विविध समस्या शासन आणि प्रशासनापर्यंत प्रभावीपणे पोहोचवून त्यांचे निराकरण करण्यासोबतच नवउद्योजकांना प्रोत्साहन देणे आणि रोजगारनिर्मितीला चालना देण्याच्या उद्देशाने त्यांच्यावर ही महत्त्वाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
महाबळेश्वर तालुक्यात पर्यटन, सेवा आणि लघुउद्योग क्षेत्रात कार्यरत असलेल्या उद्योजकांसमोरील विविध अडचणी, शासकीय योजनांचा लाभ, व्यवसायवृद्धीसाठी आवश्यक सुविधा तसेच उद्योग क्षेत्राशी संबंधित प्रश्न सोडविण्यासाठी उद्योजक आघाडी महत्त्वाची भूमिका बजावणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
या नियुक्तीप्रसंगी वाई पंचायत समिती सदस्य श्री. स्वप्निल गायकवाड यांनी आदरणीय अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शन व निर्देशानुसार श्री. रोहन जंगम यांना नियुक्तीपत्र प्रदान केले. यावेळी उपस्थित मान्यवरांनी रोहन जंगम यांचे अभिनंदन करून त्यांच्या पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमास सातारा जिल्हा उद्योजक आघाडी अध्यक्ष श्री. मिथुन तळवलकर, महाबळेश्वर तालुकाध्यक्ष श्री. जॉनभाई जोसेफ, तालुका कार्याध्यक्ष श्री. आतिश भोसले (पप्पू), शहराध्यक्ष श्री. विनय गायकवाड यांच्यासह तालुक्यातील पदाधिकारी, कार्यकर्ते आणि उद्योजक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
नियुक्तीनंतर बोलताना श्री. रोहन जंगम यांनी उद्योजकांच्या हक्कांसाठी सातत्याने आवाज उठविणार असल्याचे सांगितले. उद्योग क्षेत्रातील अडचणी सोडविणे, नव्या उद्योजकांना मार्गदर्शन करणे, शासकीय योजनांची माहिती तळागाळापर्यंत पोहोचविणे आणि रोजगारनिर्मितीसाठी सकारात्मक उपक्रम राबविण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.
या नियुक्तीमुळे महाबळेश्वर तालुक्यातील उद्योजकांना संघटित व्यासपीठ मिळणार असून त्यांच्या विविध प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी नवी ऊर्जा आणि दिशा मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
Comments
Post a Comment