प्रतापगडाच्या पायथ्याशी शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी उदयनराजे भोसले यांना निवेदन; ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावू’ असे आश्वासन
प्रतापगडाच्या पायथ्याशी शूरवीर जिवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्याची मागणी
उदयनराजे भोसले यांना निवेदन; ‘मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून प्रश्न मार्गी लावू’ असे आश्वासन
पाटण | प्रतिनिधी
प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवून स्वराज्याच्या इतिहासात अमिट ठसा उमटविणारे शूरवीर जिवाजी महाले यांच्या पराक्रमाचे स्मरण कायम राहावे आणि भावी पिढ्यांना इतिहासातून प्रेरणा मिळावी, यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी त्यांचे भव्य स्मारक उभारण्यात यावे, अशी मागणी शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती आणि स्वाभिमानी नाभिक समाज संघटना, महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने करण्यात आली आहे.
या मागणीसंदर्भात संस्थापक अध्यक्ष समाजभूषण शंकरराव गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने छत्रपती शिवाजी महाराजांचे थेट तेरावे वंशज व खासदार उदयनराजे भोसले यांची भेट घेऊन निवेदन सादर केले.
निवेदनात प्रतापगडाच्या लढाईतील जिवाजी महाले यांच्या शौर्याचा विशेष उल्लेख करण्यात आला आहे. अफझलखान वधाच्या वेळी सय्यद बांदाने छत्रपती शिवाजी महाराजांवर हल्ला केल्यानंतर जिवाजी महाले यांनी अत्यंत धाडसाने त्याचा प्रतिकार करून महाराजांचे प्राण वाचविले होते. त्यांच्या या अतुलनीय पराक्रमामुळे स्वराज्याचा इतिहास निर्णायक वळणावर सुरक्षित राहिला. त्यामुळे अशा महान योद्ध्याचे कार्य आणि योगदान जनमानसात कायम स्मरणात राहावे, यासाठी प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
निवेदन स्वीकारल्यानंतर खासदार उदयनराजे भोसले यांनी या मागणीबाबत सकारात्मक भूमिका घेतली. यावेळी त्यांनी, “शूरवीर जिवाजी महाले यांचे स्वराज्यासाठीचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. या स्मारकाच्या प्रश्नाबाबत मी स्वतः राज्याच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून हा विषय मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करीन,” असे आश्वासन दिल्याचे शिष्टमंडळाने सांगितले.
यावेळी निवेदन देताना स्वाभिमानी नाभिक समाज संघटना महाराष्ट्र राज्यचे संस्थापक राज्याध्यक्ष शंकरराव गायकवाड, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अधिकराव चव्हाण, सातारा जिल्हाध्यक्ष प्रताप भोसले, राज्य उपाध्यक्ष प्रदीप काशीद, राज्य खजिनदार शिवाजी खामकर, पश्चिम महाराष्ट्र प्रवक्ते बाळासाहेब ढवळे, जिल्हा सरचिटणीस अमोल काशीद, समिती सदस्य पांडुरंग चव्हाण, संग्राम माने, दाजी सुर्वे, पाटण तालुका अध्यक्ष विक्रम महिपाल, सातारा तालुका अध्यक्ष जगन्नाथ पवार, कराड उत्तर तालुका अध्यक्ष विनायक भोसले यांच्यासह शूरवीर जिवाजी महाले उत्सव समिती व स्वाभिमानी नाभिक समाज संघटनेचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रतापगड हे स्वराज्याच्या इतिहासातील अत्यंत महत्त्वाचे स्थळ मानले जाते. अशा ऐतिहासिक भूमीवर शूरवीर जिवाजी महाले यांचे स्मारक उभारल्यास इतिहासप्रेमी, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना स्वराज्याच्या पराक्रमी योद्ध्यांच्या कार्याची प्रेरणा मिळेल, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. त्यामुळे या मागणीकडे आता राज्य शासन आणि संबंधित यंत्रणा कोणती भूमिका घेतात, याकडे इतिहासप्रेमींचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment