आंबेनळी घाटात मोठी दुर्घटना टळली; २०० फूट खोल दरीत पडलेला युवक जिवंत, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम व महाबळेश्वर ट्रेकर्सकडून बचावकार्य सुरू
प्रतापगड | प्रतिनिधी
महाबळेश्वर-प्रतापगड मार्गावरील आंबेनळी घाटात रविवारी सायंकाळी मोठी दुर्घटना घडली. घाटातील दुधोशी फाट्याजवळ एक युवक अंदाजे १५० ते २०० फूट खोल दरीत कोसळल्याची घटना घडली. मात्र सुदैवाने संबंधित युवक शुद्धीत असून त्याची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम तसेच महाबळेश्वर ट्रेकर्सचे सदस्य तातडीने घटनास्थळी दाखल झाले. दरीतील अत्यंत अवघड आणि धोकादायक परिस्थितीत बचाव पथकाने तत्काळ मदतकार्य सुरू केले असून दोरखंड आणि अन्य विशेष उपकरणांच्या साहाय्याने युवकापर्यंत पोहोचण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आंबेनळी घाट हा खोल दऱ्या, तीव्र वळणे आणि घनदाट जंगलामुळे संवेदनशील परिसर म्हणून ओळखला जातो. विशेषतः पावसाळ्यात येथे अपघातांचा धोका अधिक वाढत असतो. दुधोशी फाट्याजवळ घडलेल्या या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली असून स्थानिक नागरिक आणि प्रवाशांनी घटनास्थळी गर्दी केली होती.
बचाव पथकाने युवकाशी संपर्क साधण्यात यश मिळविले असून त्याला सुरक्षितपणे वर आणण्यासाठी युद्धपातळीवर प्रयत्न सुरू आहेत. बचावकार्य पूर्ण झाल्यानंतरच संबंधित युवकाची ओळख, तो दरीत कसा पडला आणि घटनेमागील नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
दरम्यान, प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीम आणि महाबळेश्वर ट्रेकर्स यांच्या तत्परतेमुळे मोठी जीवितहानी टळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून संपूर्ण परिसराचे लक्ष या बचाव मोहिमेकडे लागले आहे.
Comments
Post a Comment