शिक्षणासाठी सेवाभावाचा हात; श्री हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेकडून २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर व छत्री वाटप
शिक्षणासाठी सेवाभावाचा हात; श्री हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेकडून २०० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य, दप्तर व छत्री वाटप
पोलादपूर | प्रतिनिधी
समाजातील गरजू विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रोत्साहन मिळावे आणि त्यांच्या शैक्षणिक प्रवासाला बळ मिळावे या उद्देशाने श्री हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या वतीने पोलादपूर तालुक्यातील कापडे विभागातील पितळवाडी आणि कामथे विभागातील मोरसडे येथे शालेय विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य वाटपाचा उपक्रम राबविण्यात आला. संस्थेच्या ११ व्या वर्धापन वर्षानिमित्त आयोजित या उपक्रमात सुमारे २०० विद्यार्थ्यांना शालेय साहित्य, दप्तर तसेच पावसाळी छत्र्यांचे वितरण करण्यात आले.
या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक साहित्य उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा प्रयत्न कौतुकास्पद असल्याची भावना पालक आणि शिक्षकांनी व्यक्त केली. शैक्षणिक साहित्याबरोबरच पावसाळ्यात विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यासाठी उपयोगी ठरणाऱ्या छत्र्यांचे वाटप करण्यात आल्याने विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला.
कार्यक्रमाला संस्थेचे अध्यक्ष युवराज सकपाळ, उपाध्यक्ष रामदास उतेकर, खजिनदार प्रकाश उतेकर, सचिव सुनिल उतेकर, प्रमुख सल्लागार अक्षय (मुन्ना) सकपाळ, नारायण उतेकर (आढावळे), सुभाष उतेकर (मोरसडे), महेश उतेकर (माणगाव), आर्यन उतेकर (कोतवाल), महेश खाडये (वैभववाडी), मुकुंद उतेकर (हरोशी) तसेच ज्येष्ठ नागरिक चंद्रकांत उतेकर उपस्थित होते.
याशिवाय स्थानिक कार्यकर्ते तुकाराम दगडू उतेकर (वरिष्ठ मार्गदर्शक), संजय उतेकर (प्रमुख मार्गदर्शक), भरत उतेकर, सखाराम शिंदे, लक्ष्मण उतेकर, वामन उतेकर, विष्णू उतेकर तसेच कामथेचे सरपंच श्री. गोगावले यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमास मोठ्या संख्येने पालक, शिक्षक आणि ग्रामस्थ उपस्थित होते.
यावेळी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना शिक्षणाचे महत्त्व पटवून देत शैक्षणिक प्रगतीसाठी सातत्याने प्रयत्नशील राहण्याचे आवाहन केले. समाजातील वंचित आणि गरजू घटकांसाठी विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताचे उपक्रम राबविण्याची परंपरा संस्थेने गेली अकरा वर्षे जपली असून, भविष्यातही असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्यात येणार असल्याचे संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवणारा हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्तम उदाहरण ठरला असून, श्री हर हर उत्तेश्वर सेवाभावी संस्थेच्या या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.
Comments
Post a Comment