‘प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर’चा वनविभागाचा निर्धार; पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनचळवळीची हाकउपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची अभिनव संकल्पना; काचेच्या बाटल्यांच्या वापरावर भर, वेण्णालेक परिसरात स्वच्छता मोहीम

‘प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर’चा वनविभागाचा निर्धार; पर्यावरण संवर्धनासाठी व्यापक जनचळवळीची हाक

उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांची अभिनव संकल्पना; काचेच्या बाटल्यांच्या वापरावर भर, वेण्णालेक परिसरात स्वच्छता मोहीम

महाबळेश्वर प्रतिनिधी  :

 जैवविविधता आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पाऊल उचलत सातारा वनविभागाच्या वतीने ‘प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर’ या अभिनव अभियानाची सुरुवात जागतिक पर्यावरण दिनानिमित्त करण्यात आली. महाबळेश्वर व परिसरातील प्रेक्षणीय स्थळांवर सिंगल युज प्लास्टिकचा वापर पूर्णपणे कमी करून त्याऐवजी काचेच्या बाटल्यांचा वापर वाढविण्यासाठी वनविभाग पुढाकार घेणार असून आगामी काळात यासाठी कठोर उपाययोजनाही राबविण्यात येणार असल्याचे सातारा उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी स्पष्ट केले.
छत्रपती प्रतापसिंह उद्यान येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना उपवनसंरक्षक अमोल सातपुते यांनी महाबळेश्वरच्या ऐतिहासिक, धार्मिक आणि पर्यावरणीय वैशिष्ट्यांचा उल्लेख करत पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक जबाबदारी स्वीकारण्याचे आवाहन केले. “देशात अनेक हिलस्टेशन्स असली तरी महाबळेश्वरने आपले वेगळेपण कायम राखले आहे. शंभू महादेवाचे स्थान, पाच नद्यांचे उगमस्थान, राजमाता जिजाऊंच्या सुवर्णतुलेने पावन झालेली ही भूमी आणि दोन तृतीयांश जंगल क्षेत्र लाभलेले हे निसर्गवैभव जपणे ही आपली सर्वांची जबाबदारी आहे,” असे ते म्हणाले.

त्यांनी पुढे सांगितले की, महाबळेश्वर परिसर सध्या प्लास्टिकच्या विळख्यात अडकत चालला असून यामुळे पर्यावरणासोबतच मानवी आरोग्यालाही गंभीर धोका निर्माण होत आहे. जंगल परिसरात मोठ्या प्रमाणावर प्लास्टिक पसरत असल्याने वन्यजीव, परिसंस्था आणि जलस्रोत धोक्यात येत आहेत. त्यामुळे वनविभागाच्या माध्यमातून ‘प्लास्टिक मुक्त महाबळेश्वर’ हे अभियान व्यापक स्वरूपात राबविण्याचा निर्धार करण्यात आला आहे. व्यापारी, व्यावसायिक, स्टॉलधारक तसेच नागरिकांनी ‘नो प्लास्टिक’चा आग्रह धरत या अभियानात सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.

कार्यक्रमात सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांनीही प्लास्टिकमुक्तीच्या चळवळीची आवश्यकता अधोरेखित केली. प्लास्टिकच्या बाटल्यांऐवजी काचेच्या बाटल्या आणि कोल्डड्रिंकच्या प्लास्टिक बाटल्यांऐवजी कॅन्सचा वापर वाढविण्यासाठी व्यापाऱ्यांनी पुढाकार घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले. महाबळेश्वर-पाचगणी पालिकांसह सर्व विभागांनी या अभियानात सहभागी व्हावे, असे आवाहनही त्यांनी केले.

प्रारंभी वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते यांनी प्रास्ताविकातून अभियानाचा उद्देश स्पष्ट केला. गटविकास अधिकारी विजय विभुते आणि पोलीस निरीक्षक बापूसाहेब सांडभोर यांनी वनविभागाच्या उपक्रमाचे कौतुक करत स्वच्छ आणि सुंदर महाबळेश्वरसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली. वन परिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांनी उपस्थितांचे आभार मानले.

या कार्यक्रमानंतर वेण्णालेक परिसरात विशेष स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. वेण्णालेक स्टॉलच्या मागील बाजूस असलेल्या वनविभागाच्या वाहनतळ परिसरात उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सहायक वनसंरक्षक प्रदीप रौंदळ यांच्या उपस्थितीत वनपरिक्षेत्र अधिकारी महादेव मोहिते आणि वन मंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या नेतृत्वाखाली स्वच्छता अभियान पार पडले. या मोहिमेत हिलदारीचे सदस्य, वनरक्षक, सफाई कर्मचारी तसेच वेण्णालेक स्टॉलधारक संघटनेचे पदाधिकारी आणि स्थानिक व्यावसायिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाबळेश्वरचे निसर्गसौंदर्य, जंगलसंपदा आणि पर्यावरणीय संतुलन टिकवून ठेवण्यासाठी सुरू करण्यात आलेले हे अभियान केवळ सरकारी उपक्रम न राहता व्यापक सामाजिक चळवळ बनावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl