आंबेनळी घाटाचे मृत्यूचे सत्र थांबणार कधी?; ८० हून अधिक बळी गेल्यानंतरही पर्यायी मार्गाचा प्रश्न रखडलेलाच

आंबेनळी घाटाचे मृत्यूचे सत्र थांबणार कधी?; ८० हून अधिक बळी गेल्यानंतरही पर्यायी मार्गाचा प्रश्न रखडलेलाच

✍️प्रकाश कदम,

पोलादपूर | प्रतिनिधी

"आणखी किती जणांना दरीत कोसळावे लागणार? आणखी किती कुटुंबे उद्ध्वस्त झाल्यावर शासन आणि प्रशासनाला जाग येणार?" असा संतप्त सवाल आता आंबेनळी घाट परिसरातील नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. गेल्या अनेक वर्षांपासून आंबेनळी घाटाला पर्यायी मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी सातत्याने होत असतानाही हा प्रश्न अद्याप फाईलींच्या ढिगाऱ्यातच अडकून पडल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

कोकण आणि पश्चिम महाराष्ट्राला जोडणारा पोलादपूर–महाबळेश्वर–सुरूर–सातारा हा मार्ग राज्यातील महत्त्वाच्या पर्यटन आणि वाहतूक मार्गांपैकी एक मानला जातो. याच मार्गावरील आंबेनळी घाट हा सर्वाधिक धोकादायक घाटांपैकी एक म्हणून ओळखला जातो. विशेषतः बावली टोक ते दाभिळ टोक या दरम्यानचा टप्पा वाहनचालकांसाठी कायमच धोक्याचा ठरला आहे. एका बाजूला शेकडो फूट खोल दरी, दुसऱ्या बाजूला उंच डोंगरकडे आणि अनेक ठिकाणी अपुऱ्या सुरक्षाव्यवस्था यामुळे या घाटातील प्रवास म्हणजे जीव मुठीत धरून केलेला प्रवास ठरतो.

गेल्या दहा ते बारा वर्षांच्या कालावधीत या घाटात झालेल्या विविध भीषण अपघातांमध्ये ८० हून अधिक नागरिकांना आपला जीव गमवावा लागला आहे. शेकडो जण गंभीर जखमी झाले असून अनेक कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. नुकत्याच झालेल्या दुर्दैवी अपघातात सातारा जिल्ह्यातील आठ तरुणांचा मृत्यू झाल्याने संपूर्ण राज्य हादरले. या घटनेनंतर पुन्हा एकदा घाटाच्या सुरक्षिततेचा आणि पर्यायी मार्गाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

स्थानिक नागरिक, सामाजिक कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी अनेक वर्षांपासून या प्रश्नावर सातत्याने पाठपुरावा करत आहेत. विविध स्तरांवर निवेदने देण्यात आली, बैठका झाल्या, आश्वासने मिळाली आणि माध्यमांतूनही या विषयावर वारंवार आवाज उठविण्यात आला. मात्र प्रत्यक्षात कोणतीही ठोस कार्यवाही झालेली नसल्याने नागरिकांमध्ये संताप वाढत आहे. प्रत्येक मोठ्या अपघातानंतर प्रशासनाकडून शोक व्यक्त केला जातो, मदतीच्या घोषणा केल्या जातात; परंतु अपघात कायमस्वरूपी टाळण्यासाठी आवश्यक असलेले उपाय मात्र आजपर्यंत झालेले नाहीत, अशी भावना स्थानिकांमध्ये आहे.

आंबेनळी घाटाच्या पायथ्याशी असलेला कापडे–पितळवाडी–देवळे–दाभिळ हा मार्ग आधीपासून अस्तित्वात आहे. या मार्गाला दाभिळ ते कुंभरोशी या दरम्यान अवघ्या दोन ते तीन किलोमीटरच्या रस्त्याने जोडल्यास घाटातील सर्वाधिक धोकादायक भाग टाळणे शक्य होईल, असा दावा स्थानिक नागरिक आणि तज्ज्ञांकडून केला जात आहे. या मार्गामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात तसेच पर्यटक आणि स्थानिक नागरिकांसाठी सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊ शकतो. माजी सरपंच तथा शिवमुद्रा प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रकाश कदम यांनी या पर्यायी मार्गासाठी जोरदार पाठपुरावा सुरू ठेवला असून शासनाने तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी त्यांनी केली आहे.

स्थानिकांच्या मते, या प्रश्नात सर्वात मोठा अडथळा तांत्रिक नसून प्रशासकीय इच्छाशक्तीचा आहे. शासनाने गंभीरपणे दखल घेतल्यास सर्वेक्षण, प्रशासकीय मंजुरी आणि निधीची उपलब्धता करून अल्पावधीत हा मार्ग विकसित करणे शक्य आहे. मात्र वर्षानुवर्षे निर्णय प्रक्रियेत होणाऱ्या विलंबामुळे हा प्रश्न अधिकच गंभीर बनत चालला आहे.

याशिवाय छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून अस्तित्वात असलेला आड किनेश्वर–रामवरदायिनी–पार हा ऐतिहासिक मार्गही पर्याय म्हणून अनेकदा चर्चेत आला आहे. या मार्गावरील अवघ्या दोन किलोमीटरचा टप्पा विकसित झाल्यास आणखी एक सुरक्षित पर्याय उपलब्ध होऊ शकतो. या संदर्भात माजी सरपंच प्रकाश कदम आणि पार ग्रामस्थांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. मंत्री भरतशेठ गोगावले यांच्यामार्फतही शासनाकडे मागणी करण्यात आली होती. मात्र आजपर्यंत हा प्रस्तावही प्रत्यक्षात उतरलेला नाही.

दरम्यान, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले, मंत्री भरतशेठ गोगावले आणि आमदार मकरंद पाटील यांनी आता केवळ सहानुभूती व्यक्त करण्यापलीकडे जाऊन ठोस निर्णय घेण्याची गरज असल्याचे मत नागरिक व्यक्त करत आहेत. अपघात झाल्यानंतर मदत जाहीर करण्यापेक्षा अपघात होणारच नाहीत यासाठी उपाययोजना करणे अधिक महत्त्वाचे असल्याची भावना परिसरात तीव्र होत आहे.

जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असलेल्या महाबळेश्वरकडे दरवर्षी लाखो पर्यटक येतात. त्यामुळे आंबेनळी घाटाचा प्रश्न हा केवळ स्थानिक नागरिकांचा नसून राज्याच्या पर्यटन, वाहतूक आणि सार्वजनिक सुरक्षेशी थेट संबंधित विषय बनला आहे. वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर आता शासनाने तातडीने निर्णय घेऊन पर्यायी मार्गाच्या कामाला गती द्यावी, अशी एकमुखी मागणी होत आहे.

आजही परिसरातील नागरिकांचा एकच प्रश्न आहे – "आणखी किती बळी गेल्यावर शासन जागे होणार?" आंबेनळी घाटातील प्रत्येक नवीन अपघात हा केवळ दुर्घटना नसून वर्षानुवर्षे प्रलंबित राहिलेल्या निर्णय प्रक्रियेची आणि प्रशासनाच्या निष्क्रियतेची वेदनादायी आठवण ठरत आहे. आता तरी शासनाने या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहून कायमस्वरूपी उपाययोजना करावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl