आपत्तीपूर्व सज्जतेसाठी महाबळेश्वर तालुक्यात विशेष प्रशिक्षण; पुर व दरड संकटांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक यंत्रणा सक्षम
आपत्तीपूर्व सज्जतेसाठी महाबळेश्वर तालुक्यात विशेष प्रशिक्षण; पुर व दरड संकटांना सामोरे जाण्यासाठी स्थानिक यंत्रणा सक्षम
प्रतापगड | प्रतिनिधी
महाबळेश्वर तालुक्यातील पुरप्रवण आणि दरडप्रवण गावांमधील नागरिक तसेच विविध विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी आयोजित करण्यात आलेले आपत्ती व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वीरीत्या पार पडले. तालुका प्रशासनाच्या पुढाकाराने आयोजित या प्रशिक्षणामध्ये आपत्तीच्या काळात जीवित व वित्तहानी टाळण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राथमिक उपाययोजना, शोध व बचावकार्य, प्रथमोपचार आणि आपत्कालीन प्रतिसाद याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यकारी दंडाधिकारी तथा तहसीलदार आणि तालुका आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष सचिन मस्के यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. महाबळेश्वर तालुका अतिवृष्टी, पूर आणि दरडी कोसळण्याच्या घटनांसाठी संवेदनशील मानला जात असल्याने गावपातळीवरील यंत्रणा अधिक सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात आला.
महाबळेश्वर येथील मध्य संचालनालय कार्यालयात तसेच तापोळा येथील पद्मावती मंदिर परिसरात आयोजित करण्यात आलेल्या प्रशिक्षणास सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, मंडलाधिकारी, ग्राम महसूल अधिकारी, पोलिस पाटील, ग्रामसेवक, कृषीसेवक, कृषी सहाय्यक, अंगणवाडी सेविका, आशा सेविका, वनपाल, आपदा मित्र, युवक मंडळांचे सदस्य, उत्कृष्ट पोहणारे युवक, ट्रेकर्स, रेस्क्यू टीमचे सदस्य तसेच विविध शासकीय विभागांचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यशदा, पुणे येथील मास्टर ट्रेनर योगेश परदेशी आणि त्यांच्या तज्ज्ञ पथकाने प्रशिक्षणादरम्यान दरडी कोसळण्यापूर्वी निसर्गाकडून मिळणारे संकेत कसे ओळखावेत, अचानक पूरस्थिती निर्माण झाल्यास कोणती खबरदारी घ्यावी, बचावकार्याची प्राथमिक तत्त्वे, आपत्तीच्या वेळी काय करावे आणि काय टाळावे, प्रथमोपचाराची पद्धत तसेच गावस्तरीय शोध व बचाव साहित्याचा प्रभावी वापर याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केले.
प्रशिक्षणादरम्यान आपत्ती व्यवस्थापनामध्ये स्थानिक नागरिकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असल्याचे अधोरेखित करण्यात आले. शासकीय यंत्रणा घटनास्थळी पोहोचण्यापूर्वी स्थानिक स्वयंसेवक आणि गावपातळीवरील समित्या प्रभावीपणे कार्यरत राहिल्यास संभाव्य जीवितहानी मोठ्या प्रमाणात टाळता येऊ शकते, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले.
मान्सून हंगामाच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्षणामुळे महाबळेश्वर तालुक्यातील आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम होण्यास मदत होणार असून गावागावांमध्ये आपत्तीविषयक जनजागृती आणि सज्जता वाढीस लागणार असल्याचा विश्वास प्रशासनाने व्यक्त केला आहे.
Comments
Post a Comment