महाबळेश्वर बदनाम करण्यामागे मोठा कट?; ‘नवीन महाबळेश्वर’ला झळाळी देण्यासाठी जुन्या शहराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा नगराध्यक्षांचा गंभीर आरोप


महाबळेश्वर बदनाम करण्यामागे मोठा कट?; ‘नवीन महाबळेश्वर’ला झळाळी देण्यासाठी जुन्या शहराची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न असल्याचा नगराध्यक्षांचा गंभीर आरोप

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वरच्या पर्यटन व्यवसायाला आणि जागतिक स्तरावर निर्माण झालेल्या प्रतिमेला जाणीवपूर्वक धक्का देण्याचा नियोजित प्रयत्न सुरू असल्याचा गंभीर आरोप महाबळेश्वरचे नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी केला आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून किरकोळ घटनांना अतिरंजित स्वरूप देत संपूर्ण शहराची बदनामी केली जात असल्याचा दावा करत त्यांनी या नकारात्मक मोहिमेमागील सूत्रधारांचा शोध घेण्याची मागणी केली आहे. तसेच जुन्या महाबळेश्वरची प्रतिमा मलिन करून ‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्पाला प्राधान्य आणि प्रसिद्धी मिळवून देण्याचा प्रयत्न सुरू आहे का, असा थेट सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.

महाबळेश्वर हे राज्यासह देशातील एक प्रमुख पर्यटनस्थळ म्हणून ओळखले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात आणि हजारो कुटुंबांचा उदरनिर्वाह पर्यटन उद्योगावर अवलंबून आहे. मात्र गेल्या काही काळात सोशल मीडियावर महाबळेश्वरविरोधी नकारात्मक पोस्ट, व्हिडिओ आणि मोहिमा मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असल्याचे दिसून येत आहे. वाहतूक कोंडी, पार्किंग समस्या, टोल नाक्यांवरील वाद किंवा पर्यटकांशी संबंधित काही किरकोळ घटना यांचे व्हिडिओ प्रसारित करून संपूर्ण शहराबाबत चुकीची प्रतिमा निर्माण केली जात असल्याचे नगराध्यक्ष शिंदे यांनी म्हटले आहे.

यावेळी त्यांनी एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित करत सांगितले की, महाबळेश्वरमध्ये अशा प्रकारच्या समस्या यापूर्वीही अस्तित्वात होत्या आणि सोशल मीडिया देखील उपलब्ध होता. मात्र गेल्या एक-दोन वर्षांत अचानक महाबळेश्वरविरोधी प्रचाराचे प्रमाण एवढ्या मोठ्या प्रमाणात का वाढले, हा संशोधनाचा विषय आहे. यामागे कोणाचे आर्थिक, राजकीय किंवा व्यावसायिक हितसंबंध दडले आहेत का, याची चौकशी होणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले.

‘नवीन महाबळेश्वर’ प्रकल्पाचा संदर्भ देताना नगराध्यक्ष शिंदे यांनी अत्यंत खोचक प्रश्न उपस्थित केला. महाबळेश्वर आणि क्षेत्र महाबळेश्वर अशा दोन स्वतंत्र ओळखी आधीच अस्तित्वात असताना तिसऱ्या प्रकल्पाला पुन्हा ‘नवीन महाबळेश्वर’ असे नाव देण्यामागे नेमका उद्देश काय आहे, असा सवाल त्यांनी केला. जुन्या महाबळेश्वरची प्रतिमा कमकुवत करून नव्या प्रकल्पाला अधिक आकर्षक आणि पर्यटकांसाठी पसंतीचे ठिकाण म्हणून सादर करण्याचा प्रयत्न तर होत नाही ना, अशी शंका त्यांनी व्यक्त केली.

महाबळेश्वर शहरातील रस्ते, पार्किंग व्यवस्था, पाणीपुरवठा, स्वच्छता, पर्यटन सुविधा आणि इतर मूलभूत विकासकामांसाठी मोठ्या प्रमाणावर निधीची आवश्यकता असताना नव्या प्रकल्पांकडे कोट्यवधी रुपयांचा निधी वळवला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. जुन्या शहरातील समस्या कायम असताना त्याकडे दुर्लक्ष करून नवीन प्रकल्पांना प्राधान्य दिले जात असल्याने स्थानिकांमध्ये नाराजी असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, सोशल मीडियावर काही विशिष्ट घटनांचे व्हिडिओ वारंवार प्रसारित करून ‘बॉयकॉट महाबळेश्वर’सारखे ट्रेंड निर्माण करण्याचे प्रयत्न होत असल्याचा आरोपही नगराध्यक्षांनी केला. काही व्यक्ती किंवा गट जाणीवपूर्वक शहराविषयी नकारात्मक वातावरण तयार करत असून त्याचा थेट परिणाम पर्यटन व्यवसायावर होत असल्याचे त्यांनी नमूद केले. अशा प्रचारामुळे पर्यटकांच्या मनात चुकीचे संदेश जातात आणि स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, टॅक्सी चालक, मार्गदर्शक तसेच पर्यटनाशी संबंधित हजारो कुटुंबांच्या रोजगारावर परिणाम होऊ शकतो, अशी चिंता त्यांनी व्यक्त केली.

नगराध्यक्ष सुनील शिंदे यांनी महाबळेश्वरकर, व्यापारी संघटना, हॉटेल व्यावसायिक, सामाजिक संस्था आणि पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व घटकांना एकत्र येण्याचे आवाहन केले आहे. महाबळेश्वर हे केवळ पर्यटनस्थळ नसून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचे केंद्र आहे. त्यामुळे शहराची प्रतिमा खराब करण्याच्या कोणत्याही प्रयत्नांविरोधात सर्वांनी एकजुटीने उभे राहण्याची गरज असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

या संपूर्ण प्रकरणामुळे आता काही महत्त्वाचे प्रश्न चर्चेत आले आहेत. महाबळेश्वरची प्रतिमा डागाळून ‘नवीन महाबळेश्वर’ला झळाळी देण्याचा प्रयत्न कोण करत आहे? सोशल मीडियावरील नकारात्मक मोहिमांमागे नेमके कोणते हितसंबंध आहेत? जुन्या महाबळेश्वरच्या विकासाला दुय्यम स्थान देऊन नवीन प्रकल्पांना प्राधान्य का दिले जात आहे? आणि पर्यटन राजधानी म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरच्या प्रतिमेला धक्का पोहोचविण्यामागे आर्थिक व राजकीय स्वार्थ दडले आहेत का? या प्रश्नांची उत्तरे शोधण्याची मागणी आता अधिक तीव्र होताना दिसत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl