आंबेनळी घाट पुन्हा हादरला!अलिबागच्या युवकाने आजीचा खून करून मृतदेह खोल दरीत फेकल्याची कबुली; प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमची धाडसी मोहीम
अलिबागच्या युवकाने आजीचा खून करून मृतदेह खोल दरीत फेकल्याची कबुली; प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमची धाडसी मोहीम
प्रतापगड प्रतिनिधी :
सह्याद्रीच्या धोकादायक व भयावह दर्यांसाठी ओळखल्या जाणाऱ्या आंबेनळी घाटात पुन्हा एकदा खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. पोलादपूर तालुक्याच्या हद्दीतील बावली टोक ते दाभिल टोक दरम्यान खोल दरीमध्ये एका वृद्ध महिलेचा मृतदेह आढळून आल्याने संपूर्ण परिसर हादरला आहे. अलिबाग येथील एका युवकाने स्वतःच्या आजीचा खून करून तिचा मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीमध्ये फेकून दिल्याची धक्कादायक माहिती पोलिस तपासात समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दिनांक ४ जून २०२६ रोजी सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमचे सदस्य अजित जाधव यांना पोलादपूर पोलीस स्टेशनमधून फोन आला. आंबेनळी घाटातील खोल दरीमध्ये मृतदेह फेकण्यात आल्याची माहिती देत शोधमोहीमेसाठी तातडीने मदत मागविण्यात आली. त्यानंतर लगेचच हा संदेश महाबळेश्वर ट्रेकर्स व प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या व्हॉट्सअॅप ग्रुपवर पाठविण्यात आला.
संदेश मिळताच टीमचे उपलब्ध सदस्य सुनील बाबा भाटिया यांच्या घरी आवश्यक रेस्क्यू साहित्य जमा करण्यासाठी दाखल झाले. दोरखंड, हार्नेस, स्ट्रेचर व इतर तांत्रिक साहित्य घेऊन सदस्य आंबेनळी घाटाच्या दिशेने रवाना झाले. मात्र मृतदेह नेमका कोणत्या ठिकाणी फेकण्यात आला आहे याची कोणालाही अचूक माहिती नव्हती. त्यामुळे घाटातील धोकादायक दर्या आणि झाडीमध्ये शोधमोहीम सुरू करण्यात आली.
सुमारे एक ते दीड तास अथक शोध घेतल्यानंतर जवळपास १०० फूट खोल दरीमध्ये काळ्या रंगाच्या पिशवीमध्ये मृतदेह आढळून आला. त्यानंतर प्रतापगड सर्च अँड रेस्क्यू टीमच्या सदस्यांनी तातडीने रेस्क्यू सेटअप तयार करून दरीमध्ये उतरण्यास सुरुवात केली. अत्यंत धोकादायक परिस्थितीत जवळपास एक तास प्रयत्न केल्यानंतर मृतदेह सुरक्षितपणे बाहेर काढण्यात टीमला यश आले.
या संपूर्ण मोहिमेत सुनील बाबा भाटिया, अनिल केळगणे, जयवंत बिरामणे, जयदीप शिंदे, अनिकेत वागदरे, आशिष बिरामणे, ऋषिकेश जाधव, अजित जाधव, मुन्ना उतेकर, ओमकार सोनावणे, शरद सावंत, निखिल सावंत आणि संकेत सावंत या सदस्यांनी सहभाग घेतला. त्यांच्या धाडसी आणि तत्पर कामगिरीचे सर्वत्र कौतुक होत आहे.
दरम्यान, अलिबाग पोलिसांनी संशयित युवकाला ताब्यात घेतल्यानंतर चौकशीदरम्यान त्याने स्वतःच्या आजीचा खून केल्याची कबुली दिली असल्याची माहिती समोर आली आहे. खून केल्यानंतर पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने मृतदेह आंबेनळी घाटातील खोल दरीत फेकून दिल्याचे त्याने पोलिसांना सांगितले. तसेच मृतदेह टाकलेले ठिकाणही पोलिसांना दाखवून दिले.
या घटनेमुळे आंबेनळी घाट पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला आहे. काही दिवसांपूर्वीच या घाटात भीषण अपघात होऊन आठ युवकांचा मृत्यू झाला होता. त्या दुर्दैवी घटनेची आठवण अद्याप ताजी असतानाच आता समोर आलेल्या खून प्रकरणामुळे नागरिकांमध्ये भीती आणि चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
विशेष म्हणजे याच परिसरात यापूर्वीही एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला होता. त्यामुळे आंबेनळी घाट परिसर पुन्हा एकदा गूढ, धोकादायक आणि गंभीर घटनांमुळे चर्चेत आला आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास अलिबाग पोलीस करीत आहेत.
Comments
Post a Comment