‘माझं गाव माझी बातमी’चा दणका; सुभाष चौकातील तुंबलेल्या गटारावर अखेर नगरपरिषदेची कार्यवाही सुरू
‘माझं गाव माझी बातमी’चा दणका; सुभाष चौकातील तुंबलेल्या गटारावर अखेर नगरपरिषदेची कार्यवाही सुरू
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर शहरातील सुभाष चौक परिसरात महिनाभरापासून तुंबलेल्या सांडपाणी चेंबरामुळे निर्माण झालेल्या गंभीर समस्येची दखल अखेर नगरपरिषद प्रशासनाने घेतली असून संबंधित ठिकाणी साफसफाई व दुरुस्तीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. १२ जून रोजी ‘माझं गाव माझी बातमी’मध्ये या समस्येबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध करण्यात आले होते. या वृत्ताची दखल घेत प्रशासनाने हालचाल सुरू केल्याने स्थानिक नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.
सुभाष चौक येथील नगरपालिकेच्या बोळामधील सांडपाणी वाहून नेणारे चेंबर तुंबल्यामुळे गेल्या महिनाभरापासून सांडपाणी थेट रस्त्यावर वाहत होते. त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरली होती. मुख्य बाजारपेठ, बँक एटीएम तसेच विविध व्यापारी आस्थापनांकडे जाणाऱ्या या महत्त्वाच्या मार्गावरून दररोज शेकडो नागरिक, व्यापारी, पर्यटक आणि विद्यार्थी ये-जा करीत असल्याने त्यांना मोठ्या गैरसोयीला सामोरे जावे लागत होते.
पर्यटननगरी म्हणून ओळख असलेल्या महाबळेश्वरमध्ये शहराच्या मध्यवर्ती भागातच अशी परिस्थिती निर्माण झाल्याने पर्यटकांमध्येही नाराजी व्यक्त होत होती. सांडपाणी रस्त्यावर वाहत असल्याने अस्वच्छता वाढली होती तसेच डास व रोगराई पसरण्याचा धोका निर्माण झाला होता. पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर ही समस्या अधिक गंभीर स्वरूप धारण करण्याची शक्यता असल्याने नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत होती.
या पार्श्वभूमीवर ‘माझं गाव माझी बातमी’ने १२ जून रोजी या प्रश्नावर प्रकाश टाकत नागरिकांच्या व्यथा प्रशासनापर्यंत पोहोचवल्या होत्या. वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर नगरपरिषद प्रशासनाने संबंधित विभागाला सूचना देत प्रत्यक्ष ठिकाणी पाहणी केली. त्यानंतर तुंबलेले चेंबर साफ करण्यासह सांडपाणी व्यवस्थेतील अडथळे दूर करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
प्रशासनाने कार्यवाही सुरू केल्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले असले तरी शहरातील अशा मूलभूत सुविधांच्या प्रश्नांवर वेळेवर उपाययोजना होणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले जात आहे. भविष्यात अशा समस्या उद्भवू नयेत यासाठी सांडपाणी व्यवस्थेची नियमित देखभाल व तपासणी करण्याची मागणीही स्थानिक व्यापारी आणि नागरिकांकडून करण्यात येत आहे.
‘माझं गाव माझी बातमी’च्या वृत्तामुळे प्रशासनाला जाग आली असून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणाऱ्या स्थानिक पत्रकारितेची ताकद पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे.
Comments
Post a Comment