मोबाईल हरवला नव्हता, हरवली होती संवेदनशीलता!एस.टी.च्या एका प्रवासाने निर्माण केलेला अस्वस्थ करणारा प्रश्न
मोबाईल हरवला नव्हता, हरवली होती संवेदनशीलता!
एस.टी.च्या एका प्रवासाने निर्माण केलेला अस्वस्थ करणारा प्रश्न
लेखक : अमर सलागरे
महाराष्ट्राची जीवनवाहिनी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एस.टी. महामंडळाशी राज्यातील सर्वसामान्य माणसाचे एक वेगळे नाते आहे. ग्रामीण भागातील लाखो नागरिकांसाठी एस.टी. ही केवळ वाहतुकीचे साधन नसून त्यांच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग आहे. विद्यार्थी, शेतकरी, कामगार, ज्येष्ठ नागरिक आणि सामान्य प्रवासी आजही मोठ्या विश्वासाने एस.टी.चा वापर करतात. मात्र नुकत्याच झालेल्या एका प्रवासादरम्यान घडलेल्या घटनेने हा विश्वास आणि त्यामागील मानवी संवेदनशीलता याबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले.
अनेक वर्षांनंतर एस.टी.ने प्रवास करण्याचा योग आला. महाड ते कापडे हा माझा प्रवास MH 14 BT 4302 क्रमांकाच्या ठाणे–महाबळेश्वर बसमधून सुरू होता. बसमध्ये फारशी गर्दी नव्हती. सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र पोलादपूर येथे घडलेल्या एका प्रसंगाने मन विषण्ण झाले.
पोलादपूर बसस्थानकावर एक वयोवृद्ध गृहस्थ बसमध्ये चढले. बस सुटल्यानंतर काही क्षणांतच त्यांच्या लक्षात आले की त्यांचा मोबाईल फोन बसस्थानकावर त्यांच्या नातेवाईकांकडेच राहिला आहे. त्यांनी तातडीने वाहकाकडे धाव घेतली. त्यांचे नातेवाईक मोबाईल घेऊन बसच्या मागून येत असल्याचे सांगत त्यांनी काही क्षणांसाठी बस थांबवण्याची विनंती केली.
त्या ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावरची चिंता स्पष्ट दिसत होती. ते वारंवार विनंती करत होते. मात्र त्यांच्या अडचणीकडे अपेक्षित गांभीर्याने पाहिले गेले नाही. वाहकाने "ड्रायव्हरना सांगा" एवढेच उत्तर दिले. परिस्थितीची कल्पना देऊन चालकाला काही क्षणांसाठी गाडी थांबवण्याचा प्रयत्न करण्याऐवजी जबाबदारी झटकण्यात आली.
नाईलाजाने ते गृहस्थ चालकाकडे गेले. त्यांनी पुन्हा आपली अडचण सांगितली. मात्र तिथेही त्यांना अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. उलट "तुम्ही खाली उतरा आणि मागून दुसऱ्या गाडीने या" असे उत्तर देण्यात आले. एका ज्येष्ठ नागरिकाची विनवणी, त्यांची मानसिक अवस्था आणि त्यांची अडचण यांचा विचार झाल्याचे दिसले नाही.
दरम्यान, त्या गृहस्थांचे नातेवाईक मोबाईल घेऊन दुचाकीवरून बसच्या मागे येत होते. ते सतत हॉर्न वाजवत होते. चालक आणि वाहकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होते. सुरुवातीला बस वाहतुकीच्या कोंडीत होती. अशा वेळी काही सेकंद थांबणे शक्य होते. मात्र तसे झाले नाही. पुढे रस्ताही मोकळा झाला, तरी बस थांबवण्यात आली नाही.
हा सर्व प्रकार पाहताना मलाही राहवले नाही. मी स्वतः वाहकाला विनंती केली की, "दोन मिनिटांसाठी गाडी थांबवा. ते बिचारे किती वेळ विनवणी करत आहेत." मात्र त्याचाही तात्काळ परिणाम झाला नाही.
अखेरीस त्या नातेवाईकांनी दुचाकी बसच्या पुढे नेऊन गाडी थांबवली आणि त्या वयोवृद्ध गृहस्थांना त्यांचा मोबाईल परत मिळाला. तोपर्यंत बस पोलादपूरपासून जवळपास दोन किलोमीटर पुढे गेली होती.
या संपूर्ण घटनेकडे केवळ मोबाईल हरवण्याचा किंवा सापडण्याचा प्रसंग म्हणून पाहता येणार नाही. हा विषय मानवी संवेदनशीलतेचा आहे. नियमांचे पालन आवश्यकच आहे; वेळापत्रक पाळणेही महत्त्वाचे आहे. परंतु नियमांच्या चौकटीत राहून एखाद्या ज्येष्ठ नागरिकाची अडचण समजून घेणे आणि शक्य तेवढी मदत करणे हीदेखील सार्वजनिक सेवेचा भाग नाही का?
एस.टी. ही जनतेची सेवा आहे. त्या सेवेचा गाभा केवळ वाहन चालवणे किंवा तिकीट देणे एवढाच नसून प्रवाशांच्या अडचणी समजून घेणे, त्यांच्याशी माणुसकीने वागणे आणि प्रसंगानुरूप संवेदनशीलता दाखवणे हाही त्यात तितकाच महत्त्वाचा भाग आहे.
आज त्या वयोवृद्ध गृहस्थांना त्यांचा मोबाईल परत मिळाला, ही आनंदाची बाब आहे. परंतु तो मिळाला नसता तर त्यांची किती गैरसोय झाली असती? त्यांच्या संपर्कातील महत्त्वाची माहिती, आर्थिक व्यवहार, कुटुंबाशी असलेला संपर्क आणि इतर अनेक गोष्टींवर त्याचा परिणाम झाला असता.
सदर घटना महाबळेश्वर डेपोच्या चालक व वाहकांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्न उपस्थित करण्यासाठी नव्हे, तर सार्वजनिक सेवेत मानवी संवेदनशीलतेचे महत्त्व अधोरेखित करण्यासाठी मांडत आहे. कारण शेवटी प्रवाशांना केवळ सेवा नको असते, तर त्या सेवेमध्ये माणुसकीची ऊबही हवी असते.
म्हणूनच आजही मनात एकच प्रश्न घोळत आहे—
दोष कुणाला द्यायचा?
नियमांना? व्यवस्थेला? चालकाला? वाहकाला?
की माणुसकीपेक्षा वेळापत्रकाला अधिक महत्त्व देणाऱ्या आपल्या एकूणच कार्यसंस्कृतीला?
याचे उत्तर प्रत्येकाने स्वतःच्या मनाला विचारावे.
— अमर सलागरे
Comments
Post a Comment