गोल्फ कोर्स प्रकरणातील चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात; प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाईची प्रतीक्षा
गोल्फ कोर्स प्रकरणातील चौकशी अहवाल अद्याप गुलदस्त्यात; प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशानंतरही कारवाईची प्रतीक्षा
महाबळेश्वर | प्रतिनिधी
महाबळेश्वर येथील ऐतिहासिक आणि हेरिटेज ग्रेड-१ दर्जा प्राप्त गोल्फ कोर्स मैदान परिसरात कथित वृक्षतोड, मोठ्या प्रमाणावरील उत्खनन, अंतर्गत रस्ते निर्मिती आणि बेकायदेशीर बांधकामांच्या आरोपांमुळे गाजत असलेल्या प्रकरणातील चौकशी अहवाल अद्यापही गुलदस्त्यात असल्याने नागरिकांमध्ये प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे ११ जून रोजी उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी प्रत्यक्ष स्थळ पाहणी करून संबंधित विभागांना संयुक्त पंचनामा करण्याचे तसेच नियमभंग आढळल्यास कारवाईचे तोंडी आदेश दिले होते. मात्र त्यानंतरही अधिकृत अहवाल अथवा कारवाईबाबत कोणतीही स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
महाबळेश्वर नगरपरिषद हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक ११७ व ११८ मधील ऐतिहासिक गोल्फ मैदानाला ब्रिटिशकालीन वारसा लाभलेला असून या परिसराचा समावेश हेरिटेज ग्रेड-१ मिळकतींमध्ये करण्यात आला आहे. तसेच हा भाग पर्यावरणीयदृष्ट्या संवेदनशील (Eco-Sensitive Zone) क्षेत्रात मोडत असल्याने येथे विकासकामांसाठी विशेष नियम लागू आहेत.
पर्यावरणप्रेमी आणि स्थानिक नागरिकांनी केलेल्या तक्रारीनंतर प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे यांनी संबंधित ठिकाणी भेट देऊन पाहणी केली होती. या पाहणीदरम्यान मोठ्या प्रमाणात जमिनीचे सपाटीकरण, उत्खनन, वृक्षतोड, अंतर्गत रस्त्यांची निर्मिती तसेच पत्र्याच्या शेडचे बांधकाम झाल्याचे निदर्शनास आल्याचे सांगितले जाते. काही ठिकाणी तोडलेले वृक्ष पुरून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचाही संशय व्यक्त करण्यात आला होता.
पाहणीनंतर महसूल, नगरपालिका आणि वन विभागाच्या अधिकाऱ्यांना संयुक्त पंचनामा करण्याचे आदेश देण्यात आले होते. तसेच संबंधित परवानगीच्या अटींचा भंग झाल्याचे आढळल्यास दोषींवर फौजदारी कारवाई करण्याचे निर्देशही देण्यात आले होते. बेकायदेशीर शेडचे काम तात्काळ थांबविण्याबाबतही सूचना करण्यात आल्या होत्या.
यापूर्वीच जिल्हाधिकारी कार्यालय, सातारा यांनी संबंधित तक्रारीची दखल घेत उपविभागीय अधिकारी, वाई यांना चौकशी करून अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यामुळे या प्रकरणात वस्तुस्थिती समोर येईल आणि जबाबदार व्यक्तींवर कारवाई होईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत होती. मात्र पाहणी आणि आदेशांना काही दिवस उलटूनही चौकशी अहवाल सार्वजनिक झालेला नसल्याने तसेच पुढील कारवाईबाबत कोणतीही अधिकृत माहिती उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.
महाबळेश्वर हे राज्यातील प्रमुख पर्यटनस्थळ आणि पर्यावरणीय दृष्ट्या संवेदनशील क्षेत्र असल्याने येथे होणाऱ्या कोणत्याही पर्यावरणीय हानीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. पर्यावरणप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि स्थानिक नागरिकांनी या प्रकरणातील पंचनामा, चौकशी अहवाल आणि प्रशासनाने केलेली पुढील कारवाई तातडीने जाहीर करण्याची मागणी केली आहे.
दरम्यान, गोल्फ कोर्स प्रकरणातील चौकशीचा निष्कर्ष नेमका काय लागतो, वृक्षतोड आणि उत्खननाबाबत कोणती तथ्ये समोर येतात आणि दोषींवर प्रत्यक्षात कारवाई होते का, याकडे संपूर्ण महाबळेश्वरचे लक्ष लागले असून प्रशासनाच्या पुढील भूमिकेबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
Comments
Post a Comment