हेरिटेज ग्रेड-१ गोल्फ कोर्सवर बेकायदेशीर खोदकाम, वृक्षतोड; प्रांताधिकाऱ्यांच्या पाहणीत प्रकार उघड — दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश


हेरिटेज ग्रेड-१ गोल्फ कोर्सवर बेकायदेशीर खोदकाम, वृक्षतोड; प्रांताधिकाऱ्यांच्या पाहणीत प्रकार उघड — दोषींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश

महाबळेश्वर | प्रतिनिधी

केंद्रीय पर्यावरण संवेदनशील क्षेत्र (Eco-Sensitive Zone) म्हणून घोषित महाबळेश्वर नगरपालिका हद्दीतील सिटी सर्व्हे क्रमांक ११७ व ११८ मधील हेरिटेज ग्रेड-१ गोल्फ कोर्स परिसरात अधिकृत परवानगीचा उघड गैरवापर करून मोठ्या प्रमाणावर वृक्षतोड, जमीन खोदकाम, अंतर्गत रस्तेनिर्मिती आणि बेकायदेशीर शेड उभारणी केल्याचा धक्कादायक प्रकार उजेडात आला आहे. उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी खरमाटे यांनी संबंधित ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन केलेल्या पाहणीत हे सर्व प्रकार उघड झाले असून, परवानगीच्या अटींचा भंग झाल्याचे सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे तोंडी आदेश त्यांनी दिले आहेत. या प्रकारामुळे पर्यावरणप्रेमी व नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून, प्रशासकीय कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.


परवानगी एकाची, कृत्य भलतेच

'द क्लब महाबळेश्वर'चे सचिव लेफ्टनंट कर्नल गौतम नंदी यांनी गोल्फ कोर्स मैदानाचे सपाटीकरण करून गवत लागवडीसाठी तहसीलदार कार्यालयाकडून दिनांक २० फेब्रुवारी २०२६ रोजी अधिकृत परवानगी प्राप्त केली होती. मात्र, या परवानगीचा आधार घेऊन प्रत्यक्षात त्यापलीकडे जाऊन अधिक गंभीर स्वरूपाची कामे सुरू करण्यात आल्याचे पाहणीत स्पष्ट झाले.

जेसीबी मशीनच्या सहाय्याने परिसरात मोठ्या प्रमाणावर खोदकाम करण्यात आले. वनसदृश परिसरातील अनेक वृक्ष तोडून अंतर्गत रस्ते तयार करण्यात आले. गवत लागवडीऐवजी मातीचे प्रचंड ढिगारे आणि कृत्रिम टेकड्या निर्माण करण्यात आल्या. शिवाय, तोडलेले वृक्ष जमिनीत गाडून पुरावे नष्ट करण्याचाही प्रयत्न झाल्याचे पाहणीत निदर्शनास आले. संपूर्ण गोल्फ कोर्सच्या चारही बाजूंना तारांचे कुंपण उभारण्यात आले असून, वृक्षतोड केलेल्या मोकळ्या जागेवर मोठ्या आकाराचे पत्र्याचे शेडही बेकायदेशीरपणे उभारण्यात आल्याचे आढळून आले.


तक्रारीनंतर प्रांताधिकाऱ्यांची धाव

या गंभीर प्रकारांबाबत बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुपचे चेअरमन अनिल पंडित यांच्यासह तक्रारदारांनी प्रशासनाकडे तक्रार केली. त्यानंतर उपविभागीय अधिकारी तथा प्रांताधिकारी खरमाटे यांनी तात्काळ गोल्फ कोर्सला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली. पाहणीदरम्यान त्यांनी महाबळेश्वर नगरपालिकेचे वृक्ष अधिकारी हिवरे आणि तहसीलदार सचिन मस्के यांच्याकडे परवानगीच्या अटी व प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांबाबत जाब विचारला.

परवानगी घेतलेल्या कामाव्यतिरिक्त इतर कोणतीही कामे सुरू असल्याची माहिती आपल्याकडे नसल्याचे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितल्याने प्रांताधिकारी खरमाटे संतप्त झाले. त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कडक शब्दांत सुनावत झालेल्या सर्व प्रकाराचा तात्काळ पंचनामा करण्याचे आदेश दिले. तसेच बेकायदेशीर शेडचे काम त्वरित बंद करण्याचे आणि परवानगीच्या अटींचा भंग झाल्याचे सिद्ध झाल्यास दोषी व्यक्तींवर फौजदारी गुन्हा दाखल करण्याचेही तोंडी आदेश दिल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.


हेरिटेज क्षेत्राचे पावित्र्य धोक्यात

महाबळेश्वर हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे, तर जागतिक स्तरावर ओळखले जाणारे पर्यटनस्थळ आहे. येथील गोल्फ कोर्सला हेरिटेज ग्रेड-१ दर्जा प्राप्त असून हा परिसर केंद्रीय पर्यावरण संवेदनशील क्षेत्राच्या निकषांतर्गत येतो. अशा संरक्षित आणि ऐतिहासिक महत्त्वाच्या परिसरात परवानगीचा गैरवापर करून करण्यात आलेल्या या कथित पर्यावरणीय विध्वंसामुळे पर्यावरणप्रेमी, सामाजिक संघटना आणि स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

प्रश्न केवळ एका संस्थेच्या कारभाराचा नसून, पर्यावरण संवेदनशील क्षेत्रातील प्रशासकीय परवानग्या किती काळजीपूर्वक दिल्या जातात आणि त्यांची अंमलबजावणी किती प्रभावीपणे होते, याचाही आहे, अशी प्रतिक्रिया पर्यावरणप्रेमींकडून व्यक्त होत आहे.


पंचनामा, चौकशी व कारवाईची प्रतीक्षा

प्रांताधिकाऱ्यांच्या पाहणीनंतर आता पंचनामा व चौकशी अहवाल तयार होण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. अहवालाच्या निष्कर्षांवर पुढील फौजदारी कारवाई अवलंबून असेल. या प्रकरणी संबंधित दोषी व्यक्तींवर महाराष्ट्र (झाडांचे संरक्षण व जतन) अधिनियम, पर्यावरण संरक्षण कायदा तसेच महाराष्ट्र भूमी महसूल संहितेतील तरतुदींनुसार कारवाई होण्याची शक्यता आहे. नागरिक आणि पर्यावरण संघटनांनी प्रशासनाने या प्रकरणात कठोर व त्वरित कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.


पाहणीवेळी उपविभागीय अधिकारी खरमाटे, तहसीलदार सचिन मस्के, मुख्याधिकारी योगेश पाटील, तक्रारदार तथा बॉम्बे एन्व्हायरमेंट ॲक्शन ग्रुपचे चेअरमन अनिल पंडित, सूर्यकांत पांचाळ, वृक्ष अधिकारी हिवरे, सागर शिंदे, वन कर्मचारी लहू राऊत, सुनील लांडगे, मुख्य लिपिक बबन जाधव, अमित माने यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 


Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl