महाबळेश्वरच्या नागरी प्रश्नांवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक; वाहनतळ, सीसीटीव्ही, पाणीपुरवठ्यासह विविध मागण्यांचे निवेदन


महाबळेश्वरच्या नागरी प्रश्नांवर शिवसेना उद्धव ठाकरे गट आक्रमक; वाहनतळ, सीसीटीव्ही, पाणीपुरवठ्यासह विविध मागण्यांचे निवेदन

महाबळेश्वर | प्रतिनिधी

महाबळेश्वर शहरातील नागरिकांना भेडसावणाऱ्या विविध नागरी समस्यांकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) महाबळेश्वर शहर शाखेच्या वतीने नगरपरिषदेचे मुख्य लिपिक बबनराव जाधव यांना सविस्तर निवेदन सादर करण्यात आले. शहरातील वाहतूक व्यवस्थापन, नागरिकांची सुरक्षा, शुद्ध पाणीपुरवठा, स्थानिक युवकांना रोजगार तसेच रखडलेल्या विकासकामांबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.

निवेदनातील प्रमुख मागणी म्हणजे हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे चौकाजवळील नगरपरिषदेच्या मालकीचे धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज वाहनतळ खाजगी भाडे तत्त्वावर चालविण्याऐवजी नगरपरिषदेमार्फतच चालविण्यात यावे. यामुळे नगरपरिषदेच्या महसुलात वाढ होण्याबरोबरच स्थानिक युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असे शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी नमूद केले आहे.

शहरात वाढती गर्दी आणि पर्यटनाच्या पार्श्वभूमीवर नागरिक व पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महत्त्वाच्या चौकांमध्ये सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्याची मागणीही करण्यात आली आहे. छत्रपती शिवाजी महाराज चौक, नेताजी सुभाषचंद्र बोस चौक, वेण्णा लेक नाका, महाड नाका आणि सातारा नाका या प्रमुख ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचा विषय नगरपरिषदेच्या सर्वसाधारण सभेत घेऊन त्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर शहराच्या पाणीपुरवठ्याशी संबंधित मुद्दाही उपस्थित करण्यात आला. विल्सन पॉइंट येथील जलशुद्धीकरण केंद्राच्या पाण्याच्या टाकीची पावसाळ्यापूर्वी तसेच पावसाळा सुरू झाल्यानंतर नियमित स्वच्छता करण्यात यावी, जेणेकरून नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि शुद्ध पाणी उपलब्ध होईल, अशी मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, फॉरेस्ट ऑफिस ते भारत हॉटेल या मार्गावर सुरू असलेल्या उत्खननाच्या कामामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात चिखल साचत असून वाहनचालक व पादचाऱ्यांसाठी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. संबंधित विभागाने तातडीने योग्य उपाययोजना करून नागरिकांच्या सुरक्षेची काळजी घ्यावी, अशी मागणीही निवेदनातून करण्यात आली.

याशिवाय एल. सी. डिसोझा मार्गावरील स्थानिक मंगळवार आठवडे बाजार परिसरात नगरपरिषदेची विविध विकासकामे सुरू असून ती गेल्या काही महिन्यांपासून रखडल्याचे निदर्शनास आणण्यात आले. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्यात यावीत, अन्यथा महिला, व्यापारी आणि सर्वसामान्य नागरिकांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागेल, असे शिवसेनेच्या वतीने सांगण्यात आले.

निवेदन सादर करताना शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, युवासेना पदाधिकारी आकाश साळुंखे, उपशहरप्रमुख राजेश साळवी, शाहनवाज भाई खरखंडे, सुशांत (आबा) पारठे, आरोग्य सेनेचे अमोल साळुंखे, अल्ली भाई वारुणकर, समीरभाई तांबोळी, ज्येष्ठ नागरिक अशोक (मामा) शिंदे, तेजस बोधले यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी बोलताना शहरप्रमुख राजाभाऊ गुजर म्हणाले, "महाबळेश्वर शहरातील नागरिकांच्या मूलभूत सुविधा, सुरक्षाव्यवस्था आणि स्थानिक युवकांना रोजगार मिळावा यासाठी आम्ही सातत्याने पाठपुरावा करत आहोत. प्रशासनाने या मागण्यांवर सकारात्मक निर्णय घेऊन तातडीने कार्यवाही करावी. शहराच्या विकासासाठी आणि नागरिकांच्या हितासाठी शिवसेना नेहमीच आग्रही राहील."

शहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर प्रशासनाने लवकरात लवकर ठोस भूमिका घेऊन आवश्यक कार्यवाही करावी, अशी अपेक्षा नागरिकांमधूनही व्यक्त होत आहे.

Comments

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Maz_Gav_Mazi_Batmi_Mahabaleshwar

Slider

AI for All

AI for All
AI आता अवघड नाही – प्रत्येकासाठी सोपं पुस्तक!

Most Popular

आंबेनळी घाटात पहाटे भीषण अपघात; ३००–४०० फूट दरीत कोसळलेल्या कारमधील प्रवाशांचे थरारक बचावकार्य

माचूतर येथे भीषण अपघात : एसटी–दुचाकीची समोरासमोर धडक; मोबाईल व्यावसायिक नरेश भोंडेकर यांचा जागीच मृत्यू

महाबळेश्वर–पाचगणी बंदचा सरकारवर परिणाम; मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक, सुरूर–पोलादपूर रस्ता ३० एप्रिलपूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासनl