टोलविरोधी रिपाईचे ‘नमस्कार आंदोलन’; तीन तास टोलनाका बंद, नगरपालिकेला लाखोंचा फटका
पर्यटकांच्या आर्थिक लुटीविरोधात रिपाई आक्रमक; ‘फास्टॅग कुठे, हिशोब कुठे?’ असा सवाल
महाबळेश्वर प्रतिनिधी
महाबळेश्वरमध्ये पर्यटकांकडून आकारल्या जाणाऱ्या टोल व विविध शुल्कांच्या विरोधात रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) च्या वतीने आज वेण्णा लेक परिसरातील टोल नाक्यावर जोरदार आंदोलन छेडण्यात आले. "नमस्कार आंदोलन" या अनोख्या पद्धतीने करण्यात आलेल्या या आंदोलनामुळे सुमारे तीन तास टोल नाक्यावरील वसुली पूर्णपणे ठप्प झाली असून महाबळेश्वर नगरपालिकेला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसल्याची चर्चा सुरू आहे.
महाबळेश्वर हे राज्यातील आणि देशातील प्रमुख पर्यटनस्थळ मानले जाते. दरवर्षी लाखो पर्यटक येथे भेट देतात. मात्र पर्यटकांकडून आकारण्यात येणाऱ्या विविध शुल्कांबाबत गेल्या अनेक वर्षांपासून नाराजी व्यक्त केली जात आहे. वाहनांवर स्वतंत्र कर, वाहनातील प्रत्येक प्रवाशामागे आकारले जाणारे शुल्क तसेच वनविभागाशी संबंधित स्वतंत्र शुल्क यामुळे पर्यटकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडत असल्याचा आरोप रिपाईने केला आहे.
आंदोलनादरम्यान रिपाईच्या कार्यकर्त्यांनी टोल नाक्यावर येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाचे हात जोडून स्वागत केले. "महाबळेश्वरमध्ये आपले स्वागत आहे" असे सांगत पर्यटकांना आंदोलनामागील भूमिका समजावून सांगण्यात आली. त्यामुळे अनेक पर्यटकांनी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत कार्यकर्त्यांचे अभिनंदन केले. टोल नाक्यावर कोणतीही अनुचित घटना घडू नये याची काळजी घेत शांततापूर्ण पद्धतीने आंदोलन करण्यात आले.
रिपाईच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी गंभीर आरोप करत सांगितले की, देशभरात गेल्या दशकभरापासून फास्टॅग आणि डिजिटल पेमेंट प्रणाली कार्यान्वित आहे. मात्र दररोज हजारो वाहनांची वर्दळ असलेल्या महाबळेश्वरमध्ये आजही पूर्णपणे डिजिटल आणि पारदर्शक टोल संकलन व्यवस्था सुरू झालेली नाही. त्यामुळे वसुली प्रक्रियेत पारदर्शकतेचा अभाव असून आर्थिक व्यवहारांची स्वतंत्र चौकशी करण्याची गरज असल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
यासंदर्भात अनेक वेळा प्रशासनाकडे लेखी निवेदने आणि माहिती मागवूनही समाधानकारक प्रतिसाद मिळाला नसल्याचा आरोपही करण्यात आला. पर्यटकांकडून आकारण्यात येणाऱ्या शुल्कांचे स्वरूप, त्याचा वापर, महसूल संकलनाचा तपशील आणि सुविधांवर होणारा खर्च याबाबत जनतेसमोर स्पष्ट माहिती मांडली जात नसल्याची टीका करण्यात आली.
"पर्यटन वाढवायचे की पर्यटकांना लुटायचे?" असा थेट सवाल उपस्थित करत आंदोलनकर्त्यांनी टोल व्यवस्थापन आणि संबंधित प्रशासनाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली. महाबळेश्वरच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य आधार पर्यटन असल्याने पर्यटकांवर अतिरिक्त आर्थिक भार टाकण्याऐवजी त्यांना अधिक चांगल्या सुविधा देण्यावर भर दिला पाहिजे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.
या आंदोलनाला स्थानिक व्यापारी, हॉटेल व्यावसायिक, उद्योजक आणि नागरिकांचा उत्स्फूर्त पाठिंबा लाभल्याचे रिपाईच्या वतीने सांगण्यात आले. अनेकांनी टोल धोरणाचा फेरविचार करून पारदर्शक यंत्रणा उभारण्याची मागणी केली.
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) ने यावेळी प्रशासनाला इशारा देत म्हटले की, पर्यटक आणि स्थानिक जनतेवरील कथित अन्याय तात्काळ थांबवून टोल व्यवस्थापनाबाबत स्पष्ट धोरण जाहीर करण्यात आले नाही तर यापेक्षा अधिक व्यापक आणि तीव्र जनआंदोलन उभारले जाईल. महाबळेश्वर हे महाराष्ट्राचे जागतिक दर्जाचे पर्यटनस्थळ असून पर्यटकांची आर्थिक पिळवणूक कोणत्याही परिस्थितीत सहन केली जाणार नाही, अशी भूमिका पक्षाने मांडली.
"जनतेच्या हक्कासाठी संघर्ष हा आमचा धर्म आहे. अन्यायाविरोधातील लढा अखंड सुरू राहील," असा निर्धार आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केला.
रिपाईचे राष्ट्रीय नेते अशोक बापू गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असलेल्या या आंदोलनाचे नेतृत्व युवक आघाडीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा पंचायत समिती सदस्य स्वप्नीलभाई गायकवाड यांनी केले. यावेळी महाबळेश्वर तालुकाध्यक्ष जॉनभाई जोसेफ, कार्याध्यक्ष आतिश भोसले, मिथुन तळवळकर, विनय गायकवाड, फौजीया मुलानी, संतोष तात्या गायकवाड, श्रीकांत बापू निकाळजे, एकनाथजी रोकडे, अमर वाघमारे, बाजीगर इनामदार यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
महाबळेश्वर टोल प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून या आंदोलनानंतर नगरपालिका प्रशासन आणि संबंधित विभाग याबाबत कोणती भूमिका घेतात, याकडे पर्यटकांसह स्थानिक नागरिकांचे लक्ष लागले आहे.
Comments
Post a Comment