पर्यावरण रक्षणाचा हरित संकल्प; राधानगर-माचुतर येथे ५०० वृक्ष लागवड व संगोपनाचा निर्धार
पर्यावरण रक्षणाचा हरित संकल्प; राधानगर-माचुतर येथे ५०० वृक्ष लागवड व संगोपनाचा निर्धार
संदीप देवकुळे,
महाबळेश्वर प्रतिनिधी :
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राधानगर-माचुतर येथे शिंदे फाऊंडेशनच्या वतीने वृक्षारोपणाचा प्रेरणादायी उपक्रम राबविण्यात आला. वाढते जागतिक तापमान, हवामान बदल, अनियमित पर्जन्यमान, पाण्याची टंचाई आणि नैसर्गिक संसाधनांवरील वाढता ताण या गंभीर पर्यावरणीय समस्यांच्या पार्श्वभूमीवर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमातून पर्यावरण संवर्धनाचा प्रभावी संदेश देण्यात आला. या उपक्रमाला ग्रामस्थ, विद्यार्थी आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
पर्यावरण संरक्षणासाठी सामूहिक सहभाग आवश्यक असल्याची जाणीव निर्माण करण्याच्या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात मोठ्या उत्साहात वृक्षारोपण करण्यात आले. भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवाई जपण्याचा निर्धार उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमात उद्योजक राजेंद्र कुलकर्णी, फाऊंडेशनचे अध्यक्ष उद्योजक डी. एल. शिंदे, भगवान शिंदे, डॉ. नंदकुमार शिंदे, सचिन शिंदे, कांतराम शिंदे, दिलीप शिंदे, गणेश शिंदे, नितीन शिंदे, सुभाष कदम, तुषार शिंदे, अरुण शिंदे, प्रशांत शिंदे, दिनेश शिंदे, सुरेश शिंदे, शशिकांत शिंदे, संतोष शिंदे, प्राथमिक शिक्षक जाधव सर, अनिल सपकाळ, शाळेतील विद्यार्थी तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना फाऊंडेशनचे अध्यक्ष डी. एल. शिंदे यांनी पर्यावरण संवर्धनासाठी केवळ वृक्षारोपण करून थांबणे पुरेसे नसून त्यांचे संगोपन आणि संरक्षण करणे अधिक महत्त्वाचे असल्याचे सांगितले. फाऊंडेशनच्या माध्यमातून यावर्षी किमान ५०० वृक्षांची लागवड करून त्यांचे जतन करण्याचा संकल्प करण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली. पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी प्रत्येक नागरिकाने आपल्या परिसरात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याची जबाबदारी स्वीकारली पाहिजे, असेही त्यांनी नमूद केले.
कार्यक्रमात भगवान शिंदे यांनी हवामान बदलामुळे जगभरात निर्माण झालेल्या गंभीर परिस्थितीकडे लक्ष वेधले. वाढते तापमान, वितळणाऱ्या हिमनद्या, अतिवृष्टी, दुष्काळ आणि जैवविविधतेचा होत असलेला ऱ्हास ही संपूर्ण मानवजातीसमोरील मोठी आव्हाने असल्याचे त्यांनी सांगितले. या संकटांवर मात करण्यासाठी प्रत्येकाने किमान एक तरी वृक्ष लावून त्याचे संगोपन करण्याचा संकल्प करणे ही काळाची गरज असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित सर्व सभासद, ग्रामस्थ आणि मान्यवरांनी पर्यावरणपूरक उपक्रमांना सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्धार व्यक्त केला. वृक्षारोपणासोबतच पर्यावरण संवर्धनाबाबत जनजागृती निर्माण करून स्वच्छ, हरित आणि शाश्वत भविष्यासाठी एकत्रित प्रयत्न करण्याचे आवाहन करण्यात आले. राधानगर-माचुतर येथे झालेला हा उपक्रम पर्यावरण संरक्षणाच्या दिशेने उचललेले महत्त्वपूर्ण पाऊल ठरत असून, समाजात पर्यावरणाबाबत सकारात्मक जागरूकता निर्माण करणारा आदर्श उपक्रम म्हणून त्याची नोंद घेतली जात आहे.
जितेंद्र!आपली लेखणी व वार्तांकन खूप भावस्पर्शी, सत्याचा मागोवा घेणारे असते.जेव्हा-जेव्हा ते मनाला भावले तेव्हा मी थोडक्यात मत मांडले आहे.आपल्या वृत्तसेवेची वृद्धी होवो.धन्यवाद.--डाॅ.नंदकुमार शिंदे,माचुतर.
ReplyDelete